रणवीर सिंह पत्नी दीपिकाकडून काम करुन घेण्यासाठी...

रणवीर सिंह पत्नी दीपिकाकडून काम करुन घेण्यासाठी अशी लढवतो शक्कल (This is How Ranveer Singh Impresses Wife Deepika Padukone for His Work, Actor Himself Revealed)

बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक असलेले दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दीपिका सध्या आपल्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे, तर तिचा पती रणवीर सिंह त्याच्या ‘सर्कस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटाची टीम सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये गेली होती, तिथे एका मजेदार टास्कदरम्यान रणवीर सिंहने दीपिका पादुकोणबद्दलचे एक सत्य समोर आणले.

शोमध्ये सलमान खानने लाय डिटेक्टरद्वारे सत्य शोधणे असा एक मजेदार टास्क ठेवला, त्यात सलमान रणवीर सिंहला मजेदार प्रश्न विचारतो. तो प्रश्न त्याची पत्नी दीपिका पादुकोणशी संबंधित होता,  त्या प्रश्नाची उत्तरे अभिनेत्याने अतिशय प्रामाणिकपणे दिली.

सलमान खानने रणवीरला विचारले की, एखादे काम करुन घेण्यासाठी तू पत्नी दीपिकाला मस्का लावण्यासाठी कधी आय लव्ह यू म्हटले आहे का? याचे उत्तर देताना रणवीर म्हणला की हो मी तसे केले आहे. अभिनेत्याने पुढे सांगितले की, वैवाहिक जीवनात कामं करुन घेण्यासाठी कधीकधी हे करावे लागते. पत्नीशी गोड आणि प्रेमाने बोलले पाहिजे.

अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याला दीपिकाकडून काही काम करवून घ्यायचे असेल तेव्हा मी त्यासाठी अगोदर फिल्डिंग लावतो,  दोन दिवसांनी मला माझ्या पत्नीकडून काहीतरी करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी दोन दिवस अगोदर मी पत्नीला इम्प्रेस करून तिला मस्का लावायला सुरुवात करतो.

यानंतर, रणवीरला विचारले की तुला बिग बॉसचे सूत्रसंचालन करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर रणवीर गप्प बसतो, त्यानंतर रोहित शेट्टीकडे इशारा करत सलमान रणवीरला विचारतो की, ते माझ्यानंतर शोचे सूत्रसंचालन करणार का? यावर रणवीर सलमानच्या म्हणण्याचा पुनरुच्चार करतो. त्यानंतर रोहित शेट्टीने सांगितले की बिग बॉसचे सलमान खानपेक्षा चांगले सूत्रसंचालन कोणीही करू शकत नाही.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे बी-टाऊनचे सर्वात रोमँटिक आणि आवडते कपल मानले जाते. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले, त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.