बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना भारी पडले आहे त्यां...

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना भारी पडले आहे त्यांचे स्टारडम, काहींना चक्क त्यांच्या चाहत्यांनी दिली आहे धमकी (These Bollywood Stars Have Faced The Brunt Of Being A Star, Somebody Was Threatened By A Fan And Someone Threatened By Underworld)

बॉलीवूड सेलिब्रिटींचे आयुष्य आपल्याला पडद्यावर खूप आरामदायी आणि मजेशीर दिसते पण प्रत्यक्षात मात्र ते  तेवढेच धोक्यांनी भरलेले आहे. बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर अनेक चाहते बनवले आहेत. पण जगात असेही काही लोक आहेत ज्यांना हे सेलिब्रिटी अजिबात आवडत नाहीत, अंडरवर्ल्डमधील काहीजणांनी तसेच सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी स्टार्सना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलला धमकीचे मेसेज येत होते. याप्रकरणी विकी कौशलने पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले. तेव्हा तो अज्ञात व्यक्ती कतरिनाचा खूप मोठा चाहता होता आणि त्याला कतरिनासोबत लग्न करायचे होते. मात्र कतरिनाने विकी कौशलसोबत लग्न केल्याने त्याचा राग अनावर होऊन तो त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांना धमक्या मिळाल्या होत्या.

शाहरुख खान –

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटादरम्यान त्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. हॅपी न्यू इयरच्या सेटवर एक चिठ्ठी सापडली होती, ज्यामध्ये,“पुढचे लक्ष्य शाहरुख असेल”असे लिहिले होते. ते पत्र गँगस्टर राजनने पाठवले होते. याशिवाय शाहरुखच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची चर्चा होती, याप्रकरणी एका व्यक्तीला पकडले होते.

सलमान खान –

बॉलिवूड स्टार सलमान खान तसे पाहायला गेल्यास अनेक वादांमध्ये अडकलेला आहे. सलमान खानवर काळवीटांची  शिकारी केल्याबद्दल बराच काळ खटला सुरू आहे. जोधपूर काळवीट प्रकरणी सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. अलीकडेच सलमान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. या पत्रात सलमानला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे या प्रकरणानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आमिर खान –

बी-टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट, आमिरला त्याच्या कामासाठी चाहत्यांचे जितके प्रेम मिळाले आहे, तितकेच त्याला त्याच्या  ‘सत्यमेव जयते’ या लोकप्रिय शोमधील वादग्रस्त विधानांमुळे लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या सीझननंतर आमिर खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्याने स्वत:साठी बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती.

अक्षय कुमार –

खिलाडी अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमधून लोकांचे प्रेम मिळवतो, पण एकदा अक्षयने काही कारणास्तव घरातील मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकणे खूप भारी पडले. गॅंगस्टर रवी पुजारीने कामवालीला नोकरीवरुन काढल्यामुळे जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा बराच तपास केला तरी ती व्यक्ती सापडली नाही.