२१ हजार लोकांना लस देण्याचा विक्रम करणारी आरोग्...
२१ हजार लोकांना लस देण्याचा विक्रम करणारी आरोग्यसेविका (This Health Worker Inoculated 21 Thousand Vaccines : Record Making Achievement By A Woman)


करोनास प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचे काम देशभर चालू आहे. प्रत्यक्ष लस देण्याचे काम महत्त्वाचे असते. जे आरोग्य सेविका करत आहेत. यामध्ये विक्रमी कामगिरी करणारी एक आरोग्य सेविका आम्हाला गवसली आहे. तिने तब्बल २१ हजारांहून अधिक लोकांना ही लस टोचली आहे.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस
ही अफलातून कामगिरी करणारी आहे, हिमाचल प्रदेशातील कर्मो देवी. उना जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलात काम करणाऱ्या या कर्मो देवीने, एकटीने २१ हजार व ९०० हून अधिक लोकांना लशी देऊन अद्भूत कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या हॉस्पिटलात एकूण ३५ हजार लोकांना लशी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी कर्मो देवीने या लशींचा आकडा पाहता, एकूण लसवंतांच्या दोन तृतियांश भाग तिने उचलला आहे.
कर्मो देवी ५२ वर्षांची आहे. मार्च महिन्यात लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला तेव्हा या हॉस्पिटलातील कर्मचारी वर्ग साशंक होता. पण कर्मो देवीने न घाबरता पुढाकार घेतला. ती म्हणते,”मी घाबरले नाही. करोना व्हायरसपासून संरक्षण देणारे, लस हे एकमेव साधन आहे. स्वतःची काळजी घेऊन मी दररोज कामावर जात राहिले.”
हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी कर्मो देवीच्या या अथक सेवेची माहिती देताना सांगितले की, तिने रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील आपले काम चोख केले आहे. जुलै महिन्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. अन् डॉक्टरांनी तिला ४ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण कामाची आस्था असलेली कर्मो देवी ८ दिवसातच कामावर परतली. अन् प्लॅस्टर केलेल्या पायाची पर्वा न करता आपले लसीकरणाचे काम सुरू ठेवले.
कर्मो देवीच्या या समर्पित कामगिरीबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तिचा यथोचित गौरव करणार आहेत.