केसांमध्ये खूप घाम येतोR...

केसांमध्ये खूप घाम येतो… (There Is A Lot Of Sweat In The Hair..)

माझ्या केसांमध्ये खूप घाम येतो. विशेषतः उन्हात किंवा जिममध्ये ही समस्या जास्त जाणवते. केस वारंवार धुतले, तर मला सर्दी होते. त्यामुळे काय करावं काही कळत नाही. कृपया उपाय सुचवा.
उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर स्कार्फ बांधा किंवा टोपी-छत्रीचा वापर करा. यामुळे सूर्यप्रकाशापासून डोक्याचं संरक्षण होईल आणि घामाचं प्रमाणही कमी होईल. जिममध्ये व्यायाम केल्यानंतर केसांमध्ये येणारा घाम टिश्यू पेपर किंवा तलम सुती कापडाने अलगद टिपून घ्या. तसंच घरी गेल्यानंतर केस धुऊन, लगेच सुकवा. ओले केस बांधून ठेवू नका. तसं केल्यास सर्दी होऊ शकते. वारंवार सर्दी होण्याची सवय असेल, तर केस धुतल्यानंतर लगेच व्यवस्थित पूर्णतः सुकवा. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या, म्हणजे सर्दी होणार नाही.

माझ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली आहेत. ती जाण्यासाठी काय करता येईल?
डोळ्यांना योग्य विश्रांती मिळाली नाही किंवा ताणतणाव जास्त असला की, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येऊ शकतात. काही वेळा ही समस्या आनुवंशिकही असते. यावर उपाय करण्यासाठी, दोन बदाम रात्रभर पाण्यात भिजवा. नंतर सालं काढून सहाणेवर उगाळा आणि हा लेप डोळ्यांभोवती लावा. साधारण वीस ते तीस मिनिटांनंतर धुवा. बटाट्याचा रस आणि चंदन पूड एकत्र भिजवून, हा लेपही डोळ्यांभोवती अलगद लावता येईल. लेप सुकल्यानंतर डोळे गच्च बंद करून, लेप धुऊन घ्या. अधूनमधून बंद डोळ्यांवर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवत राहा. आठवड्यातून किमान तीन वेळा हे नियमाने करा.

माझ्या पायांवर मृत त्वचा खूप आणि लगेच येते. मी पायांना नियमितपणे मॉइश्‍चरायझर लावते, शिवाय सॉक्सही घालते, तरी असं का होत असेल? पाय सुंदर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी काय करू?
पायांना आठवड्यातून किमान एकदा क्रीम लावून मसाज करा. नंतर स्क्रबने अलगद चोळा. यामुळे पायांवरील मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर पायाला चंदनाचा किंवा फळांचा पॅक लावा. 15 मिनिटांनंतर पॅक धुवा. पायावर कुठेही काळसर डाग असतील, तर त्यावर लिंबाची साल चोळा. हे उपाय नियमितपणे केल्यास पायांवर मृत त्वचा येणार नाही आणि ते मुलायम आणि सुंदरही दिसतील.

माझ्या चेहर्‍यावरील ओठांभोवतीची त्वचा बरेचदा अतिशय कोरडी होते. म्हणजे, अचानक खूप झोंबू लागते आणि नंतर बरेचदा तिथली त्वचा काळी पडते. हे कशामुळे होत असेल? हे होऊ नये म्हणून किंवा झाल्यावर काय करता येईल?
अनेकांना ओठांवरून वारंवार जीभ फिरवण्याची सवय असते. यामुळे लाळ सतत जिभेवर आणि ओठांभोवती राहते. त्यामुळे ही त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. झोपेत ज्यांची लाळ गळते, त्यांनाही ही समस्या भेडसावते. तसंच पोटात उष्णता असल्यासही असं होऊ शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी आहारातील नारळ पाणी, नाचणीचं सत्त्वं, ताक, लस्सी, फळं इत्यादी उष्णता कमी करणार्‍या पदार्थांचं प्रमाण वाढवा. ओठांवर आणि भोवती वारंवार जीभ फिरवू नका. चेहर्‍यावर येणारा घाम टिश्यू पेपरने वेळोवेळी अलगद टिपून घ्या. काळसर त्वचेवर चंदनाचा लेप किंवा कोरफडीचा गर-जेल लावा. यामुळे त्वचा पूर्ववत होण्यास मदत होईल.