सलमान खानच्या आयुष्यातील वादग्रस्त घटना (Top 10...

सलमान खानच्या आयुष्यातील वादग्रस्त घटना (Top 10 Controversies Of Salman Khan)

चंदिगढच्या व्यापाऱ्याने सलमान खानवर ३ कोटी रुपयांच्या अफरातफरीची फिर्याद केल्याने हा सल्लूमियाँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा भाई आयुष्यभर कायमच वादग्रस्त घटनांमध्ये गुरफटलेला आहे. वादग्रस्त घटना जणू त्याच्या पाचवीला पूजल्या आहेत. त्याच्या या वादग्रस्त वावटळीची यादी तशी मोठी आहे. पण तूर्तास आपण त्याच्या १० घटनांचा आढावा घेऊया.

 • काळवीटाची शिकार

राजस्थानातील जंगलामध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिवाय चिंकाराची शिकार केल्याबाबत त्याला तुरुंगवास झाला होता. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा प्रकार घडला होता. हाती आलेल्या वृत्तानुसार, सलमान आपल्यासह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना घेऊन शिकारीला गेला होता आणि त्याने दोन काळवीटांची शिकार केली होती.

 • हिट ॲण्ड रन

हिट ॲण्ड रन नावाने प्रसिद्ध झालेली ही घटना सलमानच्या आयुष्यात घडली होती व कित्येक वर्षे गाजत राहिली होती. मुंबईच्या वांद्रे उपनगरातील एका बेहरी बेकरी बाहेर फूटपाथवर झोपलेल्या काही इसमांना सलमानच्या टोयोटा लॅन्ड क्रुझर या मोटारीने चिरडले. ही मोटारगाडी सलमान खान चालवत असल्याचा आरोप होता. त्यावरून सलमानला पोलिसांनी अटक केली होती. पण त्याची जामिनावर सुटका झाली. कारण त्याने कोर्टात सांगितले की, तो ड्रायव्हिंग सीटवर नव्हता, म्हणजे तो मोटारगाडी चालवत नव्हता अन्‌ नशेतही नव्हता.

 • ऐश्वर्या रायशी दंगामस्ती

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम करीत असताना सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रेमात पडले. पण सलमान तिच्या प्रेमात इतका गुरफटला की तिच्यावर जरूरीपेक्षा जास्त अधिकार गाजवू लागला. एके रात्री ऐश्वर्याच्या घराबाहेर तो पोहचला. आणि आरडाओरडा करू लागला. असं म्हटलं जातं की, सलमानने ऐश्वर्याशी बरीच दंगामस्ती केली आणि तिच्या वडिलांशी पण वाईट वर्तन केले. ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान विरुध्द पोलिसात तक्रारही केली होती.

 • विवेक ओबेरॉयशी वाद

ऐश्वर्या राय वरून सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात भांडण लागले होते. विवेक ओबेरॉयने चक्क पत्रकार परिषद घेऊन सलमानने आपल्याला शिविगाळ केली असल्याचा व धमकी दिल्याचा आरोप केला. या दोघांचा वाद तेव्हा खूपच गाजला. पुढे विवेकने सलमानची माफी मागितली. पण सलमानने ती कबूल केली नाही. मात्र सलमानशी अशा रीतीने पंगा घेतल्यामुळे विवेकची चित्रपट कारकीर्द चांगलीच अडचणीत आली, असं लोक मानतात.

 • अरिजीत सिंह वर राग

एका ॲवॉर्ड फंक्शनचे सूत्रसंचालन सलमान खान करत होता. गायक अरिजीत सिंह आपलं ॲवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा सलमानने आपल्या झोपेवर विनोद केला. त्यावर ‘सर सुला दिला आपने’, अशी दाद दिली. ती सलमानला आवडली नाही. त्याला इतका राग आला की, ‘सुलतान’ या त्याच्या चित्रपटात असलेले ‘जग घुमिया’ हे गाणे खूप गाजले होते; ज्याचे एक संस्करण अरिजीतने गायले होते, ते चित्रपटातून सलमानने हटवले. आपल्या सोशल हॅन्डलवरून तरी ते हटवू नका, म्हणून अरिजीतने सलमानला विनंती केली. पण सलमानने ती धुडकावून लावली. या अरिजीतला गायनाची जास्त संधी मिळालेली नाही. त्याचं कारण सलमानच असल्याचं बोललं जातं.

 • सोनू निगमशी वाद

सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने गेल्या वर्षी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने कोणाचंही नाव न घेता सलमानच्या दादागिरी बाबत सूचक उद्‌गार काढले होते. मी स्वतः त्याची दादागिरी सोसली आहे, असंही तो बोलला होता. अरिजीत सिंहचे उदाहरण देऊन, सलमानने त्याला कसं बेजार केलं, तेही त्याने त्या व्हिडिओत सांगितलं. अन्‌ सलमान पुन्हा वादग्रस्त ठरला.

 • शाहरुखशी कट्टी आणि बट्टी

आता शाहरूख आणि सलमान चांगले दोस्त असले तरी, एका जमान्यात ते एकमेकांची सावली अंगावर पडू देत नसत. कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत या दोघांचा वाद झाला होता. शाहरूखने, सलमानला ऐश्वर्या राय वरून चिडवले. तेव्हा सलमान खूप भडकला. अन्‌ त्याने सर्वांसमक्ष शाहरूखचा पाणउतारा केला. त्यावरून दोघांमध्ये झालेला बेबनाव बरीच वर्षे टिकला. मग एका इफ्तार पार्टीत सलमानने शाहरूखला गळामिठी मारली अन्‌ दोस्ती केली.

 • रणबीर कपूरच्या थोबाडीत दिली

रणबीर कपूरमुळे कतरीना कैफशी आपला ब्रेकअप झाला, या समजुतीने सलमान खान त्याच्यावर राग धरून होती. एका बड्या रेस्टॉरंटमध्ये सलमान व रणबीर पार्टीला गेले होते. तिथे त्यांचा कोणत्या तरी मुद्यावरून वाद सुरू झाला. तो इतका शिगेला पोहचला की, सलमानने रणबीरच्या थोबाडीत मारली. सलमानच्या या कृत्यामुळे, त्याचे पितीजी सलीम खान यांना फारच वाईट वाटले. त्यांनी ऋषी कपूरच्या घरी जाऊन सलमानच्या वतीने माफी मागितली होती.

 • अभिनव कश्यपची आगपाखड
 • साली ‘दबंग’ या चित्रपटाच्या दरम्यान अभिनव कश्यपने सलमान खानवर आरोप लावला की, त्याच्यामुळे आपले पूर्ण कुटुंब बरबाद झाले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनवने एक प्रदीर्घ पोस्ट टाकून सलमान वर आगपाखड केली होती. कोणालाही धमकावण्यासाठी सलमानचे कुटुंबिय अवैध धन, राजकीय हितसंबंध आणि अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा वापर करतात, असा आरोप त्याने केला. आणि आपल्या हाती असलेले सर्व प्रोजेक्टस्‌ या लोकांनी कसकसे काढून घेतले, ते लिहिलं होतं.
 •  अनुराग कश्यपचा अपमान

‘तेरे नाम’ हा सलमानचा चित्रपट आधी अनुराग कश्यप दिग्दर्शित करणार होते. त्यातील सलमानचे पात्र यु.पी. कडील असल्याने अनुरागने त्याला छातीवर केस वाढवायला सांगितले. तेव्हा सलमान काही बोलला नाही. पण दुसऱ्या दिवशी निर्मात्याने त्याला ऑफिसात बोलावले. अन्‌ रागाच्या भरात त्याच्यावर बाटली फेकली. ‘अजून तुला दिग्दर्शन दिले नाही, अन्‌ तू सलमानला शिकवतोस काय,’ म्हणून निर्मात्याने त्याचा अपमान केला. पुढे अनुराग कश्यपला काढून या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिकला देण्यात आले.