बॉलिवूडचे हे कलाकार आहेत गणेश भक्त, मनोभावे करत...

बॉलिवूडचे हे कलाकार आहेत गणेश भक्त, मनोभावे करतात गणपतीची पूजा(These Bollywood Stars Are Big Devotees Of Lord Ganesha, Celebrate Ganeshotsav With Complete Devotion)

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवावर निर्बंध असल्यामुळे हा सण थाटामाटात साजरा करता आला नव्हता. पण यावर्षी मात्र सर्व निर्बंध उठल्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी सर्वजण मनापासून तयारी करत आहेत. यामध्ये आपले बॉलिवूड कलाकारदेखील मागे नाहीत. अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

सलमान खान

या यादीत सलमान खानचे नाव पहिले येते. सलमान खान जरी मुस्लिम असला तरी त्याच्या कुटुंबात प्रत्येक धर्माचा आदर केला जातो. सलमान आणि त्याचे कुटुंबीय गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. सलमानच्या घरी गणपतीची स्थापना त्याची धाकटी बहीण अर्पिताने सुरू केली होती. यापूर्वी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये गणपती बाप्पा विराजमान व्हायचे, मात्र लग्नानंतर अर्पिताने आपल्या सासरच्या घरी गणपती आणण्यास सुरुवात केली. दरवर्षी कुटुंबातील सर्व सदस्य मिळून गणपती बाप्पाची पूजा करतात. सलमान कितीही व्यस्त असला तरी बाप्पाच्या पहिल्या आरतीला हजेरी लावायला आणि नाचगाणी करुन बाप्पाचे स्वागत करायला तो कधीच विसरत नाही.

सोनू सूद

सोनू सूद गेल्या 20 वर्षांपासून आपल्या घरी बाप्पा आणत आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सोनूच्या घरी भव्य सजावट केली जाते. सोनूचे कुटुंब पाच दिवस बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होतात. सोनूसुद्धा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पत्नी सोनाली आणि दोन्ही मुलांसोबत बाप्पाच्या सेवेत सहभागी होतो. यावर्षी बाप्पाची मूर्ती घरात बसवताना सोनूने विश्वास व्यक्त केला की, ‘लोकांनी खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत. मला खात्री आहे की बाप्पा सर्व अडथळे दूर करेल.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी प्रत्येक सण अगदी थाटामाटात साजरा करते. दरवर्षी ती देखील पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने गणपतीची मूर्ती आणते. उत्साहाने गणेशाची पूजा करण्यात मग्न होते. शिल्पाच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. शिल्पा पूर्ण भक्तीभावाने बाप्पाची सेवा करते आणि नंतर बाप्पाचा आशीर्वाद घेते.

विवेक ऑबेरॉय

दरवर्षी विवेक ओबेरॉयच्या घरी गणपतीचे आगमन पूर्ण उत्साहात होते. बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. विवेक, त्याचे वडील सुरेश ओबेरॉय, आई यशोधरा, पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुले मिळून बाप्पाची सेवा करतात आणि त्याचे आशीर्वाद घेतात.

जितेंद्र

अभिनेता जितेंद्र यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचे मोठ्या थाटात स्वागत केले जाते. जितेंद्र संपूर्ण कुटुंबासह संपूर्ण विधीवत बाप्पाची पूजा करतात. बाप्पा घरी येण्याच्या खुशीत एकता कपूर एक छोटीशी पार्टी देते. ज्यामध्ये बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार घरी येऊन त्यांच्या आनंदात सहभागी होतात.

गोविंदा

सुपसस्टार गोविंदाही गणेशभक्त आहे. दरवर्षी गोविंदाच्या घरी 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान गोविंदा आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ गणेशभक्तीमध्ये तल्लीन होऊन पूर्ण विधीपूर्वक बाप्पाची पूजा करतो.

नाना पाटेकर

नाना पाटेकर यांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांत नाना पाटेकर यांच्या घरात अगदी आनंदी वातावरण असते. बाप्पाच्या आरतीपासून ते त्यांच्या सेवेपर्यंतचे प्रत्येक काम नाना पाटेकर स्वतः करतात.