द फॅमिली मॅन २ ची अभिनेत्री प्रियामणिची व्यथा; ...

द फॅमिली मॅन २ ची अभिनेत्री प्रियामणिची व्यथा; लोक काळी आणि जाडी म्हणून हिणवायचे…(The Family Man 2: Actress Priyamani Says People Body Shamed Her, Called Her Aunty & Black)

गेल्या काही दिवसांपासून ‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. या वेब सीरिजमधील मनोज वायपेयीच्या पत्नीची भूमिका साकrरणारी अभिनेत्री प्रियामणि ही दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि खूप कमी लोकांना माहीताहे की ती, विद्या बालनची चुलत बहीण आहे.

‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अलिकडेच प्रिया मणिने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या काही खासगी गोष्टी सांगितल्या. त्यात अभिनेत्री प्रियामणिने तिला अनेकदा काळी आणि जाडी म्हणून हिणवले गेले असल्याचं सांगितलं आहे.

ती म्हणाली, “मला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. जेव्हा माझं वजन आतापेक्षा जास्त होतं तेव्हा अनेकजण मला मोटी, जाडी म्हणाले आहेत. तू खूप मोठी दिसतेस असं लोक म्हणायचे आणि जेव्हा आता मी बारिक झाले तेव्हा मी इतकी बारीक का झाले असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. एवढचं नाही तर तू आधी जशी होती तशीच छान दिसायची असंही ते म्हणत आहेत.”

लोकांच्या अशा विचित्र प्रतिक्रियांना उत्तर देताना प्रिया म्हणाली, “लोकांनी त्यांचे विचार बदलायला हवे. एका गोष्टीवर ठाम रहा. मी जाडं किंवा सडपातळ असणं ही माझी पसंती आहे. तुम्ही एखाद्याला जाडं आहे असं म्हणून हिणवू कसं शकता?”

एवढचं नाही तर प्रियाला तिच्या रंगावरून देखील अनेकदा वेगवेगळ्या कमेंटसचा सामना करावा लागल्याचं ती म्हणाली, “ मी बिना मेकअपचे फोटो शेअर केले की लोक मला आंटी बोलायचे. माझा चेहरा गोरा आणि पाय मात्र काळे दिसतात, असं ते म्हणायचे. मी म्हणायचे, या लोकांना झालंय तरी काय. माझा रंग गोरा नसला तरी मला फरक पडत नाही. काळ्या रंगाच्या व्यक्ती सुंदर नसतात का? मी काळी आहे म्हणून मला नावं ठेवण्याऐवजी लोकांनी आपले विचार बदलले पाहिजेत. भगवान कृष्णदेखील काळेच होते.”

”खरं तर तुमच्या मनात जरी असे विचार असतील तर किमान ते न बोलता मनातच ठेवा. उगाच कुणी जाडं आहे किंवा काळं आहे असं म्हणून नकारात्मकता पसरवू नका.” असं प्रियामणि म्हणाली.