कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये ‘टाईमपास ३’ ला ७ नामांकन...

कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये ‘टाईमपास ३’ ला ७ नामांकने (‘Timepass 3’ Marathi Film Seek 7 Nominations In Comedy Awards)

गेल्या काही दिवसांपासूनच ‘टाईमपास ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. दगडू आणि पालवीच्या प्रेमकहाणीने मराठी पडद्यावर वेगळीच रंगत आणली आहे. ‘आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ’, ‘हम गरीब हुए तो क्या हुआ’ या अनेक हिट संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास’.

जेवढं प्रेम टाईमपासच्या पहिल्या दोन भागांना मिळाले आता त्याहुनही जास्त प्रेम प्रेक्षक ‘टाईमपास ३’ ला देताना दिसत आहेत. ‘टाईमपास ३’ च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यातच सोने पे सुहागा म्हणजे नुकतेच जाहीर झालेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये ‘टाईमपास ३’च्या शिरपेचात  पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता- प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ह्रता दुर्गुळे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रवी जाधव, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अन्विता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट गायक अमितराज (कोल्डड्रिंक) यांना ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये नामांकने प्राप्त झाली आहेत.

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास ३’ चित्रपटात ह्रता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.