द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती, जा...

द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती, जाणून घेऊया त्यांचा शिक्षक ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास (Teacher, Clerk, Minister And Now President – Read The Struggle Story Of Draupadi Murmu, The 15th President Of India)

देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झालाय. त्यांनी यूपीएच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांच्यानंतर प्रथमच एका महिलेला या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या त्या दुसऱ्याच महिला आहेत. उल्लेखनीय म्हणजे मुर्मू यांच्या रुपात राष्ट्रपती होण्याची आदिवासी महिलेला प्रथमच संधी मिळाली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देशभर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाची बरसात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.

खरं तर आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांच्यासाठी बिलकूल सोपा नव्हता. परंतु लोकांची सेवा करण्याची त्यांची जिद्द मोठी होती आणि म्हणूनच आपल्या मार्गात आलेल्या सर्व अडचणींना धीराने तोंड देत एका झोपडीतून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा खडतर प्रवास त्यांनी पार केला. चला जाणून घेऊया मुर्मूच्या या खडतर प्रवासाची कहाणी…

बालपण अतिशय हलाखीचे, कॉलेजात जाणारी गावातील पहिली मुलगी

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील बैदपोसी गावात झाला. द्रौपदी संथाल या आदिवासी वांशिक गटातील आहेत. त्यांचे वडील बिरांची नारायण तुडू हे शेतकरी होते. द्रौपदी यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, पण त्यांनी आपल्या परिस्थितीस कधीही कष्टाच्या आड येऊ दिले नाही आणि आपले शिक्षण चालू ठेवले. गावातच शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी भुवनेश्वरला जाणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिल्याच मुलगी होत्या.

द्रौपदी मुर्मू यांची लव स्टोरी

भुवनेश्वर येथे कॉलेजमध्ये शिकत असतानाच मुर्मू यांची श्यामचरण मुर्मू यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, मग प्रेम. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्यामचरण लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी गेले. पण मुर्मूच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला साफ नकार दिला. मात्र श्यामचरण यांनी हार मानली नाही. ते द्रौपदीच्या गावात तळ ठोकून बसले. द्रौपदी यांनी सुद्धा ठणकावून सांगितले की, जर तिने लग्न केले तर ती श्यामचरण यांच्यासोबतच करेल. अखेरीस त्यांच्या वडिलांना त्यांचे ऐकावेच लागले. श्यामचरणच्या कुटुंबाने त्यांना एक बैल, एक गाय आणि १६ जोड कपडे हुंड्यात द्यावे या अटीवर त्यांनी त्यांच्या लग्नास परवानगी दिली. द्रौपदीच्या सासरच्या लोकांनी हे सर्व देण्याचे मान्य केले आणि दोघांचे लग्न पार पडले.

दोन मुलगे आणि पती ५ वर्षातच गमावले

लग्नानंतर द्रौपदी यांचं वैवाहिक जीवन सुखाने सुरू झाले. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या. सर्वकाही आलबेल असतानाच अचानक त्यांच्या जीवनात वादळ आलं. २००९ साली त्यांच्या एका मुलाचे निधन झाले. मुलगा घरीच बेशुद्धावस्थेत आढळला, रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्या दु:खातून अजून त्या पूर्णपणे सावरल्या नव्हत्या तोच चार वर्षांनंतर म्हणजे २०१३ मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. आणि पुढच्याच वर्षी त्यांचे पती श्यामचरणही त्यांची साथ सोडून गेले. अवघ्या ५ वर्षात त्यांनी दोन मुलगे आणि पतीला गमावले. मुर्मू या घटनांनी अतिशय खचून गेल्या होत्या.

स्वतःचे दुःख विसरण्यासाठी दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी

दोन मुलं आणि पती यांच्या निधनानंतर द्रौपदी मुर्मू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता परंतु त्यांनी हार मानली नाही.  उलट स्वत:चे दु:ख विसरण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांचे दुःख अंगीकारले. सासरच्या डोंगरपूर ट्रस्टची संपूर्ण जमीन त्यांनी शाळेच्या नावावर केली. आता या शाळेत मुलांना शिक्षण मिळते. चार एकरात पसरलेली ही शाळा निवासी शाळा असून इयत्ता ६वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. सध्या कामातील व्यस्ततेमुळे त्या या शाळेत फक्त मुलं आणि पती यांच्या पुण्यतिथीलाच जातात. मुर्मू यांनी कायम मुलांना शिक्षित करण्याचा ध्यास धरला, आणि म्हणूनच त्यांनी घराचे शाळेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षक, क्लार्क, मंत्री आणि आता राष्ट्रपती

मुर्मू यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लिपिक म्हणून केली. १९७९ ते १९८३ पर्यंत त्यांनी पाटबंधारे व उर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले. १९९४ ते १९९७ पर्यंत त्यांनी मानद सहाय्यक शिक्षक म्हणूनही काम केले. १९९७ मध्ये, द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय खेळी सुरू केली. त्याच वर्षी रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे २००० मध्ये बिजू जनता दल आणि भाजपच्या युती सरकारच्या काळात त्या मंत्री झाल्या.

२००७ मध्ये, मुर्मू यांना ओडिसा विधानसभेने वर्षातील सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना झारखंडचे राज्यपाल बनवण्यात आले. शिक्षिका, कारकून, मंत्री ते आता राष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांची सेवा आणि यश हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्या देशाच्या नागरिकांसाठी विशेषतः गरीब, शोषित आणि वंचितांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत.