गरमागरम दृश्यांनी ओतप्रोत भरलेले १० चित्रपट (Th...

गरमागरम दृश्यांनी ओतप्रोत भरलेले १० चित्रपट (These 10 Bollywood Films Are Full Of Bold Scenes)

आपले चित्रपट पूर्वीपासून कौटुंबिक कथानकाने सजलेले असत. परंतु काही निर्मात्यांनी धाडसी विषय घेतले. त्यामध्ये गरमागरम दृश्ये भरली आणि एका विशिष्ट प्रेक्षक वर्गाला खुश केले. या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने ‘फक्त प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिले. यामध्ये देखील काही चित्रपट असे आहेत की, ज्यांनी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यातील १० निवडक चित्रपट असे आहेत.

१.मर्डर

मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी या जोडीचा ‘मर्डर’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना अचंबित व्हावे लागले होते. विवाहबाह्य अनैतिक संबंध अशी कथावस्तू असलेल्या या चित्रपटात गरमागरम दृश्यांची रेलचेल होती.

२. कामसूत्र

‘कामसूत्र’ या चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षक समजून गेले होते की, यामध्ये कामुक दृश्ये असतील. या चित्रपटाने कहर माजवला. त्यामध्ये इतकी सेक्सी व बोल्ड दृश्ये होती की, चित्रपटाची नायिका काही दृश्यांमध्ये चक्क नग्न दिसली होती.

३. गर्लफ्रेन्ड

करण राझदान दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. इशा कोप्पीकर, अमृता अरोरा, आशिष चौधरी, सुमीत निझावन असे कलाकार त्यात होते. हा चित्रपट दोन तरुणींच्या समलैंगिक संबंधांवर आधारित होता. इशा कोप्पीकर आणि अमृता अरोरा या दोघींनी त्यामध्ये फारच बोल्ड दृश्ये दिली होती.

४. ज्युली

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ज्युली’ या चित्रपटाची नायिका नेहा धुपिया होती. एका तरुणीचे, काही तरुण मुले वारंवार लैंगिक शोषण करतात, असा या चित्रपटाचा विषय होता. त्यात नेहा धुपियाचे बरेच बोल्ड सीन होते.

५. हवस

‘हवस’ या शब्दाचा अर्थ आहे वासना. तेव्हा २००४ साली या नावाच्या चित्रपटात वासना वारंवार दिसणार, हे ओघानेच आले. त्यानुसार वासनामय दृश्यांची रेलचेल या चित्रपटात होती. मेघना नायडू, शावर अली, तरुण अरोरा असे नवखे कलाकार त्यात होते.

६. जिस्म २

‘जिस्म २’ या चित्रपटात नायिका म्हणून सनी लिओनीला संधी देण्यात आली होती. त्यामुळे तिच्या लौकिकास साजेशी गरमागरम दृश्ये त्यात बघायला मिळणार, अशी अटकळ प्रेक्षकांनी बांधली होती. ती खरी ठरली. सनीची गरमागरम दृश्ये पाहून तिच्या चाहत्यांमध्ये भर पडली.

७. बी.ए. पास

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रौढ नायिकेची भूमिका शिल्पा शुक्लाने केली होती. नावावरून सोज्वळ वाटलेला हा चित्रपट भयंकर सेक्सी होता. कारण त्यात एक विवाहित प्रौढ स्त्री, बी. ए. पास होऊनसुद्धा नोकरी न मिळालेल्या तरुणाला नादी लावते नि वाईट मार्गाला लावते, असा बोल्ड विषय मांडण्यात आला होता. या चित्रपटात बहुधा पहिल्यांदाच संभोग दृश्य दाखवण्यात आले होते.

८. फायर

दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ या चित्रपटात इतकी गरमागरम दृश्ये होती व त्याचा विषय एवढ्या धीटपणे मांडला होता की, काही कट्टरपंथियांनी चित्रपटगृहांस आग लावली होती. या चित्रपटात दोन विवाहित स्त्रियांचे समलिंगी संबंधांचे चित्रण केले होते. नंदिता दास आणि शबाना आझमी यांनी ही बोल्ड दृश्ये दिली होती.

९. ख्वाहिश

 ‘ख्वाहिश’ हा मल्लिका शेरावत हिचा पहिला चित्रपट होता. त्यामध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंध हा विषय मांडला होता. विषयाच्या मागणीनुसार त्यामध्ये गरमागरम दृश्ये चित्रित करण्यात आली होती. मल्लिका आणि हिमांशु मलिक या जोडीवर १७ चुंबन दृश्ये चित्रित करण्यात आली होती.

१०. आस्था

बासु भट्टाचार्य यांचा ‘आस्था’ हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. रेखा आणि ओम पुरी अशी विजोड जोडी त्यात होती. या जोडीवर अत्यंत कामुक दृश्ये चित्रित करण्यात आली होती. या दृश्यांमुळे व तीही रेखाने दिल्याने हा चित्रपट खूप गाजला होता.