‘धिंगाणा’च्या सेटवर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीम...

‘धिंगाणा’च्या सेटवर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमला मिळाला सर्वाधिक रक्कम मिळविण्याचा मान (‘Tharla Tar Mag’ Team Of Marathi Serial Wins Topmost Prize Money In The Reality Show Task)

स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सिद्धार्थ जाधवचं खुमासदार सूत्रसंचालन आणि स्टार प्रवाहच्या परिवाराचा अनोखा अंदाज या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहे. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सादर होणारे भन्नाट टास्क. प्रत्येक एपिसोडला नवा टास्क कलाकारांना दिला जातो. या मंचावर येणारे प्रत्येक कलाकार हा टास्क मनापासून पूर्ण करुन त्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात.

आता होऊ दे धिंगाणाच्या यावेळेच्या भागात ठरलं तर मग मालिकेच्या टीमने सर्वात जास्त म्हणजेच एक लाख पन्नास हजारांची रक्कम जिंकत या मंचावर नवा विक्रम रचला. आजवर या कार्यक्रमात सामील झालेल्या कोणत्याच टीमला हा पल्ला गाठता आलेला नाही. मात्र ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीने चातुर्याने आपल्या टीमला एक लाख पन्नास हजारांची रक्कम मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना म्हणाली, ‘नव्या वर्षाची सुरुवातच खूप सकारात्मक झाली. आता होऊ दे धिंगाणामध्ये अंतिम फेरी असते आणि ती म्हणजे घंटाघर. यात तुमच्या डोळ्याला पट्टी बांधून घंटाघर मध्ये पाठवलं जातं. सर्वाधिक रक्कम याच फेरीतून जिंकू शकतो. यात रक्कम तीन भागांमध्ये विभागलेली असते. मला नशिबाची साथ मिळाली आणि सर्वाधिक रक्कम मी उचलली. त्यामुळे मुरांबा टीमला हरवून ठरलं तर मग मालिकेची टीम विजेती ठरली. खास बात म्हणजे आमच्या टीमला सर्वाधिक रक्कम मिळवण्याचा मान मिळाला. हा क्षण मी कधीही विसरु शकत नाही.’