पायांचं आरोग्य आणि सौंदर्य (The Health and Beau...

पायांचं आरोग्य आणि सौंदर्य (The Health and Beauty of the feet)

पायांची ही काळजी म्हणजे सर्वस्वी पादत्राणांची जबाबदारी, असंच अनेकांचं मत असतं, जे मुळीच योग्य नाही. इतर ऋतूमध्येही एक वेळेस ठीक आहे; पण पावसाळ्यात ही पादत्राणंही हवी तेवढी मदत करत नाहीत. मग अशा वेळी पायांचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी, ते वाढवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

‘आपके पाव बहुत खुबसुरत है, इनको जमीन पर मत रखीयेगा. मैले हो जायेंगे.’ हा डायलॉग ऐकायला-बोलायला ठीक आहे; पण वास्तवात हे शक्य नाही, हेच खरं. तसं असलं तरी, आपले पाय ‘मैले’ होऊ नयेत म्हणून आणि झालेच तर त्यास काही अपाय होऊ नये म्हणून, काळजी नक्कीच घेता येईल. पायांची ही काळजी म्हणजे सर्वस्वी पादत्राणांची जबाबदारी, असंच अनेकांचं मत असतं, जे मुळीच योग्य नाही. इतर ऋतूमध्येही एक वेळेस ठीक आहे; पण पावसाळ्यात ही पादत्राणंही हवी तेवढी मदत करत नाहीत. मग अशा वेळी पायांचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी, ते वाढवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातही स्त्री-पुरुष, लहान-मोठे, गृहिणी, वर्किंग वूमन, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, या प्रत्येकाच्या पायांबाबतच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे पायांची काळजी घेतानाही तशीच विविधता पाळावी लागते. याविषयी जाणून घेऊ.

होम मिनिस्टर

सतत पाण्यात काम करणं, फिनेल, साबण, ब्रश यांच्या संपर्कात येणं, यामुळे गृहिणींच्या हातापायांच्या त्वचेचं खूप नुकसान होत असतं. अशातच पावसाळ्यामध्ये पाण्यात भिजल्यामुळे किंवा दमट हवामानामुळे पाय काळवंडतात. पायांना सुरकुत्या पडतात. योग्य स्वच्छता न राखल्यास नखात साबण साचून राहतो. हा साचून राहिलेला साबण नखांमध्ये बॅक्टेरिया तयार करतो आणि सतत साबण साचत राहिल्यास बोटांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

समस्या

– हातापायांची त्वचा कोरडी होते. त्वचेवर पापुद्रे जमतात. पापुद्रे निघताना वेदना होतात.

– त्वचा राठ होते.

– हातापायांना भेगा पडतात. भेगांमध्ये घाम जमा होतो.

– लाल चट्टे उठतात. खाज येऊन त्वचा काळवंडते.

– बोटांमधून काचर्‍या पडतात. बोटं ताणल्यास त्यातून रक्त येते.

– पायांची सतत जळजळ होते.

– नखुरडे होतात.

– नखाच्या मुळाशी खाज येते, त्वचा लाल होते.

– लोकल फंगस आणि फंगल इन्फेक्शन होतं.

उपाय

– हातपाय सतत कोरडे ठेवा. पायात नेहमी चपला घाला. हातात मात्र हातमोजे घालू नका.

– दिवसातून दोन वेळा अँटिसेप्टिक लोशन लावून हातपाय धुवा. अ‍ॅसिड बेस साबण पावसाळ्यात वापरू नका.

– टूथब्रशने नखं स्वच्छ करा. नखं वाढवू नका. नखं साबणाने धुऊन कोरडी करा.

– पायांवर चट्टे उठले असल्यास, साय आणि हळद यांचं मिश्रण त्यावर चोळा.

– पापुद्रे पडत असल्यास ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी एकत्र करून, हे मिश्रण तासभर पायांना लावून ठेवा.

– 4 चमचे लोणी फ्रीजमध्ये ठेवा. कडक झाल्यावर ते टाचांवर घासा आणि पायांवर गरम पाण्याची वाफ घ्या.

– नखुरडे असल्यास, कोणतीही घामोळ्याची पावडर कापसावर घेऊन लावा.

– काचर्‍या पडल्या असल्यास दिवसातून तीन वेळा अँटिसेप्टिक क्रीम कापसावर घेऊन, तो बोळा त्या भागावर ठेवा.

– पायांची आग होत असल्यास, चंदन पावडर चोळा.

वर्किंग वूमन

गृहिणींच्या पायांना घरकामामुळे त्रास होतो, तर कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांची समस्या काही वेगळीच असते. पावसात कितीही दक्षता घेतली, तरी पाय ओले होतातच. कामावर जाताना पाय भिजतात आणि बरेचदा कार्यालयात गेल्यावर तशा भिजलेल्याच पायांनी काम सुरू करावं लागतं. ओल्या पायांना घाण, चिखल चिकटलेला असतो. हा चिखल जास्त वेळ पायांवर तसाच राहिला, तर त्वचेला फंगल इन्फेक्शन होतं. यामुळे पायांना दुर्गंधी येणं, खाज सुटणं किंवा पाय लाल होणं यांसारखे प्रकार घडतात. सलवार जास्त घट्ट असल्यास अंगाला चिकटून बसते आणि त्यामुळे त्वचा अधिक काळ दमट, ओलसर राहते. मग पायांना खाज सुटते. जास्त खाजवल्यास त्वचेवर ओरखडे उमटतात. हाताची नखं जास्त वाढलेली असल्यास रक्तही येतं आणि त्याच्या खुणाही राहतात. तसंच त्वचेला सततचा ओलावा असल्याने हवेत असलेली धूळ, घाण तसंच चिखल त्वचेला चिकटतो. अशा वेळेस त्या भागावर पुरळ उठण्याची शक्यता असते. या पुरळांवर कधीही क्रीम किंवा तेल लावू नका. त्यामुळे पुरळीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

समस्या

– टाचा दुखतात.

– टाचांना जखमा होतात.

– पायाची मागची बाजू काळी पडते.

– पायांना खाज सुटते.

– त्वचेवर पुरळ येतात.

– संवेदनशील त्वचा असल्यास अ‍ॅलर्जीही होते.

– नखुरडे होतात.

– नखाच्या मुळांशी खाज येते.

– चिखल्या होतात.

उपाय

– पावसात घराबाहेर पडताना सोबत जाड टॉवेल बाळगा. कार्यालयात पोहोचल्यावर या टॉवेलने संपूर्ण अंग कोरडं करा.

– अधिक काळ अंगावर ओले कपडे ठेवू नका. ओले कपडे सातत्याने शरीराच्या संपर्कात राहिल्यास, त्वचेवर बुरशी येऊ शकते.

– हातपाय प्रथम साबणाने स्वच्छ धुऊन मगच कोरडे करा. बहुतांश लोक पाय न धुताच, कोरडे करतात. यामुळे त्वचेवर घाण चिकटून राहते.

– पाय धुणं शक्य नसल्यास, ओल्या टॉवेलने पुसून, नंतर कोरड्या टॉवेलने स्वच्छ कोरडे करून घ्या.

– काही स्त्रिया पावसाळ्यातही मोजड्या घालतात. कार्यालयात गेल्यावर ओल्या मोजड्या सुकवत ठेवून साध्या स्लिपर्स घाला.

– महत्त्वाचं म्हणजे, टाचा किंवा मागचा तळपाय काळा पडल्यास लिंबू अर्धा चिरून त्यावर 1 चमचा साखर घाला आणि ते काळवंडलेल्या भागावर गोलाकार चोळा. त्यानंतर एका तासाने पाय धुवा.

– पुरळ उठल्यास, अँटिसेप्टिक पावडर त्वचेवर चोळा.

– वेळ मिळाल्यास दोन बोटांमध्ये पावडर लावलेला कापूस ठेवा.

– चिखल्यांवर घरगुती उपाय म्हणजे, गोड्या तेलामध्ये हळद घालून त्याने मसाज करणं. नंतर हातपाय स्वच्छ कोरडे करा.

– नखांना चांगल्या प्रतीचं नेलपॉलिश लावा.

– 10 दिवसातून एकता पायांना वाफ द्या.

यंगस्टर्स

आजकाल आखूड, बिन बाह्यांच्या कपड्यांची फॅशन आहे. पावसाळ्यात असे कपडे बर्‍याच जणींना सोयीचे वाटतात. कारण त्यामुळे कपडे ओले होण्याची आणि अंगावर ओले कपडे अधिक काळ राहण्याची समस्याच उद्भवत नाही. मात्र अशा कपड्यांमुळे हातापायांचा बराचसा भाग उघडा राहतो. मग हातपाय सुंदर दिसावेत म्हणून मॅनिक्युअर-पेडिक्युअर, व्हॅक्सिंग, ब्लिचिंग इत्यादी करून घेतलं जातं आणि हे केलं म्हणजे, हातापायांची निगा राखली, असं त्यांना वाटतं. पण या व्यतिरिक्तही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. खरं तर पावसाळ्यात उघड्या हात-पायांवर ओलावा राहिल्यामुळे त्वचा अधिक खराब होते.

उपाय

– पावसाळ्यात मेनिक्युअर, पेडिक्युअर करू नका.

– शक्यतो पावसाळा सुरू होण्यापूर्वी ब्लिचिंग करून घ्या. ब्लिचिंग करण्यापूर्वी आणि नंतर त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.

– गुडघे, हाताचे कोपरे उघडे असतात आणि ते काळे असल्यास फार वाईट दिसतात. अशा काळा भागांवर संत्र्याची साल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.

– व्हॅक्सिंग करून झाल्यावर लगेच पावसात जाऊ नका. व्हॅक्सिंगमुळे त्वचेची छिद्रं मोकळी होतात. आणि त्यात पटकन जंतू साचू शकतात. अशा वेळी टर्किश टॉवेलने त्वचा चांगली घासा.

– पायांना टाल्कम पावडर सतत चोळा.

– तिळाच्या तेलाने नखं, बोटं यांना मसाज करा.

मेन्स वर्ल्ड

पावसाळ्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांना पायांचा अधिक त्रास जाणवतो. कारण एक तर पुरुषांच्या त्वचेवर लव जास्त असतात. तसंच स्त्रियांच्या मानाने त्यांची त्वचाही जाड आणि राठ असते. हातापायांवर जास्त प्रमाणात लव असल्यामुळे पुरुषांनी त्वचा स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. परंतु, पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचा ओलसर आणि दमट राहते. त्यामुळे केसांच्या तळाशी जास्त द्रव्य साचून त्वचेवरील छिद्रं बंद होतात. छिद्र बंद झाल्यामुळे त्वचेस मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि परिणामी त्वचा जाड होते.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बहुतेक पुरुषांचे पाय 24 तासांपैकी किमान 12 तास मोजे आणि बुटात असतात. सतत पाय बुटात राहून त्वचेला चट्टे पडतात. त्वचा राठ होते आणि कालांतराने पायांना भेगा पडतात. मुळातच जाड त्वचेचा थर, त्यात या भेगा अत्यंत वेदनादायक असतात. प्युमिक स्टोन अथवा ब्रशने घासूनही ही मृत त्वचा सहसा निघत नाही. तसंच पायांना कुबट वास येणं, ओले बूट घालून वावरल्यामुळे अंगठा, करंगळी यातून फोड किंवा बॉईल्स येणं, खाज सुटणं, सुरकुत्या पडणं यांसारखे रोग उद्भवतात. त्वचेवर असलेल्या लवांमुळे पायाला काळपटपणा येतो आणि फंगल इन्फेक्शनही पटकन होतं.

उपाय

– कधीही ओले मोजे घालू नका.

– दोन तासांपेक्षा अधिक काळ सतत पायात बूट ठेवू नका. शक्य असल्यास ऑफिसमध्ये स्लिपर्स घाला.

– पायांना तिळाचं तेल, बदाम तेल यांनी मसाज करा.

– संवेदनशील त्वचा अथवा उष्ण प्रकृती असणार्‍यांनी पावसाळ्यापूर्वी व्हॅक्सिंग करून घ्या.

– पायांना सतत पावडर लावा. फोड बॉईल्स असल्यास अँटिसेप्टिक क्रीम लावा. पावडर लावू नका.

– रात्री झोपताना पायांना गुलाबपाणी चोळा.

– बदाम उगाळून अंगठा आणि करंगळी यांना लावा.

बच्चे कंपनी

पावसाळ्यातील दमट हवामान घरातील फरश्यांनाही ओलसर ठेवते. ओलसर जमिनीवर धूळ, घाण पटकन बसते. बाळ जेव्हा घरभर रांगतं, तेव्हा त्याच्या तळहाताला, गुडघ्याला ही घाण लागत असते. बाळाला अंघोळ घातल्यानंतर ही घाण जातेही, मात्र गुडघ्यावर डाग उमटतात. वेळीच ते डाग न घालवल्यास, बाळाचे गुडघे काळपट होतात. अशा वेळेस पावसाळ्यातच नाही, तर जेव्हा बाळ रांगू लागतं, तेव्हापासून त्याला हातमोजे आणि पायजामा घाला. तसंच त्याला दररोज गरम तेलाने मसाज करा. शिवाय संपूर्ण घराच्या फरश्या कोरड्या ठेवा.

आय.आर.बी.च्या एका सर्वेक्षणानुसार, पावसाळ्यात 70 टक्के लोकांना पायाच्या तक्रारी उद्भवतात आणि त्यातही स्त्रियांचं प्रमाण हे 82 टक्के आहे. तेव्हा या गटात आपला समावेश होऊ नये असं वाटत असेल, तर आपल्या पायांची विशेष काळजी, जरूर घ्या.