राणी वेलु नच्चियार पहिली भारतीय महिला स्वातंत्र...

राणी वेलु नच्चियार पहिली भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी (The struggle of First Ever Lady Freedom Fighter Of India)

– अनघा शिराळकर
राणी वेलु नच्चियार ही स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारी पहिली भारतीय महिला होती. आत्मघातकी मानवी बॉम्ब बनवण्याचा व त्याचा वापर ब्रिटीशांवर हल्ला करण्यासाठी करायचा असा विचार करणारी व त्याचा आराखडा बनवणारी ही पहिली स्वातंत्र्यसेनानी होती.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांविरूध्द लढा देणारे व धारातीर्थी पडणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी होते. काळाच्या ओघात अनेकजण त्यांच्या कार्यासह विस्मृतीत गेले. अशीच स्मृतीच्या पडद्याआड गेलेली तामिळनाडूची राणी वेलु नच्चियार ही पहिली भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी होती. वेलु नच्चियार हिचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम येथे 3 जानेवारी 1730 रोजी झाला.
मद्रास (सध्याचे चेन्नई) मधील रामनाथपूरम साम्राज्याचा राजा चेल्लामुथू विजयरघुनाथ सेथूपती आणि राणी सकंदीमुथल यांची ही एकुलती एक कन्या. ती या दांपत्याचे एकुलते एक अपत्य होती. म्हणून त्यांनी या राजकन्येचे पालनपोषण राजपुत्राप्रमाणेच केले आणि तिला एक जबाबदार वारसदार तयार केले. या राजकन्येने लहानपणीच घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी, लाठीयुध्द, सशस्त्र लढाई इत्यादींचे शास्त्रशुध्द शिक्षण घेऊन त्यात नैपुण्य प्राप्त केले. शस्त्र चालविण्याच्या व युध्दाच्या शिक्षणाबरोबरच राजनितीमध्ये पण निपुणता प्राप्त व्हावी म्हणून इंग्रजी, फ्रेंच, उर्दू व इतर भाषांवरही तिने प्रभुत्व मिळवले. वयाच्या सोळाव्या वर्षी राजकन्या वेलु नच्चियार हिचा विवाह शिवगंगाईचे राजे मुथुवादुग्नाथापेरिया उदायियाथेवर यांचेशी झाला. कालांतराने त्यांना एक कन्यारत्न झाले.

कपटी व धूर्त राजनीती


ब्रिटीशांचा भारतात जम बसू लागल्यावर अनेक स्थानिक राज्यकर्ते त्याला प्रखर विरोध करू लागले. परंतु ब्रिटीशांच्या अत्याधुनिक शस्त्रे, संरक्षण दल आणि कपटी व धूर्त राजनीती यांच्यापुढे भारतीय राज्यकर्त्यांचा निभाव लागत नव्हता. इसवी सन 1772 मध्ये ब्रिटीश सैन्य व अरकोटच्या नवाबने एकत्रपणे शिवगंगाई राज्यावर आक्रमण केले. त्यामध्ये ब्रिटीशांनी राणी वेलु नच्चियार हिच्या पतीची हत्या केली. यावेळी राणी तिच्या मुलीसह स्वतःचा बचाव करू शकली. पतीच्या निधनानंतर तिने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. राणीने आसपासच्या भागातील राजांबरोबर मैत्री केली आणि आपले राज्य ब्रिटीशांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी युद्ध केले.
अरकोटचा नवाब ब्रिटीशांच्या बाजूने लढत होता. त्याचा कट्टर शत्रू द़िंडीगुल येथील नायकार या राजाशी वेलु नच्चियार हिने मैत्री केली आणि शिवगंगाई येथून मुलीसह निसटून दिंडीगुल येथे आठ वर्षे निवास केला. वेलु नच्चियार, तिची मुलगी आणि तिचे एक सहकारी थंडावरम पिल्ले यांनी दिंडीगलच्या जवळच्या विरुपाचीपालयम या गावात आश्रय घेतला. कालांतराने वेलाइमारूथु व चिन्नमारूथु हे दोन अंगरक्षक पण तिला येऊन मिळाले. राणीने आपल्या भावाच्या मदतीने नवीन पलटण तयार केली.

आत्मघातकी मानवी हल्ला


म्हैसूरचा नवाब हैदर अली, गोपाल नायक आणि इतर जणांच्या मदतीने राणी वेलु नच्चियार दिंडीगलच्या डोंगरावरील किल्ल्यात काही वर्षे राहिली. या सर्वांच्या सहकार्याने राणीने एक स्वतंत्र संघटित दल तयार केले आणि अथकपणे सात वर्षे ती ब्रिटीशांविरूध्द लढत राहिली व त्यांना जेरीस आणले. राणीचे सेनापती कुयली यांनी आत्मघातकी मानवी बॉम्बने ब्रिटीशांच्या दारूगोळ्याच्या साठ्यावर हल्ला केला. अशा प्रकारचा हल्ला हा जगाच्या इतिहासातील पहिला हल्ला होता.

‘उदईयाल’ महिला सेनेची स्थापना


1780साली म्हैसूरचा सुलतान हैदर अली याच्या मदतीने ब्रिटीशांविरूद्ध व नवाबाविरूध्द तिने लढा दिला. अखेरीस अरकोटच्या नवाबाने राणी व तिच्या दोन्ही भावांना शिवगंगाईला परत जाऊन राज्यकारभार करण्यास परवानगी दिली. पण त्या बदल्यात राणीने नवाबला काही महसूल द्यावा अशी अट घातली. राणीने ही अट मान्य केली व ती आपल्या दोन्ही भावांसह शिवगंगाईला परत आली. आपल्या थोरल्या भावाला सेनापती व धाकट्या भावाला मंत्री म्हणून नियुक्त केले आणि स्वतः राणी म्हणून तिथे दहा वर्षे राज्यकारभार केला. राणीने आपल्या राज्य काळात ’उदईयाल’ नावाच्या महिला सेनेचीही स्थापना केली.
अशा प्रकारे राणी वेलु नच्चियार हिने पतिच्या निधनानंतर शिवगंगाईचा राज्यकारभार व्यवस्थित चालवला. 1780 साली राणीने सर्व अधिकार आपल्या मुलीला व भावांना हस्तांतरित केले आणि शिवगंगाईचा राज्यकारभार आपली मुलगी वेलासी हिच्या हाती सोपवला व स्वतः अलिप्त झाली.
राणी वेलु नच्चियार ही स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारी पहिली भारतीय महिला होती. आत्मघातकी मानवी बॉम्ब बनवण्याचा व त्याचा वापर ब्रिटीशांवर हल्ला करण्यासाठी करायचा असा विचार करणारी व त्याचा आराखडा बनवणारी ही पहिली स्वातंत्र्यसेनानी होती. 1857च्या स्वातंत्र्यलढ्याच्या जवळजवळ 77 वर्षे आधी राणी वेलु नच्चियार हिने ब्रिटीशांविरूध्द लढा दिला होता. तिच्या अतुलनीय शौर्यामुळे तिला तामिळ लोकांनी ’वीरमंगाई’ (धाडसी स्त्री) हे विशेष नाम दिले.

नारी शक्ती


राणी वेलु नच्चियार हिच्या स्मरणार्थ तिचा फोटो असलेले टपाल तिकीट भारतीय टपाल खात्याने 31 डिसेंबर 2008 रोजी प्रकाशित केले. 2016 मध्ये तामिळ-अमेरिकन कलाकाराने त्याच्या तामिळमॅटिक अल्बम मधील ’अवर क्वीन’ हे राणी वेलु नच्चियार हिला समर्पित केले आहे. 21 ऑगस्ट 2017 रोजी चेन्नईच्या नारद खान सभा या संस्थेनी राणी वेलु नच्चियार हिचा जीवनपट उलगडणारे नृत्य सादर केले. हा कार्यक्रम राणी वेलु नच्चियार हिच्या जीवनावर संशोधन करणार्‍या राम शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. राणी वेलु नच्चियार हिचे दुर्दम्य साहस पुढील पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. नारी शक्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलु नच्चियार हिच्या जयंती निमित्त तिचे स्मरण करून तिच्या शौर्याबद्दल व बलिदानाबद्दल गौरवोद्गार काढले.