रूढीवादी परंपरा मोडून काढत ...

रूढीवादी परंपरा मोडून काढत विवाहबद्ध झालेले बॉलिवूडचे कलाकार (These Bollywood Stars Got Married by Breaking the Orthodox Traditions)

यावर्षी बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांच्या कुंडलीत लग्नाचा योग होता बहुतेक. बऱ्याच कलाकारांनी २०२१ सालामध्ये लग्नं केली, तीही अगदी गाजावाजा करत. म्हणजे अजूनही त्यांची लग्नं चर्चेत आहेत. विकी कौशल, कतरिना कैफ, वरुण धवन, दीया मिर्झा, राजकुमार राव आणि यामी गौतम इत्यादी. यांपैकी काही सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या लग्नसोहळ्यांचा मुद्दाम उल्लेख यासाठी की, हे लग्नसोहळे अगदी थाटामाटात तर झालेच परंतु ते एका वेगळ्या गोष्टीसाठीही चर्चिले गेले. बॉलिवूडच्या या कलाकारांनी रुढीवादी परंपरा मोडीत काढत विवाह केले आहेत आणि लोकांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाह चंदीगडमध्ये मोठ्या थाटात पार पडला. सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाच्या छायाचित्रांना चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळाली. मजेशीर गोष्ट म्हणजे या जोडप्याने जुनी परंपरा मोडून आपल्या लग्नात नवीन परंपरा सुरू केली आहे. लग्नात वर आपल्या वधूच्या भांगामध्ये सिंदुर भरतो, परंतु राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नात पत्रलेखा पती राजकुमार रावच्या भांगात सिंदूर भरताना दिसली होती.

दीया मिर्झा आणि वैभव रेखी

यावर्षी अभिनेत्री दिया मिर्झाने वैभव रेखीसोबत सात फेरे घेतले. या जोडप्याने इको-फ्रेंडली लग्न केले, शिवाय कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये याचीही त्यांनी विशेष काळजी घेतली होती. एवढेच नाही तर दियाच्या लग्नाचे सर्व विधी एका महिला पंडितानेच पार पाडले. या जोडप्याने लग्नातील कन्यादान आणि विदाई यांसारख्या परंपराही मोडीत काढल्या होत्या.

रिया कपूर आणि करण बूलानी

अनिल कपूरच्या मुली सोनम आणि रिया त्यांच्या नवीन ट्रेंडसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या लग्नातही नवीन ट्रेंड पाहायला मिळाला. यावर्षी रियाने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत लग्नगाठ बांधली, पण तिच्या वधूच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरं तर, लग्नात, वधू सहसा डोक्यावर लाल रंगाची चुनरी घालते, परंतु रियाने तिच्या डोक्यावर मोत्यांची ओढणी घेतली होती. पारंपरिक वधुच्या अवतार ऐवजी तिने आधुनिक ब्रायडल लूक फॉलो केला.

यामी गौतमी आणि आदित्य धर

सर्वसाधारणपणे नववधू आपल्या लग्नासाठी सर्व नवनवीन कपडे आणि नववधूचा खास पेहरावाची खरेदी करते परंतु, यामी गौतमीने तिच्या लग्नात ही परंपरा मोडत प्रसिद्ध डिझायनरने डिझाइन केलेला पोशाख परिधान करण्याऐवजी तिच्या आईची साडी निवडली. होय, यामीने आईची साडी नेसून आदित्य धरसोबत सात फेरे घेतले.

अनुष्का रंजन आणि आदित्य सील

लग्नात, वधू मुख्यतः लाल रंगाचा पेहराव घालते, कारण तो शुभ मानला जातो. तथापि, अनुष्का रंजनने हा समज बदलला आणि पारंपारिक लाल आणि गुलाबी पोशाखांकडे दुर्लक्ष करून तिच्या लग्नासाठी लव्हेंडर रंगाचा लेहेंगा पसंत केला. अनुष्का रंजनने वेगळा रंग निवडून वधूच्या पोशाखांना निवडक रंगांपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज नसल्याचे दाखवून दिले.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम