अतिशय क्रेझ असलेलं ‘कौल चिक...

अतिशय क्रेझ असलेलं ‘कौल चिकन’ (This Chicken Recipe Has Immense Craze)

रायगड मध्ये माळरान आणि लाकूड फाटा मुबलक प्रमाणात असल्यामुळे व अतिशय कमी सहित्य वापरून झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून कौल चिकन प्रचलित आहे. कमी खर्चात व साध्या पद्धतीने तयार करण्यात आलेले कौल चिकन खवय्यांसाठी उत्तम मेजवानी आहे. 
थंडीच्या दिवसांत रायगड जिल्ह्यात पोपटीची लगबग असते. अशा वेळी खवय्यांची पोपटी सोबत कौल चिकनलासुद्धा तेवढीच मागणी असते. अनेक खवय्ये पोपटीसोबत साईड डिश म्हणून कौल चिकनला पसंती देतात.
 घराच्या अंगणात किंवा रानात जाऊन दगडाची चुल मांडून त्यावर कौल ठेवून गरम झालेल्या कौलावर चिकन चांगले भाजून घेतलेले चिकन म्हणजेच ‘कौल चिकन’. स्थानिक लोकांना व खास करून मुंबईकरांना कौल चिकनची फार क्रेझ आहे.  हे कौल चिकन कसे करायचे ते पाहुया.

कौल चिकनची पद्धत – पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून त्यास मॅरीनेट करावे. चिकन मॅरीनेट करण्यासाठी लाल तिखट, हळद, लिंबू, तेल व मीठ यांचं मिश्रण करून ते चिकनला व्यवस्थित लावून घ्यावे. मॅरीनेट केलेले चिकन एक – दीड तास तसेच ठेवावे. त्यानंतर कौल (गावच्या ठिकाणी कौलारू घरं असतात, ते कौल) स्वच्छ करून घ्या. दगडाची चूल मांडा. त्यावर कौल ठेवून खाद्यतेल टाकून  कौलाच्या गरम आचेवर मॅरीनेट चिकन खरपूस भाजून घ्या, सर्व बाजूनी चिकन भाजले गेले पाहिजे. चिकन खरपूस भाजून झाल्यावर त्यावर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर लावून चिकन चाखून बघा आणि कौल चिकनचा आस्वाद घ्या.
 –  राजेश दाभाडे