बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी या कलाकारांन...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी या कलाकारांनी केले होते लग्न (These Stars Got Married Before Becoming Famous in Bollywood, Know The List)

अनेक बॉलिवूड कलाकार वर्षानुवर्षे आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. या कलाकारांनी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली.  चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी लग्न केले. आणि लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत यशाची चव चाखली.

शाहरुख खान

शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाला ३१ वर्षे झाली आहेत. या जोडप्याने 25 ऑक्टोबर 1991 ला  नवी दिल्लीत लग्न केले. शाहरुखचे  लग्न झाले त्यावेळी तो फारसा लोकप्रिय नव्हता शिवाय त्याचे चित्रपटात पदार्पणही झाले नव्हते.  त्यावेळी तो मालिकांमध्ये काम करत होता.  त्याने ‘दिल दरिया’, ‘फौजी’, ​​’सर्कस’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. लग्नाच्या सुमारे एक वर्षानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1992 मध्ये आलेल्या ‘दीवाना’ चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवले.

सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यानेही प्रसिद्ध होण्यापूर्वी लग्नगाठ बांधली होती. सैफ अली खानने लग्नाच्या जवळपास दोन वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सैफने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले आणि 1993 मध्ये त्याचा पहिला ‘आशिक आवारा’  हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, 2004 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. या जोडप्याला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले, तर १९८८ मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ प्रदर्शित झाला होता. आमिर खान आणि रीनाला, जुनैद आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. मात्र, 2002 मध्ये आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला.

अनिल कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अनिल कपूर यांचा ‘हमारे तुम्हारे’ हा पहिला चित्रपट 1979 साली प्रदर्शित झाला असला, तरी त्यांना खरी ओळख 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टपोरी’ चित्रपटातून मिळाली. त्याच वर्षी त्यांनी कॉस्च्युम डिझायनर सुनीता भंभानीशी लग्न केले. या जोडप्याला सोनम, रिया आणि हर्षवर्धन कपूर ही तीन मुले आहेत. या दोघांच्या लग्नाला 38 वर्षे झाली.

आयुष्मान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्मान याने सुद्धा प्रसिद्ध होण्यापूर्वी लग्न केले. 2012 मध्ये आयुष्मानचा ‘विकी डोनर’ चित्रपट रिलीज झाला होता. त्याआधी 2011 मध्ये त्याने आपली बालपणीची प्रेयसी ताहिरा कश्यपसोबत लग्न केले होते.

अर्जुन रामपाल

मॉडेलिंगच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता अर्जुन रामपालने 2001 मध्ये ‘प्यार, इश्क और मोहब्बत’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तीन वर्षे आधी 1998 मध्ये त्यांनी माजी मिस इंडिया आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले. अर्जुनला  लग्नानंतरच फिल्मी दुनियेत प्रसिद्धी मिळाली. 21 वर्षांच्या लग्नानंतर 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

चित्रांगदा सिंग

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री चित्रांगदा सिंगने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. अभिनेत्रीने 2003 मध्ये ‘हजारों ख्वैसे ऐसी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु तिने पदार्पणाच्या दोन वर्षे आधी 2001 मध्ये गोल्फर ज्योती सिंह रंधवाशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.