शहनाज गिल या कारणामुळे गेली होती घर सोडून, अभिन...

शहनाज गिल या कारणामुळे गेली होती घर सोडून, अभिनेत्रीने स्वत: सांगितले कारण (That’s Why Shehnaaz Gill Ran Away From Her House, Now Actress Revealed the Reason)

अभिनेत्री शहनाज गिल हिला पंजाबची कतरीना कैफ म्हणतात. सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत शहनाज गिल इंडस्ट्रीतील मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकत आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये शहनाजने आपल्या खोडकर आणि नखरेल स्टाइलने सर्वांची मने जिंकली होती, या रिअॅलिटी शोपासून शहनाजने इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले आहे. शहनाजने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेतले आहे.  यासाठी तिला तिच्या पालकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. एकदा शहनाज गिलला घरातून पळून जावं लागलं होतं, त्यामागचं कारण अभिनेत्रीने उघड केलं आहे.

 अलीकडेच शहनाज गिल ‘इंडियन आयडॉल 13’ या सिंगिंग रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून दिसली होती. तिथे तिला शोची स्पर्धक देबोस्मिताचे गाणे खूप आवडले. ती खूप प्रभावित झाली. या शोमध्ये शहनाज गिलने आपल्या प्रवासाविषयी सांगताना तिला घरातून का पळून जावे लागले होते तेही सांगितले.

शोमध्ये शहनाजने सांगितले की, तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरातून पळून जावे लागले, कारण तिला इंडस्ट्रीत करीअर करायचे होते, परंतु तिचे आई-वडील पाठिंबा देत नव्हते. अभिनेत्री म्हणाली की, आपल्या देशातील काही कुटुंबे नोकरदार महिलांना पाठिंबा देतात, मात्र बहुतांश कुटुंबे काम करणाऱ्या महिलांच्या विरोधात आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा आई-वडिलांनी मला साथ दिली नाही तेव्हा मी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरातून पळ काढला.

शोची स्पर्धक देबोस्मिता भाग्यवान असल्याचे वर्णन करताना, शहनाज गिल म्हणाली की तू भाग्यवान आहेस कारण तुला खूप मदत करणारे पालक मिळाले आहेत. तूही त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहा आणि त्यांना अभिमान वाटेल असे काहीतरी कर. यादरम्यान शहनाजने,  पहिल्यांदाच ती आपल्या आईला दुबईच्या आंतरराष्ट्रीय सहलीवर घेऊन गेली होती तेव्हाची ती भावना आपल्यासाठी किती खास होती ते सांगितले. 

शहनाज गिल एक अभिनेत्रीच नाही तर एक मॉडेल आणि एक उत्तम गायिका देखील आहे. शहनाजने आपल्या करीअरची सुरुवात 2015 मध्ये ‘शिव दी किताब’ या म्युझिक व्हिडिओने केली होती, त्यानंतर 2017 मध्ये ती ‘सत श्री अकाल इंग्‍ज’ या पंजाबी चित्रपटात दिसली होती. 2019 मध्ये, तिने ‘बिग बॉस 13’ मध्ये भाग घेतला, तिथून तिला देशभरात लोकप्रियता मिळाली.

 शहनाज गिलच्या कामाबद्दल सांगायचे तर,ती सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात शहनाज एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.