सुपरहिट चित्रपटांमधून पदार्पण केलं, तरी या ६ अभ...

सुपरहिट चित्रपटांमधून पदार्पण केलं, तरी या ६ अभिनेत्रींचं नशीब उघडलं नाही… (These 6 Actresses Who Made Their Debut With Super Hit Films; Don’t Get Any Film Offers Now)

फिल्म इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी पुष्कळ खस्ता खाव्या लागतात. इथे धडपड करणाऱ्या प्रत्येक नट-नटीला वाटत असतं की, पदार्पणाच्या चित्रपटातच आपल्याला मोठं यश मिळावं. पण सगळ्यांचं नशीब इतकं चांगलं नसतं. तरी पण असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना पहिल्याच चित्रपटात मोठं यश लाभलं. पण काही दुर्दैवी अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलं खरं, पण पुढे त्यांना नशीबाची साथ लाभली नाही… त्यांना चित्रपटात कामे मिळत नाहीत…

  • शमिता शेट्टी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पा शेट्टीप्रमाणेच तिची बहीण शमिता ही बोल्ड आहे, दिसायला सुंदर आहे आणि गुणी आहे. ‘मोहब्बते’ या मल्टी स्टारर चित्रपटातून शमितानं पदार्पण केलं. आपल्या बोल्ड रुपानं तिनं रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. तरी पण तिला पुढे ‘मेरे यार की शादी है’, ‘साथिया’ अशा चित्रपटात लहान मोठी कामे मिळाली. आता तिला कामे मिळेनाशी झाली आहेत. सिनेसृष्टीत डाळ शिजत नाही म्हणता, शमिताने एक व्यवसाय सुरू केला.

  • रिमी सेन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘हंगामा’ या विनोदी चित्रपटातून रिमी सेनने पदार्पण केलं. हा चित्रपट २००३ साली आला होता. पुढे तिनं बागबान, गोलमाल- फन अनलिमिटेड, धूम, दिवाने हुए पागल अशा चित्रपटांमधून कामे केली. तरीपण या इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी तिला संघर्ष करावा लागत आहे.

  • प्रीति झांगियानी

शमिता प्रमाणेच प्रीति झांगियानीने ‘मोहब्बते’ या बड्या स्टारकास्टवाल्या चित्रपटातून पदार्पण केलं. तिचं गोड रूप रसिकांना पसंतही पडलं. तरीपण ती कमनशिबी ठरली. तिला मोठे चित्रपट मिळालेच नाहीत. २००८ साली प्रीतिने परवीन डबासशी लग्न केलं. सध्या ती आपल्या कुटुंबासह मुंबईमध्ये वांद्रे उपनगरात राहते.

  • मिनिषा लांबा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मिनिषा लांबाला ‘यहां’ या चित्रपटाने ब्रेन वुईथ ब्युटी, अशी उपाधी मिळाली. पण त्यानंतर ‘बचना ए हसीनो’ आणि ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’ अशा दोनच चित्रपटांत दिसली. नाही म्हणायला बिग बॉसच्या ८ व्या सीझनमध्ये ती दिसली होती. पण त्यापुढे तिला काहीच कामे मिळाली नाहीत.

  • कोएना मित्रा

‘रोड’ या चित्रपटातून कोएना मित्रा पदार्पण करती झाली. इंडस्ट्रीतील हॉट गर्ल्सच्या यादीत तिचा समावेश देखील झाला. ‘साकी-साकी’ हे एक आयटम साँग तिच्या खात्यावर जमा झालं. त्यापुढे काहीच जमलं नाही. तिचं नशीब काही उजळलं नाही. तिला कामे मिळाली नाहीत.

  • अनु अग्रवाल

‘आशिकी’ हा चित्रपट नवी कोरी जोडी घेऊन आला. या चित्रपटाने अनु अग्रवालला रातोरात स्टार बनवले. चित्रपटाचे कथानक, नायिका, गाणी सगळं काही गाजलं. पण अनुच्या यशाचं माप पुढे रिकामंच राहिलं. तिच्या आयुष्यात एक अपघात झाला आणि तिचं जीवन जणू उद्ध्वस्त झालं. आता ती जणू विजनवासात गेली आहे.