‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील चंपक चाचांना सेटवर गंभीर दुखापत… (TMKOC Fame Champak Chacha Amit Bhatt Got Injured On The Sets)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वर्ग या शोचा चाहता आहे. गोकुळधाम सोसायटीच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेत चंपक चाचाची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांना सेटवर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

ई टाइम्स टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता..’ मालिकेच्या चंपक चाचा यांना दुखापतीनंतर डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ते शूटिंग करू शकत नाही. या मालिकेतील एका दृश्यादरम्यान अमित भट्ट यांना पळायचं होतं. मात्र पळताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. पडल्यामुळे अमित यांना दुखापत झाली आहे. सध्या ते बेड रेस्टवर असून काही दिवस शूटिंगपासून लांब राहणार आहेत.

मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांना आराम करण्यासाठी सुट्टी दिली आहे. शोचे इतर कलाकारही अमित लवकरात लवकर बरे होऊन शोच्या सेटवर परत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. तसेच त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांचे चाहते देखील प्रार्थना करत आहेत.

‘तारक मेहता..’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच 14 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही. प्रेक्षक या शोचे जुने एपिसोडही आवडीने पाहतात. मालिकेतील चंपक चाचा आणि जेठालाल यांचे सीन्स चाहत्यांना खूप आवडतात. त्यांच्यातील संभाषण हे कधी पोट धरून हसवणारं तर कधी भावूक करणारं असतं. अमित भट्ट यांनी ‘तारक मेहता..’ शिवाय ‘खिचडी’, ‘येस बॉस’, ‘चुपके चुपके’, ‘फनी फॅमिली डॉट कॉम’, ‘गपशप कॉफी शॉप’, ‘एफआयआर’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी सलमान खानच्या मेव्हण्याच्या ‘लव्हयात्री’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.