प्रसिद्धी मिळताच आपल्या पहिल्या प्रेमाशी प्रतार...

प्रसिद्धी मिळताच आपल्या पहिल्या प्रेमाशी प्रतारणा केलेल्या अभिनेत्री (These Stars Left The First Love As Soon As They Got Fame)

टेलिव्हिजन असो वा बॉलिवूड येथील स्टार मंडळींना घरोघरी चाहत्यांच्या मनात इतकं मोठं स्थान असतं की ही मंडळी त्यांच्या घरातील सदस्यांप्रमाणे त्यांना जवळची वाटू लागतात. या चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराविषयीच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात अतिशय रस असतो. मग ती गोष्ट चांगली असो वा न पटणारी असो तरी… आज बॉलिवूडमधील अशा काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेऊया ज्यांनी चित्रपटांत पहिल्या प्रेमाचे कितीही गोडवे गायले असले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र प्रसिद्धी मिळताच आपल्या पहिल्या प्रेमाशी प्रतारणा केलेली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दीपिका पादुकोण – दीपिका पादुकोण चित्रपटांत येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. त्यावेळेस अभिनेता निहार पांड्यासोबत तिचं सूत जुळलं होतं. हिमेशच्या गाण्याच्या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. पुढे दीपिकाला चित्रपट मिळू लागल्यानंतर हळूहळू निहारसोबतचं नातं संपुष्टात आलं आणि ती रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. त्यांच्यातील प्रेम पाहून दीपिका रणबीरसोबत लग्न करणार असं वाटत असतानाच त्यांच्यातील नातंही संपलं. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंहसोबत लग्न केलं. सध्या रणबीर कपूर आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर निहार पांड्यानेही प्रेमात धोका खाल्ल्यानंतर नीति मोहनसोबत लग्न केलं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रणबीर कपूर – रणबीर कपूरच्या प्रेमप्रकरणांबद्दल काय सांगायचं, सगळ्यात आधी अवंतिकासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता, जी आता इमरान खानची बायको आहे. अवंतिकाने बाल कलाकार म्हणून ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकेत काम केलं होतं. त्यावेळेस रणबीर अवंतिकाला भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर जात असे. परंतु त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. पुढे अवंतिकानं लग्नही केलं आणि रणबीर मात्र अजूनही बॅचलर आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आलिया भट्ट – सध्या रणबीर कपूरला डेट करत असलेली आलिया भट्ट चित्रपटांत येण्यापूर्वी अली दादरकरला डेट करत होती. अली आणि आलिया हे दोघे बालपणीचे मित्र होते. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर आलिया एकामागोमाग एक यश मिळवत गेली आणि अली मात्र मागे पडत गेला. त्यातच त्यांच्यातील प्रेमाचा लवलेशही कमी होत गेला. सध्या आलिया आणि रणबीर यांच्यातील प्रेमप्रकरण फारच गाजत आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रियंका चोप्रा – चित्रपटांत यश मिळण्यापूर्वी देसीगर्ल प्रियंका चोप्रा असीम मर्चेंटच्या प्रेमात होती. असं म्हणतात की, प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर असीम मर्चेंटसोबत असलेलं नातं संपवून टाकलं. २०१४ साली असीमने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, तो प्रियंकाच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट बनवू इच्छितो. त्याचे हे बोल ऐकल्यानंतर प्रियंकाच्या रागाचा पारा फार चढला होता. तिने असीमला त्यासाठी अधिकृत नोटीसही बजावली होती. प्रियंकाच्या वर्तमानाबाबत बोलायचं तर तिने निक जोनसशी लग्न केले असून ती तिच्या संसारात सुखी आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अनुष्का शर्मा – पहिल्याच चित्रपटाने दर्शकांचं हृदय जिंकलेली अनुष्का शर्मा तिच्या संघर्षाच्या दिवसांत बेंगलुरूच्या जोहेबला आपलं हृदय देऊन बसली होती. परंतु यश मिळताच दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. नंतर अनुष्कानं क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं.