निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज ४९वा वाढदिवस (...

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज ४९वा वाढदिवस (Today Is The Birthday Of Producer, Director Karan Johar)

सध्याचा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक करण जोहरचा आज ४९ वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही करण आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत आहे. पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करणने अलिबागला आपल्या सेलिब्रिटी मित्रमंडळींसाठी कालपासून २६ तारखेपर्यंत एक जंगी पार्टी आयोजित केली आहे. करणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

करणचा जन्म मुंबईत झाला असून त्याचे वडील यश जोहर प्रसिद्ध सिनेनिर्माते होते. त्यांनी धर्मा प्रोडक्शनची स्थापना केली. करणने त्याच्या करिअरची सुरुवात अभिनयाने केली होती. नंतर त्याने निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यात प्रचंड यश मिळवलं. त्याने अनेक नव्या कलाकारांना लॉन्च देखील केलं.

वयाच्या १४व्या वर्षी करणने दूरदर्शनवरील ‘इंद्रधनुष’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात तो सहायक अभिनेता म्हणून दिसला होता. त्यानंतरही त्याने काही चित्रपट केले परंतु अभिनेता म्हणून त्याला फारसं यश मिळालं नाही, पण दिग्दर्शक म्हणून तो अधिक यशस्वी ठरला. अगदी कमी वयातच करणने दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान अशा अनेक सिनेमांचं त्याने दिग्दर्शन केलं.

‘कॉफी विथ करण’ या करणच्या गाजलेल्या टॉक शोमधून त्याने अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतं केलं. याच शोमध्ये करणने देखील त्याच्या आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला होता. करणने त्याच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला होता. करणने, तो एका मुलीवर खूप प्रेम करत असून ती एक बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं सांगितलं होतं. एवढचं नाही तर या मुलीच्या सांगण्यावरून करणने एका उंच टेकडीवरून उडीदेखील मारली होती.

करण जोहरचं हे पहिलं प्रेम म्हणजे अभिनेत्री ट्विंकल खन्ना होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दोघांनी यावर चर्चा देखील केली होती. ट्विंकल खन्नाने तिच्या ‘मिस फनी बोन्स’ या पुस्तकातही करण तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा या गोष्टीचा खुलासा केलाय. करण आणि ट्विंकल एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी करण, ट्विंकलला कॅन्टींगमधून जेवणं चोरून आणायला सांगायचा, असं ट्विंकलने म्हटलं आहे.

करणच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे करण जोहर अनेकदा चर्चेत आला आहे. काही वेळेला त्याला ट्रोलही व्हावं लागलं आहे. आपल्या कामाबद्दल नेहमी कौतुक ऐकणाऱ्या करणला त्याच्या सेक्शुअल स्टेटसबद्दल नेहमी टीका देखील सहन करावी लागलीय. पण करणने याकडे दुर्लक्ष केलं आहे. करण सध्या त्याची आई हिरु जोहर आणि दोन मुलांसोबत राहतो. करणला रुही आणि यश ही मुलं असून सरोगसीच्या मदतीने त्यांचा जन्म झाला आहे.

करणला त्याच्या पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!