बॉलिवूड कलाकारांच्या या चुकांमुळे त्यांचे करीअर...

बॉलिवूड कलाकारांच्या या चुकांमुळे त्यांचे करीअर झाले बरबाद (These Bollywood Stars Made Such a Mistake, That Ruined Their Film Career)

बॉलिवूडमध्ये असे अऩेक कलाकार होऊन गेले ज्यांच्यापाठी चाहत्यांची रांग लागलेली असायची. त्यांच्यासाठी तो काळ हा त्यांच्या करीअरमधला सुवर्णकाळ होता. पण त्यांच्या एका चुकीमुळे सर्व होत्याचे नव्हते झाले. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या करीअरची गाडी सुरुवातीला अगदी सुसाट सुटली होती.त्यांनी चाहत्यांची मने सुद्धा जिंकली होती. पण त्यावेळी त्यांनी असे काही काम केले ज्यामुळे त्यांच्या करीअरची वाट लागली. आणि हळूहळू ते चित्रपटांमधून दिसेनासे होऊ लागले.

विवेक ओबेरॉय

2002 मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून अभिनेता विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण 2003 मध्ये त्याचे नाव अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत जोडले गेले. त्यानंतर ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली असे म्हटले जायचे. त्यावेळी विवेकने एक पत्रकार परिषद घेऊन सलमानवर गंभीर आरोप लावले होते. पण या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या करीअरवर झाला. या घटनेनंतर लोक त्याला काम देण्यास संकोच बाळगू लागले. आणि बघता बघता विवेकच्या करिअरला ब्रेक लागला.

शायनी आहूजा

बॉलिवूड अभिनेता शायनी आहूजा ग्लॅमरस इंडस्ट्रीपासून दूर गेला असेच म्हणावे लागेल. ‘हज़ारों ख्वाहिशें ऐसी’,‘गैंगस्टर’ आणि‘भूल भुलैया’ यांसारख्या चित्रपटात काम करुन शायनीने लोकांची मने जिंकली होती. पण 2009 मध्ये मात्र त्याच्यावर आपल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप लागला  होता. त्यासाठी त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये परतलाच नाही.

गोविंदा

बॉलिवूडचा एकेकाळचा नंबर 1 हिरो अशी ओळख असलेल्या गोविंदाने आपल्या करीअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एक काळ असा आला की त्याच्या एका चुकीमुळे त्याचे चांगले चाललेले करीअर बरबाद झाले. गोविंदाने 2004 मध्ये राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. पण तिथे त्याच्या नशिबाने साथ दिली नाही. आणि त्यानंतर जेव्हा त्याने चित्रपटात पुन्हा येण्याचा विचार केला तेव्हा मात्र त्याचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

फरदीन खान

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानच्या फिल्मी करीअरची सुरुवात फार छान झाली होती. पण त्याने केलेल्या चुकीमुळे आपल्या करीअरची वाट लावून घेतली. 2001 मध्ये  त्याच्यावर ड्रग्सच्या खरेदी विक्रीचा आरोप लागला होता. त्यानंतर तो चित्रपटांमधून गायब झाला.

मनीषा कोइराला

एक काळ असा होता की मनीषा कोईरालाची भूरळ प्रेक्षकांवर पडली होती. 90 च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीने ‘सौदागर’, ‘1942: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘बॉम्बे’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. असे म्हटले जाते की मनिषाला तिच्या करीअरच्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच दारूचे व्यसन लागले होते, त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका मिळणे बंद झाले. यानंतर ती कॅन्सरचीही शिकार झाली आणि बघता बघता तिचं करिअर ठप्प झालं.

शक्ती कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जातात. पण खऱ्या आयुष्यात त्यांनी असे काही केले ज्यामुळे त्यांचे करिअर कलंकित झाले. असे म्हटले जाते की, 2005 मध्ये शक्ती कपूर एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेले होते, ज्यामध्ये ते एका मुलीला काम मिळवून देण्याच्या बदल्यात सेक्शुअल मागणी करताना सापडले होते.

अमन वर्मा

एके काळी अभिनेता अमन वर्माने छोटा पडदा गाजवला होता. त्याला चित्रपटात सुद्धा काम मिळत होते. पण त्याच्या एका चुकीमुळे सर्व बिघडले. मिळालेल्या माहितीनुसार 2005मध्ये त्याला एका न्यूज चॅनलने स्टिंग ऑपरेशनमध्ये एका मुलीला कामाच्या बदल्यात लैंगिक मागणी करताना पकडले होते.या घटनेनंतर त्याच्या कामाला ब्रेक लागला.