पायांना भेगा पडल्या आहेत? (Take Care of Foot Cr...

पायांना भेगा पडल्या आहेत? (Take Care of Foot Cracks?)

या दिवसांत पायाची त्वचा रूक्ष होऊन भेगा पडतात. कधी कधी या भेगांमधून रक्तही येतं. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय.
आपण चेहरा, केस, हातांची जेवढी काळजी घेतो, तितकी बरेचदा पायांची घेत नाही. खरं तर पायांचीही तेवढीच, किंबहुना जास्त काळजी घ्यायला हवी. त्यातही थंडीच्या दिवसात पायांची काळजी घ्यायलाच हवी. कारण थंडीच्या दिवसात पायाची त्वचा रूक्ष होऊन भेगा पडतात. कधी कधी या भेगांमधून रक्तही येतं. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय-
– पायांच्या भेगा भरून काढण्याकरिता सर्वोत्तम उपाय म्हणजे पेट्रोलियम जेली. रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन, कोरडे करा. नंतर पेट्रोलियम जेली लावा. त्यानंतर मोजे घालून झोपा.
– नियमितपणे हिल बामचा वापर करा. हा बाम लावल्यानंतर मृत त्वचा निघून जाऊन, टाचा मुलायम होतात. ही क्रीम लावल्यानंतर पायात मोजे घाला. असं दिवसातून दोन-तीन वेळा करा.

– खोबरेल तेल कोमट करून झोपण्यापूर्वी भेगांना लावा आणि टूथब्रशने हळुवार टाचा घासा. नंतर टाचा सुती कापडाने स्वच्छ करा.
– दिवसातून दोन वेळा पायाच्या भेगांना मोहरीचं तेल लावून मालीश करा.
– टाचांवर तूप किंवा कोरफडीचा गर चोळा.
– एरंडेल तेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस सम प्रमाणात एकत्र करून दिवसातून दोन वेळा टाचांवर लावा.
– रात्री झोपताना दुधावरची मलई भेगांवर लावा.
– साखर आणि मलई एकत्रित साखर विरघळेपर्यंत पायांच्या टाचांवर चोळा.
– टाचांवर कांद्याचा रस लावा.
– कोमट पाण्यात थोडा वेळ पाय बुडवून ठेवा. नंतर पायावरील मृत त्वचा काढून ते स्वच्छ करा. त्यानंतर क्रीम किंवा पेट्रोलियम जेलने हलका मसाज करा.

– एखाद्या स्क्रबरने पाय घासून स्वच्छ करा. नंतर टॉवेलने पुसून त्यावर एखादं क्रीम लावा.
– रात्री झोपण्यापूर्वी क्रीम लावून जाड मोजे घालून झोपा.
– जीवनसत्त्वांच्या अभावीही पायांना भेगा पडू शकतात. त्यामुळे आहारात ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह, झिंक यांसारख्या पोषक घटकांचा जरूर समावेश करा.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बाहेरून घरी परतल्यावर पाय स्वच्छ धुवा. त्यासाठी कोमट पाण्यात थोडा साबण मिसळून पाय बुडवून ठेवा. यामुळे भेगांमधील घाण निघून जाण्यास मदत होते. घाणीमुळे पायावर जंतू राहतात आणि पायाची त्वचा कोरडी पडते. पाय कोरडे पडणार नाहीत, यासाठी नियमितपणे क्रीम लावा.