‘तारक मेहता…’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर द...

‘तारक मेहता…’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार असल्याच्या चर्चांवर लेखकाचा खुलासा… (Taarak Mehta Will Not Come On Ott Platform As Web Series Writer Abbas Hirapurwala)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेले १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, पोपटलाल, तारक मेहता ही सर्वच पात्रं कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून मालिकेची सीरिज ओटीटीवर सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर मालिकेचे लेखक अब्बास हिरापुरवाला यांनी माहिती दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे लेखक अब्बास यांना ‘स्क्रीन राइटर असोसिएशन अॅवॉर्ड’ या कार्यक्रमात मालिकेच्या सीरिज विषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘मला नाही वाटत की आता मालिकेला वेब सीरिजच्या रुपात ओटीटीवर प्रसारित करता येईल. ही मालिका मोठी आहे. मालिका आणि वेब सीरिज पाहणारा प्रेक्षक वर्ग देखील वेगळा आहे. त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आता सीरिजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे वाटत नाही.’

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या तारक मेहता लिखित चित्रलेखा मॅगझिनमधल्या कॉलमवर आधारित मालिका आहे. २८ जुलै २००८ पासून सोनी सबवर ही मालिका प्रसारित होण्यास सुरुवात झाली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने सगळ्यात जास्त दिवस चालणारी मालिका म्हणून गिनीज बुक ऑफ बर्डस रेकॉर्डमध्येही आपलं नाव कोरलं आहे.

मिनी इंडिया म्हणवल्या जाणाऱ्या या मालिकेला सुरुवातीला प्रसारित करण्यासाठी काही चॅनल्सनी नाकारलं होतं. आश्चर्य वाटलं असेल ना ? पण, हे खरंय. तारक मेहताची स्क्रिप्ट घेऊन जेव्हा निर्माते स्टार प्लस आणि झी टीव्ही या दोन्ही चॅनलकडे गेले होते, पण त्यांनी ही मालिका प्रसारित करण्याचं नाकारलं.

या मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाल्यावर या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितलं की, “या मालिकेला प्रसारित होण्यासाठी ८ वर्ष लागली. मी या मालिकेचे हक्क २००१ मध्येच विकत घेतले होते. सुरुवातीला मी स्टार प्लस आणि झी टीव्ही यांच्याकडे गेलो. तेव्हा नुकताच डेली सोपचा ट्रेंड सुरु झाला होता आणि सास बहू मालिका बघितल्या जायच्या. तेव्हा मला लोकांनी असं सांगितलं की, कॉमेडीला काही स्कोप नाही आहे. कॉमेडी कुणीच बघणार नाही, पण मला विश्वास होता की एक ना एक दिवस ही मालिका रोज बघितली जाईल आणि तसंच घडलं.”

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे जवळपास ३ हजार ३८२ भाग प्रसारित झाले आहेत. मागे या मालिकेचा ॲनिमेट्ड शो देखील प्रसारीत केला गेला. ही मालिका छोट्या पडद्यावरील बराच काळ सुरु असणारी मालिका ठरली आहे. त्यामुळे मालिकेचे सिरिजच्या रुपाने ओटीटीवर येणे सध्या तरी शक्य वाटत नाही. परंतु, एके काळी चॅनेलने मालिकेला प्रसारित करण्यास नाकारूनही आज या मालिकेचा सिरिजसाठी विचार केला जाणं ही गोष्टही कौतुकास्पद आहे.