मूल हवं म्हणून दिलीप कुमार यांनी सायरापासून लपव...

मूल हवं म्हणून दिलीप कुमार यांनी सायरापासून लपवून केलं होतं दुसरं लग्न (The Secret Behind Dilip Kumar’s Second Marriage, Later He Realised That It Was A Mistake)

हिंदी सिनेमाबद्दल बोलताना सिनेसृष्टीतील ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीप कुमार यांच्या नावाचा उल्लेख न होणे हे शक्यच नाही. दिलीप साहेबांचा अभिनय आणि चित्रपटांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. सोबतच दिलीपजींच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेण्यासारखंही बरंच काही आहे. मधुबाला,

कामिनी कौशल, वैजयंती माला यांसारख्या अभिनेत्रींसोबतची त्यांची प्रेमप्रकरणं बऱ्यापैकी चर्चिली गेली परंतु अपत्यासाठी त्यांनी लपूनछपून केलेले दुसरं लग्न हे त्यावेळेस जास्तच चर्चिलं गेलं होतं.

२२ वर्षांनी लहान सायरा बानो यांच्याशी लग्न

दिलीप साहेबांचं मधुबालावर जिवापाड प्रेम होतं, परंतु मधुबाला यांच्या वडिलांनी घातलेल्या अटीमुळे त्या दोघांचा निकाह होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं. १९९६ साली दिलीप कुमार यांनी आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानो यांच्याशी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच दिला होता. त्यावेळेस सायरा एक यशस्वी अभिनेत्री होत्या आणि ब्यूटी क्वीन म्हणूनही ओळखल्या जात होत्या, परंतु दोघांमध्ये जवळपास दुप्पट वयाचं अतंर होतं, तसंच त्यांच्या स्वभावातही वेगळेपणा होता. असं असूनही दोघांनी एकमेकांची साथ देण्याचं वचन दिल्यानंतर, ते वचन आजन्म निभावलं आणि अगदी प्रेमाने निभावलं.

सायराचं प्रेम होतं राजेन्द्र कुमारवर आणि लग्न झालं दिलीप साहेबांबरोबर

सायरा बानो यांचं प्रेम होतं एकावर आणि लग्न झालं दुसऱ्याबरोबर. सायरा बानो यांचं राजेन्द्र कुमार यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या प्रेमाने सायरा यांना वेड लावलं होतं. त्यावेळेस राजेन्द्र कुमार विवाहित होते शिवाय त्यांना दोन मुलं देखील होती. परंतु सायरा यांनी त्यांच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. त्यावेळेस सायराच्या आईने दिलीप साहेबांना त्यांच्या चाहतीची समजूत काढण्यास सांगितले. सायरा बानो या लहानपणापासून दिलीपजींच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. दिलीप कुमार जेव्हा सायरा यांची समजूत काढण्यास गेले, सायरा यांनी त्यांनाच माझ्याशी लग्न कराल का असा प्रश्न केला. त्यावेळी दिलीप कुमार काहीच न बोलता तेथून निघून गेले खरे, परंतु त्यांना सायरा यांच्या सौंदर्याची भुरळ पडली होती. शेवटी त्यांनी सायरा यांच्याशी लग्न केले.

सायरा कधी आई होऊ शकल्या नाही

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचं वैवाहिक जीवन सुखात चालू होतं, परंतु मुलबाळ नसल्याची खंत दिलीप साहेबांच्या मनात सलत होती. दिलीप कुमार यांनी आपलं आत्मचरित्र ‘द सबस्टांस अँड द शॅडो’ मध्ये सांगितलं होतं की, १९७२ मध्ये सायरा बानो गर्भवती राहिल्या होत्या, परंतु ८ व्या महिन्यात त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यात त्यांचं बाळ गेलं. त्यानंतर त्या कधीच गर्भवती राहू शकल्या नाहीत. त्यावेळेस दिलीपजींना इतके दुःख झाले की ते रडले. त्या घटनेनंतर सायरा पुन्हा आई होऊ शकल्या नाहीत आणि दिलीपजींची अपत्याची इच्छा तशीच राहिली.

अपत्यासाठी सायरापासून लपवून दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केलं

हैद्राबादमध्ये एका क्रिकेट सामन्याच्या दरम्यान आसमा आणि दिलीप कुमार यांची भेट झाली. आसमा यांच्या बहिणी फॉजिया आणि सईदा यांनी ही भेट करून दिली होती. त्यावेळी आसमा विवाहित आणि तीन मुलांची आई होती. हळूहळू आसमा आणि दिलीपजींमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यातील प्रेमाची कुजबूज सुरू झाली. असं म्हणतात की त्यावेळेस लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून दिलीपजींनी घरातून बाहेर पडणेही सोडून दिले होते. असो, बऱ्याच काळाच्या प्रेमप्रकरणानंतर ३० मे १९८० रोजी सायरा बानो यांच्यापासून लपवून ठेवून दिलीपजींनी बंगलोरमध्ये आसमासोबत लग्न लावलं. दिलीपजींना वाटलं की आसमा त्यांना अपत्याचं सुख देऊ शकेल. ही गोष्ट सायरा बानो यांना कळल्यानंतर त्यांनी गोँधळ घातला, या लग्नास विरोध केला.

दुसरीकडे दिलीप कुमार यांचं आसमावरील प्रेमही कमी होऊ लागलं. कारण आसमाने व्यवस्थित कारस्थान रचून दिलीपजींसोबत लग्न केलं होतं. दिलीप कुमार यांच्या खासगी आयुष्याची माहिती ती आपल्या पत्रकार नवऱ्याला देत होती. आसमाचं हे सत्य समजल्यानंतर दिलीपजींनी १९८२ साली तिला तलाख दिला.

त्या दिवसापासून दिलीप साहेबांनी पावलोपावली सायरा बानो यांची साथ दिली आणि सायराजींनीही प्रत्येक वेळी त्यांची सोबत केली. मागील काही वर्षांपासून दिलीपजी सतत आजारी होते परंतु सायरा यांनी कधीही त्यांना एकटं पाडलं नाही. त्यांनी आपल्या पत्नी धर्माचं पालन करत दिलीपजींचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला.