अॅक्टर झाले डॉक्टर ( These Doctors Became Actor...

अॅक्टर झाले डॉक्टर ( These Doctors Became Actors In Bollywood)

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डॉक्टर लोकांचं मोठं स्थान आहे. काही टॉपचे अॅक्टर पेशाने डॉक्टर आहेत. पण अभिनयाचा कैफ आणि चित्रपटसृष्टीच्या आकर्षणापायी त्यांनी डॉक्टरकीचा त्याग करून अभिनय क्षेत्रात नाव कमावले.

डॉ. श्रीराम लागू

अॅक्टर झालेल्या डॉक्टरांमध्ये श्रीराम लागू यांचा अव्वल नंबर लागतो. कारण त्यांनी हिंदी- मराठी मिळून सुमारे 250 चित्रपट केलेत. पुणे शहरात उत्कृष्ट डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या लागूंनी नाट्यसृष्टीत पदार्पण केले. आधी हौशी व नंतर व्यावसायिक नाटकात विविधांगी भूमिका करून ते नटसम्राट बनले. चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश उशिरानेच झाला. पण इथेही त्यांनी आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.

डॉ. मोहन आगाशे

डॉ. लागूंप्रमाणेच पुणे शहरातून हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेले उत्कृष्ट अभिनेता आहेत डॉ. मोहन आगाशे. हे देखील हौशी व व्यावसायिक मराठी नाटकातून कामे करत चित्रपटसृष्टीत पोहोचले. अन् हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीत नावारूपाला आले. ते अतिशय चांगले प्लास्टिक सर्जन म्हणून नावाजले आहेत. आता उतारवयात देखील ते चित्रपट मालिकातून बिझी असतात. ‘ कारखानिसांची वारी’ या अलीकडेच आलेल्या चित्रपटात त्यांनी आपली छाप पाडली आहे.

मानुषी छिल्लर

२०१७ मध्ये मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड हा किताब मिळवून एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली. ही स्पर्धा जिंकून ती सौंदर्य सम्राज्ञी झाली तेव्हा सोनिपत येथील सरकारी मेडिकल कॉलेजात ती एम.बी.बी.एस. करत होती. नंतर ती डॉक्टर झाली. पण मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात अवतरली.

आदिती गोवित्रीकर

नावाजलेली डॉक्टर असलेल्या अदितीचा प्रवास मॉडेल ते डॉक्टर ते चित्रपटसृष्टीत अभिनेत्री असा आहे. ती उत्कृष्ट स्त्रीरोग तज्ज्ञ व मानसोपचार तज्ज्ञ आहे. या विषयात एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्याआधी रूपाने देखणी असलेली आदिती ‘ ग्लॅडरॅग्ज’ या मासिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट मॉडेल म्हणून निवडली गेली होती. त्यानंतर डॉक्टर होऊन तिने मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स अशा दोन सौंदर्यस्पर्धा जिंकल्या. नंतर ती बॉलिवूड मध्ये आली. मात्र इथे तिची फार डाळ शिजली नाही. पण तिने आपली छाप पाडली आहे.

विनीतकुमार सिंह

जन्नत, गँग्स ऑफ वासेपूर, सांडकी  आंख अशा वेगळ्या चित्रपटातून काम केलेले अभिनेता विनीतकुमार सिंह हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी आयुर्वेदात एम.डी. केलेले आहे. अभिनयाच्या वेडापायी डॉक्टरकी सोडून ते या सृष्टीत आले आहेत.

पलाश सेन

उत्कृष्ट गायक म्हणून बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेले पलाश सेन हे दिल्ली युनिव्हर्सिटी संलग्न कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सचे एम.बी.बी.एस. डॉक्टर आहेत. त्यांचे संपूर्ण घराणे राजवैद्यांचे असून पिढ्यानपिढ्या ही वैद्यकी त्यांच्या घराण्यात चालत आली आहे. आता पलाश पार्श्वगायक म्हणून गाजले असले तरी शाळेत असल्यापासून गायन व नाट्य क्षेत्राची त्यांना ओढ होती.

डॉ. काशिनाथ घाणेकर

मराठी नाट्यसृष्टीत हाऊसफुल्लचा बादशहा म्हणून प्रसिद्ध झालेले डॉ. काशिनाथ घाणेकर उत्कृष्ट डेन्टिस्ट म्हणून आधी प्रॅक्टिस करत होते. बी.डी.एस या पदवीचे ते गोल्ड मेडॅलिस्ट होते. देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या घाणेकरांची नाटक क्षेत्रातील कारकीर्द झंजावाती होती. प्रेक्षकांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते. नंतर ‘पाठलाग’ या मराठी चित्रपटातून ते चित्रपटसृष्टीत आले. २-३ हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

डॉ. गिरीश ओक

अनेक मराठी मालिकेतून व नाटकातून दिसणारे गिरीश ओक नागपूरच्या मेडिकल कॉलेजतील पदवीधर डॉक्टर आहेत. नाटकाच्या वेडापायी डॉक्टरी सोडून ते नाट्यसृष्टीत व नंतर सिनेसृष्टीत व टीव्ही मालिकांमधून उत्कृष्ट अभिनेता म्हणून गाजले. हिंदी चित्रपटात त्यांना फार कमी कामे मिळाली. पण मराठी चित्रपट व मालिकांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.

डॉ. निलेश साबळे

‘ चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे निलेश साबळे हे देखील पेशाने डॉक्टर आहेत. अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या कार्यक्रमाचे ते पहिल्या भागापासून सूत्रसंचालन करत आहेत. आता तर ते लेखक व दिग्दर्शक देखील आहेत. सलमान- शाहरुख खान ते अजय देवगण ,अक्षय कुमार अशा अनेक टॉप स्टार्सच्या फिरक्या त्यांनी या कार्यक्रमातून घेतल्या असल्या तरी त्यांची वर्णी बॉलिवूडमध्ये लागलेली नाही. बोटावर मोजण्याइतक्यातच मराठी चित्रपटात ते दिसले आहेत.