आजारी पाडणाऱ्या स्वयंपाकाच्या सवयी (These Cooki...

आजारी पाडणाऱ्या स्वयंपाकाच्या सवयी (These Cooking Habits Can Make You Sick)

स्वयंपाकाचं काम जितकं शास्त्रशुद्ध आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक होईल तेवढं चांगलंच आहे. त्यासाठी काही चुका टाळणं आवश्यक आहे.

स्वयंपाकघरात वावरणार्‍या, स्वयंपाक करणार्‍या गृहिणीवर घरातल्या सर्व लोकांचं आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. मग हे काम जितकं शास्त्रशुद्ध आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक होईल तेवढं चांगलंच आहे. काही वेळा अगदी क्षुल्लक वाटणार्‍या चुका नकळत घडून जातात परंतु त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. या चुका होऊ नयेत यासाठी फार काही करायचं नसून केवळ त्या चुका लक्षात घेऊन पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे.

तेल जास्त प्रमाणात गरम करणं
स्वयंपाक करताना बरेचदा आपण भांडं गॅसवर ठेवून त्यात तेल घालतो. व तेल गरम होईस्तोवर दुसरं काम करू लागतो. या दरम्यान तेल गरम होऊन त्यातून धूर येऊ लागतो. ते जळलेले तेल आपण तसंच जेवणासाठी वापरतो. जे अतिशय चुकीचं आहे. त्याचप्रमाणे आदल्या दिवशी भजी वा पुरी केल्यानंतर शिल्लक राहिलेलं तेल आपण दुसर्‍या दिवशी पुन्हा गरम करून वापरतो.
तेल जास्त गरम केल्यानं त्यातील पोषण तत्त्वं, अँटी-ऑक्सीडंटही नाहीसे होतात आणि नको असलेली हानिकारक तत्त्वं तेलामध्ये निर्माण होतात. म्हणून तेल जळून धूर येईपर्यंत गरम करू नका. तसंच शिल्लक राहिलेलं तेल पुन्हा गरम करून वापरू नका.

कच्चं आणि शिजवलेलं मांस एकत्र ठेवणं
मांस किंवा मासे कच्चे असताना ज्या भांड्यात ठेवलेले असतात. त्यातच शिजवल्यानंतर ठेवू नका. कच्चं मांस किंवा माशांमध्ये जिवाणू असतात. आपण दुसर्‍या एका पातेल्यात ते शिजवतो, परंतु काही वेळा ज्या पातेल्यात आधी ठेवलेलं असतं. त्यातच शिजल्यानंतर काढतो. हे चुकीचं आहे. यामुळे त्या भांड्याला चिकटलेले कच्च्या मांसातील जिवाणू शिजवलेल्या अन्नाबरोबर आपल्या पोटात जाऊन त्रास होऊ शकतो. असं होऊ नये म्हणून कच्चं मांस किंवा मासे ठेवलेलं भांडं पुन्हा वापरायचं असल्यास ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.

अन्न पूर्णतः थंड झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवणं
बर्‍याच लोकांची अशी समजूत असते की अन्न पूर्ण थंड झाल्याशिवाय फ्रिजमध्ये ठेवायचं नसतं. एका अर्थी हे बरोबर आहे. परंतु, कोणतंही अन्न हे रूम टेंपरेचरला दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिलं तर त्यामध्ये जिवाणू निर्माण होण्याची शक्यता वाढते. तेव्हा कोणतंही अन्न बनविल्यानंतर 2 तासात थंड झालं की ते आत फ्रिजमध्ये ठेवा. दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिलेलं अन्न परत फ्रिजमध्ये ठेवू नका. तसंच गरम अन्नही फ्रिजमध्ये ठेवू नका कारण त्यामुळे फ्रिजमधील टेंपरेचर वाढून फ्रिज बिघडू शकतो.

नॉनस्टिक पॅन मोठ्या आचेवर वापरणं
नॉनस्टिक पॅन स्वयंपाकासाठी वापरत असल्यास ते मोठ्या आचेवर ठेवू नका. कारण त्यामुळे त्यावरील कोटींग जाण्याने परफ्लूरो कार्बन धूर बनून निघतो. याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. यामुळे यकृताचं काम बिघडू शकतं. आजारी पडू शकतो.
नॉनस्टिकची भांडी खरेदी करताना त्यावर लिहिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा. अनेक कंपन्या त्या वस्तू कशा वापराव्यात किती टेंपरेचरला गरम कराव्यात यासंबंधीची माहिती नमूद करतात. याचबरोबर स्वयंपाकासाठी धातूचे चमचे न वापरता लाकडी चमचे वापरा.

जेवण सतत ढवळणं
अन्न शिजायला ठेवल्यानंतर ते सतत चमच्यानं ढवळत राहिल्यास त्यातील सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होतात असं काहींचं म्हणणं असतं. तर काही वेळेस अन्न भांड्याच्या तळाशी चिकटून जळून जाऊ नये म्हणून तेे सतत ढवळलं जातं. दुसरं म्हणजे काही पदार्थांसाठीचं बॅटर बनविताना ते खूप जास्त वेळ घोटलं जातं. असं केल्यानं त्यात ग्लूटेन बनतं आणि त्यामुळे आपलं पचनतंत्र बिघडतं.
अशा वेळी एखादी पाककृती करताना खरोखर तिला सतत ढवळत राहण्याची गरज असेल तर काही हरकत नाही. नाही तर ढवळत राहण्यापेक्षा तो पदार्थ मंद आचेवर शिजू द्यावा. म्हणजे तो जळणार नाही. काही वेळा एखाद्या पदार्थासाठीचं मिश्रण हे पदार्थ अधिक फुलण्यासाठी जास्त वेळ घोटून घ्यावं लागतं. त्यामुळे ती पाककृती पचायला हलकी होते. हे खरंय तरीही मिश्रण खूप हलवण्याऐवजी ते एकत्र करून अर्धा ते एक तास वेगळं ठेवा. यामुळे ते पीठ येऊन पदार्थ हवा तसा मऊ बनेल.

या गोष्टींचीही घ्या काळजी
–    स्वयंपाक करण्यापूर्वी कमीत कमी 20 सेकंद हात स्वच्छ धुऊन घ्या.
–    फळं, भाज्या, मांस इत्यादी स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नका.
–    कटिंग वा चॉपिंग बोर्डचा वापर करायचा झाल्यास तो देखील आधी स्वच्छ करून घ्या.
–    अन्नाचा वास घेऊन ते खराब झाले आहे का ते तपासून पाहा.
–    जेवणाची भांडी स्वच्छ करताना कोमट पाणी आणि लिक्वीड साबण वापरा. भांडी स्वच्छ धुतल्यानंतर कोरडी करून जागेवर ठेवा. भांड्यासाठी वापरण्यात येणारा स्पंज महिन्याने बदला.
–    जेवण बनविताना त्यात मधे मधे बोट घालून चव पाहू नका. स्वाद पाहायचाच असेल तर चमच्याचा वापर करा.
–    किचनमधील नळ आणि सिंक नेहमी स्वच्छ ठेवा. विशेषतः मासे, चिकन असे पदार्थ धुतल्यानंतर त्यातील जिवाणू पाण्याच्या ठिकाणी पटपट वाढतात.