‘तारक मेहता….’ फेम दयाबेन उर्फ दिशा वकानी...

‘तारक मेहता….’ फेम दयाबेन उर्फ दिशा वकानीला झाला घशाचा कॅन्सर? जेठालालने केला मोठा खुलासा (‘Taarak Mehta Ka Ooltah Chashma’ Fame Dayaben Disha Vakani Is Suffering From Throat Cancer, Jethalal Gives Health Update Of The Actress)

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली दयाबेन दिशा वकानीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच, दयाबेन म्हणजेच दिशा वकानीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच मालिकेतील नट्टू काकांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाले. अशातच आपल्या जबरदस्त विनोदाने हसवून वर्षानुवर्षे मनोरंजन करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानीलाही घशाचा कर्करोग झाल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिला कर्करोग होण्यामागे ‘तारक मेहता…’मालिकेलाच जबाबदार धरले आहे. या मालिकेत दिशा वेगवेगळ्या आवाजात बोलायची. त्यामुळेच तिच्या घशाला त्रास होऊन तिला कर्करोग झाल्याचे म्हटले जात आहे.

ही बातमी व्हायरल झाल्यापासून दयाबेनचे चाहते चिंतेत आहेत. आता ‘जेठालाल’ दिलीप जोशी यांनी याबाबत मोठी माहिती दिली असून ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप जोशी म्हणाले, दिशा एकदम ठीक आहे. मलाही सकाळपासून फोन येत आहेत आणि सर्व दिशाची तब्येत विचारत आहेत. अनेकदा अशा खोट्या बातम्या पसरत असतात. मी एवढेच म्हणेन की या सर्व अफवा आहेत. कृपया याकडे लक्ष देऊ नका.

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनीही या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. असित मोदी म्हणाले, “लोक कोणतीही बातमी लाईक्स आणि क्लिकसाठी सोशल मीडियावर टाकतात. याशिवाय घशाचा कॅन्सर हा तंबाखू खाल्ल्याने होतो, वेगवेगळे आवाज काढल्याने नाही. अशा अफवा पसरवल्यास सर्व मिमिक्री करणारे लोक घाबरतील.

2017 पासून दिशा वकानीने मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. पाच वर्षांपूर्वी दिशा प्रसूती रजेवर गेली होती. तेव्हा प्रसूती रजेनंतर ती  मालिकेत परतणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आई झाल्यानंतरही ती मालिकेत परतली नाही. चाहते अजूनही तिची मालिकेत आठवण काढत आहेत.  अशातच दिशा वकानी घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी समोर आल्याने  चाहते अस्वस्थ झाले आहेत. मात्र, दिशा वकानीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.