वादग्रस्त विधाने करून माफी मागितलेले टी. व्ही. ...

वादग्रस्त विधाने करून माफी मागितलेले टी. व्ही. कलाकार (These T. V. Celebs Had To Apologize For Their Controversial Statements)

टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांना यश मिळाले की पचवता येत नाही. बेताल विधान करण्यात ते धन्यता मानतात. अन्‌ मग लोकांचा रोष ओढवून घेतात. वाट्टेल ते बोलण्याने प्रकरण अंगलट आलं की, माफी मागून मोकळे होतात. अलिकडेच युविका चौधरी वर अशी आफत आलेली आहे. पण वादग्रस्त विधाने करायची अन्‌ मग जनता जनार्दनासमोर माफीचे लोटांगण घालायचे, असा प्रसंग आलेले हे बघा टी. व्ही.चे काही कलाकार :

युविका चौधरी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘बिग बॉस’ च्या ९व्या भागातून नावारूपास आलेल्या युविका चौधरीने आपला नवरा प्रिंस नरूलाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये युविकाने ‘भंगी’ हा शब्द वापरला. त्यावरून ती ट्रोलिंगच्या तावडीत सापडली. अन्‌ लोकांनी चिक्कार गदारोळ केल्यावर युविकाला माफी मागावी लागली. मी असं जाणूनबुजून केलेलं नाही. यामध्ये कुणाला दुखविण्याचा माझा हेतू नव्हता, असं वापरून गुळगुळीत झालेलं विधान तिनं केलं.

आदित्य नारायण

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘इंडियन आयडॉय १२’ चा सूत्रधार असेलला आदित्य नारायणने ‘अलिबाग’ हा शब्द वापरला. अलिबाग शब्दाने गंमत केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते भडकले नि त्यांनी निर्मात्याकडे माफीची मागणी केली. त्यामुळे आदित्यने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपल्या विधानाबाबत माफी मागितली. मी काय अलिबागहून आलोय्‌ असं तुला वाटलं का, असं त्याने स्पर्धक सवाई भट्टला विचारलं होतं.

मुनमुन दत्ता

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिताने एका व्हिडिओत जातीवाचक शब्द वापरला म्हणून एस. सी. आणि एस. टी. ॲक्टखाली तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. मला चांगलं दिसायचं आहे, भंगीसारखं नाही, असं बेफाम विधान मुनमुनने केलं. त्याच्याने लोक भडकले आणि मुनमुनने जाहीर माफी मागितली.

सुनील पाल

विनोदवीर म्हणून नावारूपास आलेल्या सुनील पालवर देखील माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे. त्याने कोविड १९ च्या संदर्भात डॉक्टर मंडळींना चोर आणि राक्षस म्हटले होते. हा कथित व्हिडिओ पाहून अंधेरी पोलिसांनी सुनील पालच्या विरोधात एफ. आय. आर. नोंदवला आहे. ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसांसारखे कपडे घातले आहेत. तर १० टक्के डॉक्टर्स अद्यापही लोकांची सेवा करत आहेत, असं विधान त्यानं केलं होतं. त्यावरून हे वादंग माजलं.

कपिल शर्मा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

आपल्या विनोदी सूत्रसंचालनाने श्रोत्यांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माला गंभीर आरोपांना तोंड द्यावं लागलं होतं. त्याने कायस्थ लोकांवर टीका केली होती. त्यावरून त्याला माफी मागावी लागली. त्याने लिहिलं होतं – ‘डियर कायस्थ कम्युनिटी, २८ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागात श्री चित्रगुप्ताच्या चित्रणाने आपल्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल मी आपल्या पूर्ण टीमसह खेद व्यक्त करतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.

मुकेश खन्ना

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्नाने ‘मी टू’ आंदोलनाच्या काळात विवादास्पद विधान केलं होतं. पुरुष आणि स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारे घडवलं आहे. महिलांनी घराचा भार उचलला पाहिजे. महिलांनी काम करायला सुरुवात केल्यामुळे ‘मी टू’ ला सुरुवात झाली आहे, हे सांगताना मला वाईट वाटते; असे मुकेश बोलला होता. मात्र या विधानावरून त्याला पुढे माफी मागावी लागली होती.