प्रसिद्धी माध्यमांवर तापसी पन्नूची आगपाखड : वार...

प्रसिद्धी माध्यमांवर तापसी पन्नूची आगपाखड : वार्ताहाराने विचारलेल्या प्रश्नाने तिच्या रागाचा पारा चढला (Taapsee Pannu’s Anger Broke Out On The Media, The Actress Got Angry With The Reporter’s Question)

आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा पत्रकारांच्या प्रश्नांनी नाराज झाली असून एका वार्ताहारावर तिने आपला राग काढला. तिच्या चित्रपटाविषयी विचारलेला प्रश्न तापसीला पटला नाही. म्हणून तिच्या रागाचा पारा चढला.

अलिकडेच तापसीने ओटीटी प्ले ॲवॉर्डस्‌ २०२२च्या सोहळ्यात भाग घेतला होता. तिथे रेड कार्पेटवर पत्रकारांशी बातचीत करतेवेळी ‘दोबारा’ या तिच्या चित्रपटावरून ज्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या, त्याबाबत विचारणा करताच ती नाराज झाली. प्रश्न विचारण्यापूर्वी गृहपाठ करून येत चला, असं ती प्रश्नकर्त्या वार्ताहारास बोलली.

‘दोबारा’ विरुद्ध नकारात्मक मोहीम चालविण्यात आली होती, त्यावर तुझं मत काय, असा प्रश्न विचारल्यावर तापसीने प्रतिप्रश्न केला, ‘असा कोणता चित्रपट आहे, ज्याच्या विरुद्ध मोहीम चालवली नव्हती.’ त्यावर प्रश्नकर्ता काही बोलू लागताच तापसी म्हणाली, ‘आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नंतर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.’ त्यावर वार्ताहार म्हणाला की, ‘समीक्षकांनी देखील तुझ्या चित्रपटावर टीका केली होतीच की.’

या विधानावर तापसी अतिशय चिडली. ‘असे प्रश्न विचारण्याआधी गृहपाठ करून येत चला. पुढच्या वेळी अभ्यास करून या मग मला प्रश्न विचारा. अन्‌ आरडाओरडा करू नका. नंतर तुम्हीच म्हणाल की, अभिनेत्यांना बोलायची पद्धत नाही.’

अशी आगपाखड तापसीने केली. त्यावर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण ती बरोबर बोलली असल्याचं म्हणत आहेत. तर काहींच्या मते, ती चुकीचं वागली. आणखी काही वापरकर्ते म्हणत आहेत की, तापसी नेहमी घुश्शातच का असते, ते कळत नाही. ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल तापसीला ओटीटी प्ले ॲवॉर्डस्‌मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आहे. या आधी प्रदर्शित झालेला ‘दोबारा’ हा चित्रपट तिकीट बारीवर अपयशी ठरला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम