कॉमेडी किंग बनलेल्या कपिल शर्माकडे बहिणीच्या लग...

कॉमेडी किंग बनलेल्या कपिल शर्माकडे बहिणीच्या लग्नासाठी पैसे नव्हते… (The Comedy King Kapil Sharma Did Not Even Have Money For Sister’s Wedding)

टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख बनविणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा याला सहजासहजी ही लोकप्रियता मिळालेली नाही. त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे आणि नशीबाची साथही मिळाली. परंतु, याच कपिल शर्माकडे एकेकाळी आपल्या बहिणीचे लग्न लावून देण्यासाठी पैसे नव्हते. कपिलच्या या संघर्षाची गोष्ट नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी असणार आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कमालीची विनोदबुद्धी लाभलेला कपिल शर्मा आपल्या विनोदाने करोडो, अरबो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. कार्यक्रमातील त्याचे पंचेस ऐकताना दर्शकांना अजिबात कंटाळा येत नाही. कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी मूड फ्रेशनरचं काम करणारा कपिल भारतातच नव्हे तर इतर देशांतही लोकप्रिय आहे. ऐषोआरामात राहणारा कपिल आज करोडो संपत्तीचा मालक आहे. अर्थात हा सगळा त्याच्या कष्टाचा पैसा आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आज भले ही कपिल करोडपती आहे, परंतु एकेकाळी मध्यमवर्गीयांमध्ये मोडणाऱ्या कपिलला आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. आपल्या संघर्षाचा काळ तो अधूनमधून आठवत असतो. एक साधारण कपिल ते कॉमेडी किंग बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय खडतर होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पंजाब मधील अमृतसर येथे जन्मलेला कपिल शर्मा लोअर मिडल क्लास कुटुंबात लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होते आणि त्यांची आई गृहिणी आहे. त्याच्या वडिलांना कॅन्सर झालेला होता, ते फारसे जगले नाहीत. वडील वारले त्यावेळेस कपिल अतिशय लहान होता. लहानपणी अचानक खांद्यावर पडलेल्या जबाबदारीमुळे घरची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली होती. परिस्थिती इतकी वाईट होती की आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठीची अंगठी आणण्याकरिताही त्याच्याकडे पैसे नव्हते. पुढे जाऊन आपलं नशीब इतकं बदलेल अशी पुसटशी कल्पनाही कपिलला तेव्हा नव्हती.  

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

कपिल शर्माने २००७ साली टेलिव्हिजनवरील ‘लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोचा तो विजेता ठरला आणि त्याचं नशीब बदललं. विजेता म्हणून त्याला बक्षिसाची जी रक्कम मिळाली त्या पैशांत त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं. त्यानंतर तो यशाच्या एकेक पायऱ्या चढत गेला. लाफ्टर चॅलेंजनंतर त्याने कॉमेडी सर्कसमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याने छोटो मियां आणि झलक दिखला जा यासारख्या रिॲलिटी शोचे होस्टपद सांभाळले. नंतर त्याने ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ नावाचा स्वतःच्या नावाचा एक शो लाँच केला. या शोने कपिलला यशोशिखरावर पोहचवले. या शोमुळे तो घराघरात पोहोचला आणि लोकप्रिय झाला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कपिलचं करिअर व्यवस्थित चालू असतानाच काही कारणाने त्याचे सहकलाकार सुनील ग्रोवरसोबत बिनसलं आणि त्याला आपला शो बंद करावा लागला. सुनील हा कपिलच्या शोचा एक्का होता. सुनीलसोबत फारकत झाल्यापासून कपिल अस्वस्थ राहू लागला होता. त्याचा ताण इतका वाढला होता की त्याला नैराश्याला सामोरं जावं लागलं होतं. मात्र पुन्हा त्याने स्वतःला सावरलं आणि नव्याने आपला कॉमेडी शो सुरू केला. अन्‌ आज तो जो काही आहे, तो आपण पाहू शकतो. राजा माणूस असल्यासारखे जीवन तो आज जगत आहे. लोकांना तो त्याच्या विनोदीबुद्धीने वेड लावत आहे.