बर्फात राहणारे पवित्र तीर्थक्षेत्र (This Pilgri...

बर्फात राहणारे पवित्र तीर्थक्षेत्र (This Pilgrimage Destination Remains Under Snow Layers For Six Months)

बर्फात राहणारे पवित्र तीर्थक्षेत्र


आता आपल्याकडे हिवाळ्यातही सहलीवर जाण्याची कल्पना अधिक लोकप्रिय होतेय. एवढेच काय पण हिवाळ्यात लोक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देखील निवडक ठिकाणी जातात. तेव्हा सहा महिने बर्फात असणार्‍या केदारनाथ धामची यात्रा करण्याचा पर्याय उत्तम आहे.
प्रत्येक ऋतूचं असं काही ना काही वैशिष्ट्य असतं. लोक उन्हाळ्यात केवळ सुट्टी असते म्हणून प्रवासाला निघतात पण प्रवासासाठी उत्तम दिवस कोणते असतील तर ते, हिवाळ्याचे दिवस! या दिवसांमध्ये शरीराला घातक ठरणारं ऊन किंवा अडचणीत टाकणारा पाऊस अशा कोणत्याही अडचणी समोर उभ्या राहात नाहीत. सध्या मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. पूर्वी कडाक्याच्या थंडीत फिरण्यासाठी कोणी फारसं उत्सुक नसायचं किंवा काही जण अजूनही नसतात. पण आता आपल्याकडे हिवाळ्यातही सहलीवर जाण्याची कल्पना अधिक लोकप्रिय होतेय. एवढेच काय पण हिवाळ्यात लोक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देखील निवडक ठिकाणी जातात. तुम्हीही बर्फाच्छादित असं काही पाहू इच्छित असाल तर सहा महिने बर्फात असणार्‍या केदारनाथ धामची यात्रा करण्याचा पर्याय उत्तम आहे. तेथील पर्यटनाच्या निमित्ताने या धामाशी संबंधित एक कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

त्रिकोणी शिवलिंग
हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे तीर्थक्षेत्र, हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्रांपैकी एक समजले जाते. हे मंदिर सहा सहा महिने पूर्ण बर्फाच्छादित असते. असे मानले जाते की, येथे भगवान शिव त्रिकोण शिवलिंग म्हणून वास्तव्य करतात.
खरंतर पौराणिक कथांमध्ये या धामशी संबंधित अनेक कथा ऐकिवात आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला या धामशी संबंधित महाभारतातील एक कथा सांगणार आहोत. ज्यामध्ये भगवान शिव यांनी पांडवांना येथे दर्शन दिले होते, असे सांगितले जाते. त्यानंतर पांडवांनी येथे हा धाम स्थापन केला. या मंदिराचा आणि पांडवांचा काय संबंध आहे हे आपण जाणून घेऊया…

केदारनाथशी संबंधित रंजक कथा..
धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेखिल्या गेलेल्या आख्यायिकेनुसार महाभारतामध्ये युद्धात विजय मिळाल्यानंतर पांडवांपैकी थोरले युधिष्ठिर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर युधिष्ठिराने जवळजवळ चार दशके हस्तिनापुरवर राज्य केले. या काळात एके दिवशी पाच पांडव भगवान श्रीकृष्णासमवेत बसून महाभारत युद्धाचा आढावा घेत होते. आढावा घेत असताना पांडव श्रीकृष्णाला म्हणाले, हे नारायणा, आम्हा भावंडांवर ब्रम्ह हत्येसह आपल्या भावांचा वध केल्याचं पाप आहे. हा कलंक कसा काढायचा?
त्यावर श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की, हे खरे आहे की तुम्ही युद्ध जिंकलात, तरी आपल्या गुरू व बांधवांना ठार मारल्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार झाला आहात. या पापांतून तारण मिळणे अशक्य आहे. परंतु या पापांपासून फक्त महादेवच तुम्हाला मुक्त करु शकतात. तेव्हा तुम्ही महादेवांच्या आश्रयाला जा. एवढे बोलून श्रीकृष्ण द्वारकेला परतले.
त्यानंतर, पांडव, पापांपासून मुक्ती कशी मिळेल याच्या चिंतेत राहू लागले. अखेर त्यांनी राजकाज सोडावं आणि शिवाच्या आश्रयाला जावं असा विचार केला.

पांडवांनी द्रौपदीसह हस्तिनापूर सोडले
दरम्यान, एक दिवस पांडवांना कळतं की, वासुदेव यांनी आपला देह सोडून दिला आहे आणि ते आपल्या परम निवासस्थानात परतले आहेत. हे ऐकून पांडवांनासुद्धा पृथ्वीवर जगणे योग्य वाटत नाही. गुरू, पितामह आणि सखा हे सर्व रणांगणात मागे राहिले होते. आई, वडील आणि काका विदूरही वनवासात गेले होते. नेहमीच मदत करणारे कृष्णही आता नव्हते. अशा स्थितीत पांडवांनी राज्य परीक्षितच्या ताब्यात दिले आणि द्रौपदीला सोबत घेऊन हस्तिनापूर सोडले आणि महादेवांच्या शोधात निघाले.

पांडवांना पाहून महादेव लपले
हस्तिनापूर सोडल्यानंतर पाच भाऊ आणि द्रौपदी प्रथम भगवान शिवला भेटण्यासाठी पांडवकाशीला पोहोचले, पण तेथे त्यांची शिवाशी भेट झाली नाही. त्यानंतर त्यांनी इतर अनेक ठिकाणी भगवान शिवला शोधण्याचा प्रयत्न केला. पण जिथे जिथे हे जात होते शिव तेथून निघून जात असत. मग एक दिवस पाच पांडव आणि द्रौपदी महादेवांच्या शोधात हिमालयात गेले.
इकडे, जेव्हा महादेवांनी या लोकांना पाहिले तेव्हा ते लपून बसले, परंतु युधिष्ठिराने भगवान शिव यांना लपताना पाहिले. तेव्हा युधिष्ठिराने भगवान शिव यांना सांगितले की, तुम्ही कितीही लपून राहिला तरी प्रभु, आम्ही तुम्हाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही आणि हे देखील मला माहीत आहे की आम्ही पाप केले म्हणून आपण लपून बसले आहात.

बैलाचं धड लिंगात बदललं
युधिष्ठिरांनी असे म्हटल्यानंतर पाच पांडव पुढे जाऊ लागले. त्याचवेळी त्यांच्यावर बैलाने जोरदार हल्ला केला. हे पाहून भीमानं त्याच्याशी युध्द सुरू केलं. दरम्यान, बैलानं आपलं डोकं खडकांमध्ये लपविलं, त्यानंतर भीमानं त्याची शेपूट खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या वळूचं धड डोक्यापासून वेगळं झालं आणि बैलाचं धड लिंगात बदललं. काही वेळानं भगवान शिव लिंगातून प्रकट झाले. अन् शिवने पांडवांची पापं माफ केली.
आजही या घटनेचा पुरावा म्हणून शिवलिंगाची पूजा केदारनाथ मंदिरात केली जाते. भगवान शिव यांना समोर पाहून पांडव त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि त्यानंतर भगवान शिव यांनी पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगितला. पांडवांना त्यांच्या सर्व पापांतून मुक्ती मिळाली. मग ते अंतर्ध्यान झाले. त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज तेच शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते.
महादेवांनी स्वतः येथे पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखविला होता, म्हणूनच हिंदू धर्मात केदारनाथ हे मोक्षस्थळ मानले जाते. असे मानले जाते की, जर कोणी केदारनाथ दर्शनाचा संकल्प घेऊन निघत असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.