नैराश्यग्रस्त झालेल्या या टॉप टी.व्ही. अभिनेत्र...

नैराश्यग्रस्त झालेल्या या टॉप टी.व्ही. अभिनेत्री : आत्महत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती (These T.V. Actresses Have Become Victims Of Depression, Had Even Made Up Their Mind To Commit Suicide)

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये नैराश्य ही एक सामान्य समस्या बनली आहे. सामान्य माणसापासून ते विशेष व्यक्तींपर्यंत प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने नैराश्यातून जावं लागलं असल्याचं दिसून येत आहे. आपल्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातील कलाकार मंडळीदेखील यास अपवाद नाहीत. करिअरच्या यशोशिखरावर असलेल्या सुशांत सिंग राजपूतचंच उदाहरण घ्या. दरम्यान मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यादृष्टीने अनेक टी. व्ही. अभिनेत्रींनी आपल्या नैराश्याबाबत मोकळेपणाने खुलासे केले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

काम्या पंजाबी – अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी देखील नैराश्यग्रस्त झाली होती. नैराश्यासोबतच्या तिच्या लढाईबद्दल अभिनेत्री उघडपणे बोलली. तिने सांगितले होते की शभल डांगसोबत लग्न आणि त्यानंतर अभिनेता करण पटेलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती नैराश्यामध्ये गेली होती. कुठल्यातरी बंदिवासात ती आयुष्य घालवत आहे असं तिला वाटलं होतं. तिला यातून बाहेर येऊन सामान्यपणे जीवन जगण्यासाठी अनेक सत्रे लागली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जास्मिन भसीन – बिग बॉस आणि नागिन फेम अभिनेत्री जास्मिन भसीनने इंडस्ट्रीतील तिच्या संघर्षमय दिवसांबद्दल सांगितले. ती इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. याचा खुलासा करताना अभिनेत्रीने सांगितले की, तिला वारंवार नाकारलं गेल्यानंतर तिचा आत्मविश्वास जवळजवळ संपला होता. हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. तिला नैराश्यातून बाहेर यायला खूप वेळ लागला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रुबीना दिलैक – आजच्या काळात टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली रुबिना दिलैक देखील नैराश्याची शिकार झाली आहे. ‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबीना यावर खूप मोकळेपणाने बोलली होती. अभिनेत्रीने बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये नैराश्य, राग आणि आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितले होते. आपल्या नैराश्याला कारणीभूत असलेल्या अपयशी नात्याबद्दल तिने सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली होती की, “माझ्या आई-वडिलांसोबत माझे संबंध फारसे चांगले नव्हते. मला खूप राग यायचा आणि आत्महत्येची प्रवृत्तीही होती. माझ्या ब्रेकअपचे कारणही हेच होते. मी ८ वर्षांपूर्वी अशीच होते आणि याच कारणामुळे माझ्या नात्यातही समस्या होत्या.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अंकिता लोखंडे – अभिनेत्री अंकिता लोखंडेने एकदा इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना तिच्या नैराश्याबद्दल खुलासा केला होता. त्यात तिने सुशांत सिंग राजपूतशी ब्रेकअप आणि सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला असल्याचे कारण सांगितले होते. अंकिता म्हणाली होती की, “माझी अवस्था खूप वाईट होती, मला खूप त्रास होत होता, मी खूप रडले होते. पण माझ्याकडे फक्त माझे कुटुंब, मित्र आणि काही चाहते होते, जे सुरुवातीपासून माझ्यासोबत राहिले.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रश्मि देसाई – सुपरिचीत गोड चेहऱ्याच्या रश्मि देसाईने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. नॅशनल टीव्हीवर फसवणुकीला बळी पडण्यापासून ते लग्न मोडण्यापर्यंत अनेक अडचणींचा तिला सामना करावा लागला आहे. ‘बिग बॉस १३’ दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या बालपणीच्या सर्वात वाईट दिवसांबद्दल सांगितले. रश्मीने सांगितले होते की, ती मुलगी आहे, त्यामुळे तिचे वडील तिची खूप चेष्टा करायचे. वडिलांच्या या सवयीमुळे ती इतकी अस्वस्थ झाली की तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे ती मोठी झाल्यावरही संकटांनी तिची साथ सोडली नाही. या कारणांमुळे ती नैराश्यामध्ये गेली. जवळजवळ ४ वर्षे ती नैराश्यग्रस्त होती.