देव आनंदने दिलीपकुमारला आयुष्यभर माफ केले नाही&...

देव आनंदने दिलीपकुमारला आयुष्यभर माफ केले नाही… कारण काय होतं? (The Real Reason Why Dev Anand Always Hated Dilip Kumar)

दिलीपकुमारने काल या जगाचा निरोप घेतला. अन्‌ एका जमान्यात चित्रसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या दिलीप-राज-देव या त्रिकुटातील अखेरचा तारा निखळला. या तिघांमध्ये दोस्ती व दुश्मनी असं नातं होतं. दिलीपकुमार आणि राज कपूर कायम दोस्त म्हणून राहिले. तर देव आनंदने दिलीपशी आयुष्यभर दुश्मनी राखली. दिलीप आणि देव हे ‘इन्सानियत’ या एकमेव चित्रपटात एकत्र आले. तेव्हा त्यांची दोस्ती होती. पण पुढे, दिलीप साहेबांनी असं काही केलं की, देवने त्यांना आयुष्यभर माफ केलं नाही…

या दोघांमध्ये वितुष्ट येण्यास कारणीभूत ठरली सुरैया. दिलीपकुमारला सुरैया खूप आवडायची. पण सुरैया, देव आनंदवर मनापासून प्रेम करत होती. अन्‌ याच कारणास्तव देव आणि दिलीपकुमार यांच्यातून विस्तव देखील जात नव्हता…

दिलीप आणि सुरैया यांची बऱ्याच चित्रपटात जोडी जमली होती. एकत्र काम करता करता दिलीपकुमार सुरैयाच्या प्रेमात पडला. इतका की, त्याची नियत बिघडली. के. आसिफ यांच्या ‘जानवर’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्यामध्ये सुरैयाच्या पायाला साप चावतो. अन्‌ दिलीपकुमार ते तोंडाने ओढून बाहेर काढतो, असे दृश्य चित्रित व्हायचे होते. हे दृश्य तीन-चार दिवस पुन्हा पुन्हा शूटिंग करू लागले. तेव्हा सुरैयाच्या असं लक्षात आलं की, दिलीपने दिग्दर्शकाशी संगनमत केल्यानं हे दृश्य पुन्हा पुन्हा घेतलं जात होतं. तेव्हा तिनं रिटेक करण्यास मनाई केली अन्‌ सेटवरून निघून गेली. सुरैयाच्या मनाला दिलीपची वागणूक पटली नाही. अन्‌ तिनं पुन्हा त्याच्या बरोबर काम केलं नाही.

देव आनंदचं पहिलं प्रेम सुरैयावर जडलं होतं. ‘विद्या’ या चित्रपटात दोघे प्रथमच एकत्र आले. अन्‌ पहिल्या भेटीतच एकमेकांना दिल देऊन बसले. दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सिनेवर्तुळात रंगू लागल्या.

सुरैयाच्या आजीला हे संबंध पटले नाहीत. सुरैयाच्या आईला देव आनंद आवडत होता, पण आजीला तो नको होता. पण घरात आजीचा हुकुम चालत असल्याने तिचा या प्रेमाला कट्टर विरोध राहिला.

देव आनंद आणि सुरैया यांच्या प्रेमाची आणि ते लग्न करण्याच्या वार्ता त्यावेळी सिनेसृष्टीत खूप रंगल्या होत्या. पण मेहबूब खान, के. आसिफ, नौशाद या मंडळींचा या लग्नाला विरोध होता. त्यांच्या या विरोधात दिलीपकुमार देखील सामील झाला. कारण आपल्याला जी सुरैया आवडते, ती दुसऱ्या कोणाशी लग्न करण्याची कल्पना देखील तो करू शकत नव्हता.

या सर्व लोकांनी मिळून सुरैयाच्या आजीचे कान भरायला सुरुवात केली. अन्‌ सुरैया-देव यांच्यात दुरावा निर्माण झाला. सुरैयाचं देवशी फोनवरून बोलणं देखील आजीने बंद करून टाकलं. तिने देवला सुरैयापासून दूर राहण्याची ताकीद दिली, अन्‌ पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर ते दोघे चित्रपटात एकत्र आले नाहीत. अन्‌ सुरैया आजन्म अविवाहित राहिली.

दिलीपकुमारने आपल्या प्रेमात बिब्बा घातला, याची टोचणी देव आनंदच्या मनाला आजन्म लागून राहिली. म्हणून त्याने त्याला कधीच माफ केलं नाही. दोघांना एकत्र चित्रपट करण्याच्या आलेल्या ऑफर्स त्याने धुडकावल्या. इतकंच नव्हे तर, त्यानं समोरासमोर आल्यावर दिलीपकुमारशी कधी संभाषणसुद्धा केलं नाही. आयुष्यभर त्याच्याशी दुश्मनी राखली.