करमाफी मिळविण्याचे राजमार्ग (Tax Saving Solutions)

करमाफी मिळविण्याचे राजमार्ग (Tax Saving Solutions)

दरवर्षीच्या अर्थसंकल्पात करमाफीच्या तरतुदी दिलेल्या असतात. तेव्हा आपल्या कर सल्लागाराच्या मदतीने कराच्या कचाट्यातून सुटण्याचा राजमार्ग निवडा आणि निर्धास्त व्हा.
मार्च महिना म्हणजे होळीचा महिना. अन् आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. त्याचप्रमाणे जाहीर झालेल्या केन्द्रीय अर्थसंकल्पाच्या नावाने (बहुधा) शिमगा साजरा करण्याचा महिना. अर्थसंकल्पावरील चर्चेचा नि उद्योगधंद्याचे ताळेबंद तयार करण्याचा, आर्थिक वर्षाच्या समारोपाच्या निमित्ताने हिशेब चुकते करण्याचा महिना. उद्योगधंद्यांचे हिशेब बंद होत असल्याने त्यामध्ये काम करणार्‍या नोकरदारांना आपला आयकर भरण्याची गणितं मांडावी लागतात. कर कसा चुकवावा, त्याच्या युक्त्या-प्रयुक्त्या आखण्यात महिना अखेर कशी येते तेच कळत नाही. कर चुकवावा का, त्यातून काही चौकशीचा फेरा तर मागे लागणार नाही ना, अशीही भिती नोकरदारांना अकारण असते. खरं तर अशी भिती बाळगण्याचं काहीच कारण नाही. कारण जे करबुडवे असतात, ते आयकर खात्याच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकू शकतात. प्रामाणिक करदात्यांनी कायदेशीर मार्गाने कर चुकविण्याचा प्रयत्न करणे, यात काहीच गैर नाही. ते आयकर खात्याच्या नजरेत खुपणारही नाही. तेव्हा आपल्या कर सल्लागाराच्या मदतीने कराच्या कचाट्यातून सुटण्याचा राजमार्ग निवडा आणि निर्धास्त व्हा.

गृहिणी, मुलांच्या नावे भरणा
आयकर नियमाच्या 80 सी कलमाखाली प्रत्येक व्यक्तीला एका मर्यादेपर्यंत करमाफी मिळते. समजा तुम्ही ती मर्यादा गाठली असेल, तरी काळजी करू नका. तुम्ही काही प्रमाणात, तुमचं उत्पन्न गृहिणी असलेली पत्नी किंवा लहान मुलांच्या नावे भरणा करू शकता. तुम्ही दिलेल्या त्यांच्या उत्पन्नातून, त्यांच्या वतीने तुम्ही प्रॉव्हिडंट फंड किंवा इएलएसएस फंडात गुंतवू शकता. त्याचप्रमाणे युलिप्स आणि टॅक्स फ्री बॉण्ड्समध्येही गुंतवू शकता. या व्यवहाराला गिफ्ट टॅक्सचे नियम लागू होत नाहीत. अगदी तुमच्या किंवा तुमच्या पत्नीच्या (अथवा पती) उत्तराधिकार्‍यांनादेखील त्याचा त्रास केला जात नाही. त्यामुळे करातून सवलत मिळवण्यासाठी, तुम्ही या व्यवहारात पाहिजे तेवढी रक्कम ट्रान्सफर करू शकता.
अजाण मुलांच्या (मायनर) नावे जर गुंतवणूक केलीत, तर प्रत्येक मुलामागे 1500 रुपयांची वजावट क्लेम करू शकता. म्हणजे समजा तुम्ही दोन मुलांसाठी 15 ते 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली. तीही एक वर्षासाठी मुदत ठेवींमध्ये केलीत तर तुम्हाला करमाफी मिळेल. शिवाय करपात्र नसलेले सुमारे 10 टक्के उत्पन्न तुम्ही टाळू शकता. एवढं करून तुम्ही करदेखील वाचवू शकता.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा
आपले पैसे बँकेच्या बचत खात्यात निष्कारण पडून राहण्यापेक्षा ते मुदत ठेवींमध्ये गुंतविण्याकडे बव्हंशी लोकांचा कल असतो. गाठी चांगले पैसे असल्याचे नि त्यावर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळविण्याचे सुख त्यात मिळत असते. पण काही लोकांना ही गुंतवणूक प्रदीर्घ काळासाठी नको असते. कारण आता त्यावर आयकर आकारला जातो. आपणही त्यातलेच एक असाल आणि अशी गुंतवणूक नको असेल, अन् करमाफी सुद्धा हवी असेल तर गिफ्ट म्हणून मिळालेली रक्कम स्टॉक मार्केटमध्ये व इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवा. अन् एक वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी ठेवून त्याला हात लावू नका. बारा महिन्यांपेक्षा अधिक मुदतीसाठी ठेवून त्याला हात लावू नका. 12 महिन्यांपेक्षा अधिक मुदतीसाठी गुंतविलेल्या इक्विटीवर मिळकतीचा कर आकारला जात नाही.
आपण बायको, अजाण मुलं किंवा अन्य नातेवाइकांच्या गुंतवणुकीसाठी पैसे देतो, ते वर उल्लेखिल्याप्रमाणे ते पैसे पुन्हा गुंतवतात. तेव्हा ते तुमच्या नातेवाइकाचं उत्पन्न धरलं जातं. पहिल्या वर्षासाठी त्यावर कर आकारणी होत नाही. त्याचबरोबर त्याच्या कराची जबाबदारी तुमच्यावर येत नाही. तुमची पत्नी कमी कर आकारणीच्या टप्प्यावर असेल आणि ती कमावती असेल तर ही युक्ती तुम्ही तिच्या संबंधात वापरू शकता.

करमाफी लाभ
मुलांच्या संदर्भात थोडा वेगळा प्रकार असतो. तुमची अजाण मुले 18 वर्षांची होऊन सजाण झाली तर ही जोडणी त्यांना करता येणार नाही. कर भरणा करण्याच्या नियमात ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणली जाईल. मात्र तुम्ही त्यांच्याकडे पैसे देऊ शकता अन् अडीच लाख रुपयांची करमाफी मिळवू शकता. सर्वसामान्य करदाता करमाफीचे जे लाभ मिळवतो, ते तुम्हीही मिळवू शकता. इतकंच नव्हे तर तुमचा मुलगा किंवा मुलगी 17 वर्षांचा असेल आणि 31 मार्च पूर्वी 18 वर्षांचा झाला तरी तुम्ही त्याच्या नावे गुंतवणूक करून पूर्ण वर्षाचा करमाफी लाभ मिळवू शकता.
तुम्ही तुमच्या पालकांच्या नावेदेखील गुंतवणूक करू शकता. मात्र वरीलप्रमाणे जोडणीचे नियम इथे लागू होणार नाहीत. शिवाय तुम्ही आई-वडिलांना जे पैसे द्याल त्यावर गिफ्ट टॅक्स लागू होत नाही. तेव्हा अडीच लाख रुपयांच्या बेसिक टॅक्स एक्झम्प्शनचा फायदा घ्या. ते जर साठीपेक्षा जास्त वयोगटातील असतील तर हा करमाफीचा आकडा जास्त होईल व तुम्हाला त्याप्रमाणे फायदा उठविता येईल. करमाफीची मर्यादा जर ते ओलांडतील तर करमुक्त गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत, त्यामध्ये गुंतवणूक करायला सांगून त्यांची मदत करा.

घरभाडे भत्त्याचे लाभ
तुम्ही आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत असाल व घर त्यांच्या नावावर असेल तर तुम्हाला बरीच करमाफी उपभोगता येईल. तुम्ही त्यांना भाडे देतोय्, असे दाखवून घरभाडे भत्त्याचे लाभ मिळवू शकता. या घरभाड्यावर तुमचे आई-वडील वार्षिक 30 टक्के करमाफीची मागणी करू शकतात. घराची देखभाल व दुरुस्ती इत्यादींसाठी होणार्‍या खर्चावर ही वजावट मिळते. त्यांनी दाखविलेल्या खर्चा व्यतिरिक्त हा वजावटीचा लाभ त्यांना मिळतो. आता हेच घर, जर आई आणि वडील असे दोघांच्याही नावावर असेल, तर तुम्हाला करमाफीचा अधिक फायदा मिळेल. ते घरभाड्याचे उत्पन्न वेगळे दाखवू शकतात, अन् ते करपात्र असल्याची बतावणी करू शकतात. सिनियर सिटीझन्स सेव्हिंग्ज् स्कीम, पाच वर्षांच्या बँक मुदत ठेवी किंवा टॅक्स सेव्हींग इक्विटी म्युच्युअल फंडस् अशा काही करमाफी देणार्‍या योजनांमध्ये ही मिळकत पुन्हा गुंतवून ते करमाफी मिळवू शकतात. तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा काढून कलम 80 डीच्या आधारे करमाफी मिळवू शकता.


सहज परतावा देणारी गुंतवणूक (Benefits Of Zero Risk Investment)