‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जेठ...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जेठालालने जागवल्या आपल्या संघर्षाच्या स्मृती (Tarak Mehta ka Ooltah Chashmah: Dilip Joshi Remembers His Struggle Days, Reveals How He Got Role of Jethalal)

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेली कित्येक वर्षं दर्शकांचं मनोरंजन करत आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकेत ही गणली जाते. दर आठवड्याच्या टीआरपीमध्ये देखील पहिल्या पाच मालिकांमध्ये ही मालिका सामील असते. दर्शकांचं भरपूर मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक पात्रास दर्शकांनी पसंती दर्शवलेली आहे, परंतु यातील जेठालाल चंपकलाल गडा या पात्राची बातच काही और आहे. या मालिकेत जेठालालची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी याआधीही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.  

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील जेठालाल चंपकलाल गडा म्हणजेच दिलीप जोशी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणी जागवल्या आहेत, तसेच त्यांना जेठालाल ही भूमिका कशी मिळाली तेही सांगितले आहे. खरं तर हा जुना व्हिडिओ आहे, परंतु सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी खुलासा केला आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका मिळण्यापूर्वी त्यांच्याजवळ एक वर्षापर्यंत काहीच काम नव्हतं.

दिलीप जोशी पुढे सांगतात की, ते त्यावेळेस एका मालिकेसाठी काम करत होते, परंतु ती प्रदर्शित झाली नाही आणि त्यानंतर ते एक वर्ष रिकामे बसून होते. मग एक दिवस ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चे निर्माते असित मोदी यांनी त्यांना आपण एक शो बनवत आहोत असं सांगून, त्यातील जेठालाल या व्यक्तिरेखेची ऑफर दिली. त्यापूर्वी त्यांनी दिलीप जोशींना चंपकलाल आणि जेठालाल यापैकी एक व्यक्तिरेखा निवडण्याचा पर्याय दिला होता.  

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

व्यक्तिरेखा निवडण्याचा पर्याय समोर ठेवल्यानंतर दिलीप जोशी म्हणाले की, ते चंपकलाल अजिबातच वाटले नसते, त्यामुळे त्यांनी जेठालाल व्यक्तिरेखा स्वीकारली. दिलिप जोशी पुढे म्हणाले की, हा शो सुरू झाला त्यावेळेस टेलिव्हिजनवर सासू-सूनांच्या मालिका सुरू होत्या. अशातच ही मालिका करताना मनोरंजनाबरोबरच हसत-खेळत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा आमचा उद्देश होता. अशाप्रकारे हा शो हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरू लागला आणि आज हा सर्वाधिक पसंतीचा शो बनला आहे. आज दिलीप जोशींच्या फॅन फॉलोविंगमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुलं जेठालालचे फॅन्स आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, राजस्थानमधून फक्त जेठालालला भेटण्यासाठी १३-१४ वर्षांचे दोन मुलं घरून पळून आली होती.