चहाचे शौकीन बॉलिवूड कलाकार (These Famous Bollyw...

चहाचे शौकीन बॉलिवूड कलाकार (These Famous Bollywood Stars are Fond of Drinking Tea)

सध्या पावसाचे दिवस आहेत. बाहेर मस्त पाऊस बरसत असताना त्या नैसर्गिक गारव्यात सगळ्यात आधी आठवण होते, ती म्हणजे फक्कड चहा झाला पाहिजे… नंतर मग भजी, सुप वगैरे वगैरे… पण आधी चहाच…! एरव्ही देखील आपल्या देशातील बहुतांश लोकांची सकाळ मस्त वाफाळणाऱ्या गरमागरम चहाने होत असते. काहीजण तर चहाचे इतके तलफी असतात की ते चहा पिण्याचे निमित्त शोधत असतात. शोले सिनेमातील गब्बरसिंग उर्फ अमजदखान हा इतका चहाप्रेमी होता की दिवसातून तीसेक काय त्याहून अधिक कप चहा तो सहज रिचवायचा. म्हणजेच सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच चहा हा हवाच…! चहाचे शौकीन असलेल्या या स्टार मंडळींमध्ये कार्तिक आर्यन ते तारा सुतारिया यांसारख्या तरुण कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार चहा पिण्याचे शौकीन आहेत?

कार्तिक आर्यन

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील तरुण कलाकारांपैकी एक असलेल्या कार्तिक आर्यनने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. भुलभुलैया-२ या चित्रपटाच्या भरघोस यशामुळे सध्या चर्चेत असलेल्या कार्तिकला चहा पिण्याची खूप आवड आहे. कार्तिक आर्यनने अनेक वेळा आपले चहावरील प्रेम व्यक्त केले असून अलीकडेच हातात चहाचा कप घेऊन त्याने आपला हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

तारा सुतारिया

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक तारा सुतारियाही चहा पिण्याची शौकीन आहे. चहा पितानाचा आपला एक फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना याची ग्वाही दिली होती. या फोटोमध्ये तारा चहाच्या कपसोबत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना दिसली होती.

दीपिका पादुकोण

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणला देखील चहाचे व्यसन आहे. मात्र, फिटनेसचा विचार करून ती दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी पिण्यास प्राधान्य देते. ग्रीन टी वरील तिचे प्रेम पाहण्यासारखे आहे.

कतरीना कैफ

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलीवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ तिच्या फिटनेसबाबत खूप दक्ष असली तरी जेव्हा चहाचा प्रश्न येतो तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. मात्र, कॅट दुधाच्या चहाऐवजी लेमन टी पिणे पसंत करते.

करीना कपूर खान

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

जास्त चहा प्यायल्याने त्वचा काळी पडते असा काहींचा समज असतो, त्यांनी आपल्या लाडक्या  करीना कपूरकडे एक नजर टाकल्यास त्यांचा हा समज दूर होईल. कारण बॉलीवूडच्या सर्वात ग्लॅमरस मानल्या जाणाऱ्या करीना कपूर खानला चहा प्यायला आवडतो.

माधुरी दीक्षित

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितला देखील चहाची क्रेझ आहे. ती खूप आनंदाने चहा पिण्याची मजा घेते. तिने स्वतःचा चहाची मजा घेतानाचा एक फोटो शेअर करून त्याची झलक दिली आहे. यासोबतच तिने सांगितले होते की, तिची चहा बनवण्याची पद्धतही खूप खास आहे.

मलायका अरोरा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना आणि सुप्रसिद्ध मॉडेल मलायका अरोरा खान ही जेवढी फिटनेस प्रेमी आहे तितकीच ती चहाची तलफीही आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती व्यायाम आणि आहाराची मदत घेते, पण चहा ही तिची कमजोरी आहे. मलायका सवयीने चहा पितेच.