नात्याचे मूल्य सांगणाऱ्या ‘गोदावरी’चा टीझर प्रद...

नात्याचे मूल्य सांगणाऱ्या ‘गोदावरी’चा टीझर प्रदर्शित : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कारांचा मानकरी झालेला चित्रपट (Teaser Of ‘Godavari’ Marathi Film Who Has Bagged A Couple Of Awards In International Film Festivals Released)

जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट  प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नातेसंबंधातील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळते. आता या कुटुंबाचे आणि ‘गोदावरी’चे नक्की काय नाते आहे, हे सध्या गुलदस्त्यात असले तरी लवकरच याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ”कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचे मूल्य सांगणारा, नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

इफ्फी महोत्सवात मोहोर उमटवलेल्या ‘ गोदावरी’ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लौकिक मिळवला आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपला झेंडा रोवला आहे. आता घरच्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झालेला ‘गोदावरी’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.