नवतारुण्य देणारं सोनाबाथ (Take Sauna Bath, Look...

नवतारुण्य देणारं सोनाबाथ (Take Sauna Bath, Look Young)

निरोगी असणं म्हणजे कोणताही रोग नसणं. परंतु, शरीरातील प्रत्येक अवयवानं आपल्या संपूर्ण क्षमतेनं काम करणं आणि मन प्रसन्न असणं या अवस्थेला संपूर्ण स्वास्थ्य म्हणतात. असं संपूर्ण स्वास्थ्य व नवतारुण्य मिळवण्यासाठी सोनाबाथ आवश्यक आहे.

सोनाबाथ अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे माणसं निरोगी राहतात. तसेच सोनाबाथमुळे व्यक्तींमध्ये र्‍हासजन्य रोगांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं दिसून आलेलं आहे.


अतिरिक्त घामामुळे नवतारुण्याचा लाभ
सोनाबाथमुळे कृत्रिम पद्धतीनं शरीरात उष्णता निर्माण केली जाते. त्यामुळे शरीराची चयापचय गती वाढते आणि जास्त घाम येतो. ताप येणं ही चांगली गोष्ट आहे, असं म्हटल्यास आपल्याला आश्‍चर्य वाटेल. परंतु जंतुसंसर्गाशी लढताना किंवा विषारी घटक बाहेर काढताना ज्वर ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. ताप येणं हे लक्षण आहे. तो रोग नाही. शरीर स्वतःला दुरुस्त करीत असल्याची ती खूण आहे. शरीराचं तापमान वाढल्यामुळे शरीरातील विषारी घटक जळून जातात आणि घामावाटे ते बाहेर काढले जातात. टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे काम करणारा शरीरातला सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. शरीरातील 30 टक्के टाकाऊ पदार्थ घामावाटे म्हणजे त्वचेवाटे बाहेर टाकले जातात. घाम आणि मूत्रही रासायनिक दृष्ट्या सारखीच आहेत, असे शास्त्रज्ञ म्हणतात. शरीराचं तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करणे म्हणजे नैसर्गिक संरक्षक यंत्रणेला काम करण्यापासून थांबवण्यासारखं आहे. त्यामुळे रोग बरा होण्याऐवजी वाढतो. याला अपवाद लहान मुलांचा आहे. लहान मुलांच्या मेंदूमध्ये तापमान-नियंत्रक केंद्र पूर्णपणे विकसित झालेलं नसतं. म्हणून ताप वाढला तर मुलांना झटके येतात. त्यासाठी त्यांचा ताप उतरणं आवश्यक असतं.

सोनाबाथचे शारीरिक फायदे
– शरीरातील विषारी पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात.
– चयापचयाची गती वाढल्यामुळे जिवाणूंची आणि विषाणूंची वाढ खुंटते.
– वरील दोन्ही गोष्टींमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. रोगांपासून लवकर मुक्तता व्हायला मदत होते.
– सोनाबाथमुळे ग्रंथींच्या आणि अवयवांच्या कामाला वेग येतो.
थोडक्यात म्हणजे सोनाबाथमुळे सर्दीसारखी किरकोळ दुखणी ते त्वचारोग, संधिवात, निद्रानाश आणि कॅन्सर यांसारखे आजारही बरे होतात.

जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी
– सोनाबाथची सवय नसणार्‍यांनी सुरुवातीला मध्यम तापमानानं सुरुवात करा आणि हळूहळू ती वाढवा.
– सोनामध्ये सर्वांत खालच्या पातळीवर म्हणजे जिथे सर्वांत कमी तापमान असतं तिथे बसायचं. त्याची शरीराला सवय झाल्यावर मग बाकावर बसा. फक्त दहा मिनिटं बसल्यानंही सोनाचे सगळे फायदे मिळतात.
– सोनाबाथनंतर गरम पाण्यानं स्नान करा. साबणानं अंग स्वच्छ करा. बाहेरच्या खोलीत झोपून थोडी विश्रांती घ्या. त्यामुळे घाम बंद होतो आणि शरीराचं तापमान खाली उतरतं बरेच जण सोना नंतर सरळ थंड पाण्यानं स्नान करतात. तसं करू नये. कारण त्यामुळे त्वचेची घामाची छिद्रं एकदम बंद होतात. आणि सोनाबाथचा उद्देश सफल होत नाही. त्वचेची छिद्रं मोठी होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडायचे असतात, ते काम थंड पाण्याच्या स्नानामुळे थांबतं. गरम पाण्यानं स्नान केलं तर छिद्रं हळूहळू बंद होतात.
बहुतेक हेल्थ क्लबमध्ये सोनाबाथची सोय असते. तशी जवळपास सोय नसेल तर भरपूर घाम येईल इतका व्यायाम करा.