श्रावणसरीत आरोग्य कसे सांभाळाल? (Tips For Good ...

श्रावणसरीत आरोग्य कसे सांभाळाल? (Tips For Good Health In The Drizzle Of Shravan Month)

श्रावणमासी हर्ष मानसी… असे कवीने केलेले वर्णन खूप प्रचलित आहे. थंडगार वातावरण, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी यामुळे खरोखरीच मन हर्षभरीत होत असले तरी शरीर कुरबुर करण्याची शक्यता राहतेच. कारण पावसाच्या सरी कोसळत असल्याने संसर्गजन्य आजार बळावतात. अन् आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तेव्हा या ओल्या वातावरणात आरोग्य सांभाळणे गरजेचे ठरते.
आहार सांभाळा
–    या ओल्या हवेत पचनक्रिया मंदावत असल्याने आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. पाण्यातून व अन्नपदार्थांमधून बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्वच्छ आणि पूर्ण शिजलेले पदार्थ खावे.
–    या दिवसात पचनक्रिया मंदावल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. पचनशक्ती कमी झाल्याने अन्न पूर्णपणे पचत नाही. अन् सिडीटी, गॅसेस निर्माण होतात. तेव्हा ताजे व पचायला हलके अन्न खा. पोटास तड लागेपर्यंत खाऊ नका.
–    खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलंत तर हगवण, आमांश, बद्धकोष्ठ किंवा काविळीसारखे रोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया हेही पावसाळ्यात उद्भवणारे आजार आहेत. त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
–    हवेत ओलावा भरपूर आहे म्हणून पाण्याची गरज नाही, असे समजू नका. व्यवस्थित, भरपूर पाणी प्या. ओलसर वातावरणाने घाम लवकर सुकत नाही. त्यामुळे शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जात नाही. म्हणूनच शरीरास पाणी कमी पडू देऊ नका.
–    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या दिवसात पाणी उकळून व गाळून घ्या. कारण या दिवसात पाण्यावाटे सूक्ष्म जंतू पोटात जाऊ शकतात. अन् पोटाद्वारे आरोग्य बिघडू शकते.

–    रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या वाटेला अजिबात जाऊ नका. कारण त्यावर बसणार्‍या माशांमुळे जंतूंचा संसर्ग होतो. हे सूक्ष्म जंतू आरोग्यास अतिशय घातक असतात.
–    कच्चे सॅलड, भाज्या खाऊ नका. उकडलेले सॅलड-भाज्या खा. त्याचप्रमाणे शिळे अन्न अजिबात खाऊ नका.
–    भाज्या, फळे स्वच्छ धुवूनच खा. पालेभाज्या, फुलकोबी खाऊ नका. पावसाच्या दिवसात त्यामध्ये कीड दडलेली असते.
–    दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. तरी या दिवसात ते पिऊ नका.
–    डेअरी प्रॉडक्टस् जितके टाळाल, तितके बरे. कारण त्यांच्याद्वारे इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकते.
–    गरमागरम ताजे सूप प्या. ते अधिक पौष्टिक असतं. शिवाय त्याच्याने भूक लागते. अन् पचनक्रिया नियंत्रित होते.
–    आल्याचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी आवर्जून प्या.

–    मांसाहारी पदार्थ शक्यतोवर टाळा. विशेषतः मासे खाऊ नका. कारण हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यांच्या शरीरातील अंडी, द्रवपदार्थ आपल्या पोटात गेल्याने आरोग्य बिघडू शकते.
–    तळलेले, चमचमीत, मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका. भजी खाण्याची इच्छा झाली, तरी मन मारा. तसेच प्रोसेस्ड फूड खाऊ नका.
–    खाद्यपदार्थांमध्ये गायीच्या तुपाचा वापर करा. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. प्रतिकारशक्ती वाढते.
–    अपचन आणि बद्धकोष्ठ यांची समस्या होऊ नये म्हणून नियमितपणे आल्याचे सेवन करा. जेवणाआधी आल्याच्या छोट्या तुकड्यावर सैंधव मीठ टाकून तो तुकडा चघळून खा.
–    हळद, धणे, मिरे, हिंग, बडीशेप, लसूण, आले हे मसाल्यांचे पदार्थ रोगप्रतिबंधक शक्ती वाढविणारे असतात. अन् पचनक्रिया वाढविण्यास उपयुक्त असतात. म्हणून त्यांचा वापर जेवणात करा.

–    मधल्या वेळात चिवडा, भजी, फरसाण असे पचायला जड असलेले पदार्थ खाण्याऐवजी सुकामेवा खा. त्याचप्रमाणे ताजी फळे खा.
–    स्वयंपाकाची भांडी स्वच्छ ठेवा

व्यायाम सोडू नका
–    पावसाची संततधार सुरू असते, तेव्हा चालण्याचा व्यायाम, जॉगिंग करता येत नाही, हे मान्य. पण व्यायाम पूर्णपणे सोडू नका. घरातल्या घरात काही हलके स्ट्रेचिंग एक्सरसाईज, योगाभ्यास करा. ध्यानधारणा करा.

–    ऑफिसात देखील एका जागेवर जास्त वेळ बसून राहू नका. अधूनमधून पाय मोकळे करा. खुर्चीवर बसल्या बसल्या मान, खांदे, हात, पाय यांचे व्यायाम करा.

इन्फेक्शन व अ‍ॅलर्जीची काळजी घ्या
–    या दिवसात हवेतील आर्द्रता आणि दमटपणा वाढत असल्याने त्वचेला खाज सुटणे, चट्टे पडणे, फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा समस्या उद्भवतात. त्यावर उपाय म्हणून आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाच्या पाल्याचे उकळते पाणी मिसळून त्या पाण्याने आंघोळ करा.

–    मधुमेह रुग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण पावसात बाहेर गेल्यास पाय ओले नरम पडून शू बाईट होऊ शकतो. अन् या जखमेत पाणी गेल्यास ती लवकर भरून येणार नाही. असं घडल्यास त्वरीत आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्या.
–    पावसात भिजण्याची पाळी आली तर घरी येऊन स्वतःला लवकरात लवकर सुकवून घ्या. शरीर जास्त वेळ ओले राहिल्यास सर्दी-पडसे होईल. शिवाय केस आणि त्वचेला फंगल इन्फेक्शन होईल.
–    शक्यतो पाय कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. पाय ओले झाल्यास त्यांना अतिशय स्वच्छपणे पुसा. पायांच्या बोटांमधून पुसून कोरडे करा. अ‍ॅन्टी फंगल व अ‍ॅन्टी बॅक्टेरियल पावडर या बोटांमध्ये लावा.

–    लवकर सुकतील असे कपडे घाला. जिन्स घालू नका. ते लवकर सुकणार नाहीत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.
–    हात साबणाने स्वच्छ धुवून मगच जेवा.

खबरदारी घ्या
–    लहान मुले, ज्येष्ठ नागरीक तसेच दमा आणि श्वसनाचे विकार असणार्‍यांनी या मौसमात जास्त काळजी घेतली पाहिजे. ओलसर जागेत वावरू नका. पावसात भिजू नका. बाहेर जाणे टाळा. कारण रस्ते, जमीन निसरडी झाल्याने घसरून पडण्याचा धोका जास्त असतो.
–    बाहेरुन घरात आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करा. आंघोळीच्या पाण्यात अ‍ॅन्टीसेप्टीक द्रवाचे काही थेंब मिसळायला विसरू नका.
–    केस जास्त वेळ ओले ठेवू नका. ते लवकरात लवकर सुकवा.
–    नेहमी ताजे व गरम अन्नपदार्थ खा. शिळे आणि थंड पदार्थांच्या वाटेला जाऊ नका.
–    दिवसा जास्त वेळ झोपू नका. त्यामुळे वात, पित्त आणि कफ यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एखादी डुलकी घ्यायला हरकत नाही. पण तासन् तास झोपू नका.
–    हॅपेटायटिस ए आणि बी यांचे इंजेक्शन घ्या. कारण मान्सूनमध्ये लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकते. हॅपेटायटिसचे जंतू पाण्यामधून वेगाने पसरतात. त्यांचे इन्फेक्शन गंभीर समस्या निर्माण करू शकतात. अन् कावीळ होण्याची संभावना वाढते.