चहाची चव निराळी (Tea with a different taste)

चहाची चव निराळी (Tea with a different taste)

चहाचे अनेकविध प्रकार जगभरात चाखायला मिळतात. ग्रीन, लेमन, ऑरेंज, स्ट्रॉबेरी, पायनापल, विड्याच्या पानांचा रस घालून तयार केलेला चहा इत्यादी. चहाच्या अशाच काही निराळ्या चवींविषयी-
पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा. भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, युगांडा, टांझानिया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं, तरी चहाची सर्वांत पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहाला जगभर पार्टीचं स्वरूप आलेलं आहे. चीनमध्ये गॉमफाय टी सेरीमनी असते. त्यात मुद्दाम मातीच्या भांड्यांत चहा देतात. त्याला ‘थिक्सिंग टी पॉट’ म्हणतात. आपल्याकडे आजही वधू-वर संशोधनाच्या वेळेस वाफाळलेला चहा आणि पोह्यांचा कार्यक्रम होतो. जपानमध्ये चहा सादर करणं, ही कला मानली जाते.
चहाचे अनेकविध प्रकार आपल्याला जगभरात चाखायला मिळतात. लेमन, ऑरेंज, पायनापल, स्ट्रॉबेरी, विड्याच्या पानांचा रस घालून तयार केलेला थंड चहा, ग्रीन टी इत्यादी. त्यातही आजकाल ग्रीन टी हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून, त्यात भरपूर अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स असतात.

चहाची कथा
चहाबद्दल असं सांगितलं जातं की, पाच हजार वर्षांपूर्वी शेननंग नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. एकदा तो आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेचा हालहवाल विचारावा, म्हणून लवाजम्यासह निघाला. वाटेत एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबल्यावर, त्याने पिण्यासाठी गरम पाणी मागितलं. नोकरांनी पाणी उकळायला ठेवलं असता, त्यात नजीकच्या झुडपाची काही वाळलेली पानं पडली आणि पाणी करड्या रंगाचं झालं. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा, असं मानलं जातं.

चहाचे प्रकार
मोगली चहा
साहित्य : 4 कप पाणी, 4 चमचे साखर, 4 चमचे चहा पूड, 1 कप दूध, प्रत्येकी पाव चमचा जायफळ, जायपत्री, लवंग, वेलदोडा, केशर यांची पूड.
कृती : पाणी आणि साखर उकळवून घ्या. त्यात सर्व पूड घालून पुन्हा मिनिटभा उकळवा. त्यानंतर त्यात चहा पूड घालून तीन मिनिटं झाकून ठेवा. चहा गाळून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

काश्मिरी काहवा
साहित्य : 4 कप पाणी, 4 चमचे साखर, 4 चमचे चहा पूड, 10-12 बदामांचे काप, पाव चमचा केशर.
कृती ः पाणी आणि साखर एकत्र उकळा. त्यात चहा घालून, तीन मिनिटं झाकून ठेवा. त्यानंतर गाळून त्यात बदामाचे काप व केशर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

मसाला चहा
साहित्य : 4 कप पाणी, 4 चमचे साखर, 4 चमचे चहा पूड, 1 चमचा चहाचा मसाला, 1 कप दूध.
कृती: पाणी आणि साखर एकत्र उकळून घ्या. त्यात चहाचा मसाला घालून पुन्हा उकळा. नंतर चहा पूड घालून तीन मिनिटं झाकून ठेवा. त्यानंतर गाळून त्यात गरम दूध घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.
चहाचा मसाला तयार करण्यासाठी ः 50 ग्रॅम सुंठ पूड, प्रत्येकी एक लहान चमचा लवंग, वेलदोडे, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, बडिशेप यांची पूड. हे सर्व एकत्र करून हवा बंद डब्यात भरून ठेवा.

आइस टी
साहित्य: 4 ग्लास पाणी, 3 चमचे चहाची पूड, 4 चमचे साखर.
कृती: पाणी आणि साखर एकत्र उकळून घ्या. त्यात चहा पूड घालून तीन मिनिटं झाकून ठेवा. गाळून थंड होऊ द्या. नंतर त्यात आवडीप्रमाणे संत्रं, अननस, मोसंबी किंवा स्ट्रॉबेरीचा एक कप रस एकत्र करा. हे मिश्रण दोन तासांकरिता फ्रीजमध्ये ठेवा. नंतर थंडगार आइस टी सर्व्ह करा.
टीप: लेमन टी करण्यासाठी याप्रमाणे चहा तयार करून, त्यात फळांच्या रसाऐवजी एका लिंबाचा रस घाला.

विड्याच्या पानांचा चहा
साहित्य: 4 कप पाणी, 4 चमचे साखर, प्रत्येकी अर्धा चमचा लवंग, जायफळ, वेलदोडे पूड, गुलकंद, गुंजेचा पाला, 4 चमचे चहा पूड, 10 विड्याची पानं.
कृती: पाणी आणि साखर एकत्र उकळवा. त्यानंतर त्यात लवंग, जायफळ, वेलदोडे पूड घालून उकळवा. त्यात गुलकंद, गुंजेचा पाला घालून मिनिटभर उकळा. त्यानंतर चहा पूड घालून झाकून ठेवा. चहा गाळून गार होऊ द्या. आता विड्याच्या पानांमध्ये दीड कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यातील पाणी गाळून चहामध्ये एकत्र करा आणि दोन तासांकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या.

पीच टी
साहित्य:  4 पीच, 4 ग्लास पाणी, 4 चमचे चहा, 4 चमचे साखर
कृती: कपभर पाण्यात पीच दोन तासांकरिता भिजत ठेवा. नंतर बिया काढून मिक्सरमधून वाटून घ्या. पाणी आणि साखर उकळा. त्यात चहा पूड घालून तीन मिनिटं झाकून ठेवा. नंतर गाळून घ्या. चहा गार झाल्यावर त्यात पीचचा रस घाला. दोन तास फ्रिजमध्ये ठेवून, नंतर थंडगार सर्व्ह करा.