अंदमानच्या निसर्गरम्य वातावरणात वहिदा – आ...

अंदमानच्या निसर्गरम्य वातावरणात वहिदा – आशा – हेलन या ज्येष्ठ अभिनेत्रींची मौजमजा (Teen SAHALIYAN.. Asha Parekh, Waheeda Rehman, n Helen Taking A Break Recently At The Andaman Islands)

गेल्या महिन्यात ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात वहिदा रेहमान, आशा पारेख, हेलन या जुन्या जमान्यातील बुजुर्ग अभिनेत्रींनी भाग घेतला होता. सिनेमासृष्टीतील त्यांचा सहभाग, आठवणी आणि आपल्या जीवनातील काही घटनांना त्यांनी उजाळा दिला होता. कार्यक्रमाचा हा भाग हिट झाला होता. आता त्याच तीन ज्येष्ठ अभिनेत्री अंदमानच्या निसर्गरम्य बेटावर सहलीसाठी गेल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वहिदा-आशा आणि हेलन या तिघीजणी चांगल्या मैत्रिणी आहेत, हे आता सर्वांना ठाऊक आहे. उतारवयात त्या एकमेकींच्या सहवासात चांगल्यापैकी वेळ घालवतात. आता त्या तिघींना सहलीला जाण्यासाठी वेळ मिळाला आणि त्या मौजमजा करण्यासाठी अंदमानात दाखल झाल्या आहेत.

त्यांच्या या सहलीचे फोटो सर्वात आधी फॅशन डिझायनर व राजकीय नेता शायना एन. सी. ने पोस्ट केले. त्यामध्ये तिने वहिदा-आशा-हेलन यांना वंडरवुमन असे संबोधित केले. या फोटोंमध्ये त्या तिघी तणावमुक्त आणि आनंदात वेळ घालवताना दिसत आहेत.

याशिवाय चित्रपट निर्माता तनुज गर्ग याने देखील या तिघींचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिघीजणी खूप मजा करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करून तनुजने लिहिलं आहे की, ‘दिल चाहता है’ हा चित्रपट जर ज्येष्ठ नागरिकांना घेऊन काढायचा झाला तर त्यासाठी वहिदा रेहमान, आशा पारेश आणि हेलन या तीन कलावती अगदी योग्य आहेत.

एका फोटोमध्ये वहिदा, आशा आणि हेलन एका बोटीत विहार करताना दिसत आहेत. त्यात आशा व हेलन बसल्या आहेत आणि दोघींच्या मधे वहिदा उभी आहे.

दुसऱ्या फोटोत आशा आणि वहिदा लाईफ जॅकेट घालून बसल्या आहेत. वहिदा रेहमान बोटीचे स्टिअरिंग धरून बसली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य बघण्याजोगे आहे.

काही दिवसांपूर्वी वहिदा रेहमानचा एक धाडसी फोटो सोशल मीडियावर विलक्षण व्हायरल झाला होता. त्यामध्ये ८३ वर्षे वयाची वहिदा रेहमान निडरपणे स्कूबा डायव्हिंग करताना आढळली होती. हा तिचा फोटो अंदमान बेटावरचाच आहे.

तीन बुजुर्ग अभिनेत्रींच्या मौजमस्तीचे हे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या वयात लोकांची जगण्याची उमेद ओसरली असते. अशा स्थितीत या तिघींची आनंदाने जगण्याची उमेद पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत. कित्येक मान्यवर कलाकार देखील त्यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.