थंडगार आइस्क्रीमची अंदर की बात (Taste The Thund...

थंडगार आइस्क्रीमची अंदर की बात (Taste The Thunder At Home : Tips For Homemade Ice Cream)

विविध रंगांच्या, विविध चवीच्या आइस्क्रीम पाहिल्या की, बच्चे कंपनीच काय आपल्याही तोंडाला पाणी सुटतं. त्यात उन्हाळ्याचं निमित्त. तेव्हा रोज बाजारातून विकत आणून खाण्यापेक्षा घरीच बनवूया विकतच्या आइस्क्रीमसारखं यम्मी आइस्क्रीम…

उन्हाळा सुरू झाला की जिवाला थंडाईची आवश्यकता असते. अशावेळी थंड पेय, सरबत, उसाचा रस, घरी तयार केलेलं पन्हं, कोकम सरबत यासह आइस्क्रीम खाण्याकडे आपला कल असतो. बाजारात कप आइस्क्रीम, कोन आइस्क्रीम, कुल्फी यासह आइस्क्रीमचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एरव्ही जेवणानंतर काही तरी गोड खाण्यासाठी आइस्क्रीम खाल्लं जातं. मात्र, उन्हाळा सुरू झाला की, फक्त डेझर्ट म्हणूनच याकडे पाहिलं जात नाही तर, तापलेल्या वातावरणात शरीराला थंडावा मिळावा म्हणून सर्रासपणे आइस्क्रीम खाल्लं जातं आणि फक्त बच्चेकंपनीच नाही तर थोरामोठ्यांनाही आइस्क्रीम खायला आवडतं.
याबाबत प्रसिद्ध शेफ निलेश लिमये सांगतात की, “आइस्क्रीम हा फक्त बच्चे कंपनीचाच विक पॉईन्ट नाहीए, तर सर्वांनाच त्याचा मोह असतो. एखाद्या आइस्क्रीमच्या दुकानाजवळून आपण सहज जरी जात असलो तरी त्या दुकानातील काचेच्या पेटार्‍यातल्या विविध रंगांच्या, विविध चवीच्या आइस्क्रीम पाहिल्या की, नकळतपणे आपल्याही तोंडाला पाणी सुटतं.”
खरं तर पूर्वी पाश्चिमात्य देशात डेझर्ट म्हणून आइस्क्रीम खाण्याला पसंती मिळू लागली आणि हळूहळू त्याची मागणी जगभर वाढली. मात्र आजही अमेरिकन नागरिक सर्वाधिक आइस्क्रीम खातात, असं म्हटलं जातं. तर सर्वात बेस्ट आइस्क्रीम म्हणून इटालियन आइस्क्रीमकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडच्या आइस्क्रीममध्ये अजिबात भेसळ नसते. ते दुधात अजिबात पाणी टाकत नाही, तसंच ते फ्रेश क्रीम वापरतात. त्यामुळे त्या आइस्क्रीमची चव जगातील कुठल्याही आइस्क्रीमपेक्षा नक्कीच भारी असते.

घरचं आइस्क्रीम


भारतात बडोद्याला उत्कृष्ट आइस्क्रीम मिळतं, सिमलाला तर बर्फ पडायला लागला की, लोक मुद्दाम आइस्क्रीम खायला घराबाहेर पडतात. आपल्याकडे उन्हाळा आला की बच्चेकंपनी सर्रासपणे आइस्क्रीमची मागणी करतात, अशावेळी बाजारातल्या महागड्या आइस्क्रीम खाण्यापेक्षा अनेक गृहिणी घरीच आइस्क्रीम बनवण्याला प्राधान्य देतात. दूध, क्रीम, साखर, इसेन्स याचं मिश्रण तयार करून एक लाजवाब आइस्क्रीम घरच्या घरी आपण तयार करू शकतो. मात्र अनेक गृहिणींची तक्रार असते की, बाजारात जे आइस्क्रीम मिळतं तसं आइस्क्रीम घरी होत नाही.
याबाबत शेफ निलेश लिमये सांगतात की, “बाजारात मिळणार्‍या आइस्क्रीममध्ये ‘प्रीझर्वेेटीव्ह आणि स्टॅबिलायझर’ या पावडर वापरल्या जातात तर घरी आपण फक्त दूध किंवा मिल्क पावडर, साखर, क्रीम, व्हेजेटेरियन जेलटिन, इसेन्स यांचा वापर करतो. त्यामुळे घरच्या आइस्क्रीमला बाजारात मिळणार्‍या आइस्क्रीमची चव येत नाही. तसंच आपण जे घरी आइस्क्रीम बनवतो. त्यात रोजच्या वापरातली साखर टाकतो. मात्र, बाजारात मिळणार्‍या आइस्क्रीममध्ये वेगळी साखर वापरली जाते. त्याला ‘आयसोमॉल्ट शुगर’ म्हणतात. ही साखर महाग असते. या साखरेच्या वापरामुळे देखील घरच्या आणि बाजारातल्या आइस्क्रीमच्या चवीमध्ये फरक पडतो.”
आइस्क्रीमचे अनेक प्रकार आहेत. व्हॅनिला, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बनाना आइस्क्रीम, सॅन्डविच आइस्क्रीम, कस्टर्ड, केसर, मलाई केसर आइस्क्रीम असे विविध फ्लेवर आपल्याला मिळतात. काही आइस्क्रीममध्ये अंड्याचादेखील वापर करण्यात येतो. अंड्याचा पिवळा भाग काढून टाकून सफेद भागाचा आइस्क्रीममध्ये वापर करण्यात येतो. अंड्याचा वास घालवण्यासाठी त्यात व्हॅनिला इसेन्स, गुलाबाचा इसेन्स, स्ट्रॉबेरी इसेन्स टाकावं लागतं.

झटपट आइस्क्रीम


आइस्क्रीम तयार करताना त्यात अंड घातलं तर त्याचे अनेक फायदे होतात. एकतर अंड घातल्याने दूध आटवावं लागत नाही, व्हेजेटेरियन जेलटिन टाकावं लागत नाही. फक्त अंड्यात साखर घालून फेटायचं. त्यात थोडंसं दूध घालून हे मिश्रण शिजवायचं. त्यात परत अंड्याचा पांढरा भाग आणि क्रीम घालायचं आणि मग हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं. काही तासात टेस्टी, यम्मी आइस्क्रीम रेडी टू इट…
उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात आंबे मिळतात. त्यामुळे मँगो पल्प वापरूनदेखील आइस्क्रीम तयार करता येते. आज जमाना इन्स्टंटचा आहे. सगळं कसं लोकांना झटपट हवं असतं. त्यात आइस्क्रीमदेखील झटपट हवं असतं. असे झटपट आइस्क्रीम बनवण्यासाठी लिक्वीड नायट्रोजनचा वापर करण्यात येतो. मात्र, हे केमिकल खूपच ज्वलनशील असतं. त्यामुळे
खूपच काळजीपूर्वक ते वापरावं लागतं. घरी आइस्क्रीम तयार करताना अशा केमिकलचा वापर करणं टाळावं, असा सल्ला निलेश लिमये देतात.
एखादा गायक किंवा गायिका रोज रियाज करून आपल्या आवाजात वैविध्य आणत असतात. त्याप्रमाणे आम्ही शेफदेखील रोज किचनमध्ये वेगवेगळे प्रयोग करून नावीन्यपूर्ण डिशेस तयार करत असतो. त्याप्रमाणे 2001 मध्ये मी ‘रोज पेटल आइस्क्रीम’ तयार केली होती. या आइस्क्रीमची खासियत म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद, काजू, पिस्ते टाकून ही आइस्क्रीम बनवली होती. त्या काळात व्हॅनिला, स्ट्रॉबेरी आणि नॅचरल आइस्क्रीम सर्रासपणे मिळायच्या. त्यामुळे आपण काहीतरी नावीन्य आइस्क्रीममध्ये आणावं, या उद्देशाने रोज पेटल आइस्क्रीम मी तयार केली. दुधात लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर घालायची. हे मिश्रण आटवायचं. दुधात या पाकळ्या उकळल्यामुळे त्याला रंग आणि स्वाद येतो. मग त्यात गुलकंद घालायचं. त्यानंतर त्यात व्हेजेटेरियन जेलटिन व क्रीम घालून मिक्स करायचं. पाच-सहा तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावं. ‘रोज पेटल आइस्क्रीम’ तयार.
सध्या निलेश लिमये यांनी ‘टोमॅटो आइस्क्रीम’ हे नवीन आइस्क्रीम तयार केलं आहे. शेफ निलेश लिमये यांनी देश-विदेशातील अनेक नामवंत रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलं आहे. तसंच अनेक रेसिपी शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम काम केलं आहे. तेव्हा त्यांची ही नवीन टोमॅटो आइस्क्रीम या उन्हाळ्यात करून बघायला हरकत नाही.

टोमॅटो आइस्क्रीम


साहित्य ः 250 ग्रॅम टोमॅटो प्युरी आटवलेली, 250 ग्रॅम क्रीम, 100 मिलिलीटर फुल क्रीम दूध आटवलेले, 200 ग्रॅम साखर (चवीनुसार थोडं आंबट गोड हवं असल्यास साखर कमी करू शकता), 40 ग्रॅम व्हेज जेलटीन
कृती: प्रथम एका वाटीत जेलटीन थोड्या गरम पाण्यात भिजवा. नंतर एका बाऊलमध्ये क्रीम चांगली फेटून घ्या. त्यात दूध मिक्स करा. टोमॅटो प्युरी मिक्स करा आणि जेलटीन घालून पुन्हा एकदा दाट फेटून घ्या. फ्रीझरमध्ये सेट करा. दोन तासांनी पुन्हा एकदा सगळं मिश्रण फेटून घ्या. पुन्हा फ्रीझरमध्ये चार-पाच तास सेट करा. स्लाइस किंवा स्कूप करून सर्व्ह करा. सजावटीसाठी टोमॅटो बारीक चिरा आणि साखरेत परतून घ्या. गार करून वरून घाला. अंडी चालत असतील तर जेलटीनच्या ऐवजी दोन अंडी घ्या. त्याचा पिवळा बलक आणि साखर फेटून घ्या. त्यात दूध घालून डबल बॉयलर वर ढवळा. साधारण 8-10 मिनिटात मिश्रण घट्ट होईल,
हे आहे कस्टर्ड. हे कस्टर्ड लगेच थंड करा आणि फेटलेल्या क्रीम
आणि टोमॅटो प्युरीसोबत मिक्स करा. फ्रीझरमध्ये दोन तास सेट करा. पुन्हा मिश्रण फेटून घ्या आणि चार-पाच तास सेट करा.
टीप ः आइस्क्रीम तयार करताना जेव्हा आपण साखरेचा पाक तयार करतो. तेव्हा त्यात लिंबाचा एक चमचा रस टाकावा किंवा लिंबाची छोटी फोड टाकावी. लिंबामुळे पाकातला काळपटपणा निघून जातो किंवा कधी कधी पाक तयार करताना फेस येतो. तो लिंबामुळे निघून जातो. या टोमॅटो आइस्क्रीमबद्दल शेफ निलेश लिमये सांगतात की,
“टॉमेटोचा वापर करून आइस्क्रीम तयार करू शकतो का? असं एकदा मनात आलं. त्याप्रमाणे या नव्या आइस्क्रीमच्या तयारीला लागलो.”

  • स्मिता मांजरेकर