समलिंगी जोडप्याचे करवाचौथ : या जाहिरातीने माजवल...

समलिंगी जोडप्याचे करवाचौथ : या जाहिरातीने माजवली खळबळ (This Karva Chauth Ad Featuring Same Sex Couple Creates Sensation)

मागील काही दिवसांपासून अशा अनेक जाहिराती येत आहेत ज्या वादातीत ठरत आहेत. अलिकडेच आलेली आलिया भट्टची जाहिरात, त्यानंतर आमिर खानची दिवाळी जाहिरात आणि आता आणखी एक जाहिरात आली आहे, ज्याला सोशल मीडियावर एकीकडे मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे, तर काही लोक त्याचे कौतुकही करत आहेत.

करवाचौथ हा सण महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करुन साजरा करतात. एका समलिंगी जोडप्याने हा सण साजरा केला अशी जाहिरात नुकतीच समोर आली आहे. या जाहिरातीने खळबळ माजवली आहे. नेटकऱ्यांनी या जाहिरातीवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. मात्र सगळ्याच प्रतिक्रिया या जाहिरातीच्या विरोधातल्या नसून काही या जाहिरातीचं समर्थनही करत आहेत.

२२ ऑक्टोबरपासून ही जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे. या जाहिरातीत दोन महिला एकमेकींना करवाचौथसाठी तयार करत आहेत. एकमेकांच्या चेहऱ्यावर ब्लीच लावत आहेत. हे करत असतानाच त्या दोघी करवाचौथचं महत्त्व आणि उपवास का करायचा याबाबत चर्चा करत आहेत. या व्हिडिओच्या अगदी शेवटी कळतं की ह्या दोघी महिला एकमेकींसाठी करवाचौथचं व्रत करत आहेत. चंद्राला पाहून उपवास सोडण्याची प्रथा या दोघीही पार पाडताना दिसत आहेत.

या व्हिडिओ क्लिपमध्ये डाबर कंपनीच्या फेम या ब्लीचची जाहिरात करण्यात आली आहे. या कंपनीच्या लोगोमध्ये एलजीबीटीक्यू चळवळीचं प्रतीक असलेल्या इंद्रधनुष्यातल्या रंगांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. त्यासोबत Glow with pride असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

ही क्लिप ऑनलाइन प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यापैकीच काही प्रतिक्रिया इथे जाणून घ्या.

समलिंगी जोडपं अशा पुरुषप्रधान प्रथा का पाळत आहेत, असा सवालही काही जणांनी विचारला आहे. तर या प्रोडक्टने वर्णभेदाचा पुरस्कार केला आहे, त्यात केवळ एलजीबीटीक्यू बाजू मांडल्याने सत्य बदलणार नाही, असं मतही काही जणांनी व्यक्त केलं आहे. तर काही लोक डाबर कंपनीला या जाहिरातीसाठी अनेक शुभेच्च्छा देत आहेत.