फेब्रुवारीमध्ये बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’, नि...

फेब्रुवारीमध्ये बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’, निर्मात्यांना का घ्यावा लागला हा निर्णय? (‘The Kapil Sharma Show’ Will Go off Air From February, Know The Reason Why)

सोनी टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय आणि सगळ्यांना खळखळून हसायला लावणारा ‘द कपिल शर्मा शो’ आता फेब्रुवारीमध्ये पाहता येणार नाही. केवळ देशातच नाही, तर परदेशातही या शोने आपला डंका वाजविलेला आहे. प्रेक्षकांना स्वतःचं दुःख विसरायला लावून त्यांचे निखळ मनोरंजन करणारा हा कार्यक्रम बंद होतोय, ही खरंच या शोच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. या कॉमेडी शोचा सर्वेसर्वा कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम तसेच दर आठवड्याला या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रेटीज सर्व मिळून मजामस्ती करून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात.

खरं तर ह्या शोच्या निर्मात्यांनाही हा शो बंद ठेवण्याचा निर्णय घेणं सोपं गेलं नसणार. तरीही कोविड-१९चे संकट अजूनही पूर्णतः टळलेले नाही, हे पाहता त्यांनी सध्या तरी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे समजते. फेब्रुवारीमध्ये या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाईल. यापूर्वीही काही वेळा हा शो बंद केला गेला आणि पुन्हा नव्या अंदाजात सुरूही झाला आहे.

सध्या कोरोनाच्या भयापोटी शोमध्ये लाइव्ह ऑडियन्सना यायला मिळत नाही, तसेच देशातील काही शहरांमध्ये अजूनही थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सेलिब्रेटीजनाही आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी या शोमध्ये येता येत नाही आहे. ही अडचण जाणूनच निर्मात्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ सध्या तरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी; कोरोनाचं संकट दूर होताच शो पून्हा चालू होईल, तेही नवीन अंदाजात असा विश्वासही त्यांनी आपल्या चाहत्यांना दिलेला आहे.

नवीन अंदाजातील ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये स्टार कास्टमध्ये बदल केले जाणार आहेत. तसेच या शोचे स्वरुपही थोडे वेगळे असणार आहे. थोडक्यात एका ब्रेकनंतर एका नवीन अंदाजाने या शोचं पुनरागमन होणार आहे.

हल्लीच कपिल शर्माने सोशल मीडियावर, तो पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्याची पत्नी गिन्नी चतरथ सोबत काही वेळ घालविता यावा यासाठी कपिलने या शोमधून ब्रेक घेणे, हे त्याच्या पचनीच पडले आहे. शोमधून ब्रेक घेतल्यानंतर कपिल आपली पत्नी गिन्नी आणि बेबी अनायरा यांची काळजी घेऊ शकेल. पत्नी, लेक आणि संपूर्ण कुटुंबासोबतच त्याला आता वेळ घालविता येणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’ हा दर्शकांबरोबरच, येथे येणाऱ्या सेलिब्रेटीजनाही आवडणारा शो आहे. कपिलची मजामस्ती आणि या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांची त्यांना आवडेल अशा शब्दात केली जाणारी टिंगल, याची दर्शकांना सवय लागली आहे. या शोमध्ये कपिल शर्मा व्यतिरिक्त कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, शुमोना चक्रवर्ती असे कलाकारही आहेत. अर्चना पूरन सिंह या शोची परीक्षक असून या शोच्या लेखकांचंही खूप कौतुक आहे. तेव्हा दर्शकांनो ब्रेक नंतर या शोच्या नव्या सीजनमध्ये काय पाहायला मिळेल याबद्दलची उत्सुकता ताजी ठेवा.