पावनखिंडीत बाजीप्रभूंचा महापराक्रम पाहा उद्याच्...

पावनखिंडीत बाजीप्रभूंचा महापराक्रम पाहा उद्याच्या भागात (Thrilling Battle Of Pavankhind To Be Telecast In ‘Jai Bhavani Jai Shivaji’ Serial)

बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा पावनखिंडीतला झंझावात हे इतिहासातलं महत्वाचं पान. शिवरायांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावत सिद्दी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीमध्येच रोखून धरलं. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू वाघासारखे लढले. बाजीप्रभूंच्या समर्पणाने पावन झालेल्या या खिंडीला म्हणूनच पावनखिंड असं नाव पडलं. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून इतिहासातला हा महत्त्वाचा अध्याय पुन्हा जिवंत होणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पुन्हा जिवंत करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण प्रधान याने आपली भावना व्यक्त करताना म्हटलं आहे –  ‘पावनखिंड इतक्यात नको… पुढे जाईल तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूटचा दिवस आठवतो. नुकताच तापातून उठून प्रोमोशूटला गेलो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रोमो. त्यादिवशी अजिंक्य देव यांना भेटलो. पहिलीच भेट! संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. सर, अजिंक्यजी असे कोणतेही पर्याय न देता भेटताक्षणी तो अजिंक्य दादा झाला. प्रोमो शूट संपले आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार. अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची. एरवी खूप बोलणारा मी मात्र अजिंक्य दादा आणि मी सेट वर असलो आणि वेळ मिळाला की बोलावेसे वाटायचे, शेअर करावेसे वाटायचे.

दादा एक उत्तम श्रोता, शांत आणि खऱ्या स्वभावाचा, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड. आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हसतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही… आणि अनुभवी असूनही प्रचंड मेहनती. ५ महिन्यांचा त्याच्यासोबतचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला. ५ महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार या विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय.. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांना गमावल्यानंतर राजांना काय वाटलं असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून, पण ओलावा जपून! अजिंक्य दादा, लवकरच भेटू… नवीन भूमिकेत आणि आपापल्या भूमिकेतही!