स्वरा भास्करला दिली जीवे मारण्याची धमकी, अभिनेत...

स्वरा भास्करला दिली जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला पत्राचा फोटो (Swara Bhasker gets death threat, shares the letter on social media, Letter says-janazah uthega)

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतरही मनोरंजन विश्वातील कलाकारांना मिळणाऱ्या धमक्या अजूनही थांबलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानला लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून धमकीचे पत्र मिळाले. त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला देखील धमकी दिली गेली आहे.

स्वरा तिच्या अतिस्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. तिने ते धमकीचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत त्यासोबत कॅप्शनमध्ये एक नोट लिहिली आहे. त्यात तिने तिला आलेल्या धमकीच्या पत्रावर तिचे मत मांडले आहे. स्वराने लिहिले की, एकीकडे देशातील तरुण नोकरीसाठी भटकत आहेत. त्यातील काहीजण महागाई, बेरोजगारी, उपासमारी या सर्व गोष्टी सहन करतील पण ऐतिहासिक सत्य आणि तथ्य या गोष्टी त्यांना सहन होत नाहीत. इतका राग !

स्वराला ते धमकीचे पत्र स्पीड पोस्टने पाठवले होते. या पत्रात तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पत्र मिळाल्यानंतर स्वराने त्याबाबत पोलिसांत तक्रार केली असून पोलीस तपास घेत आहे. पत्र वाचल्यानंतर, स्वराने वीर सावरकरांचा अपमान केल्यामुळे तिला हे धमकीचे पत्र आल्याचे सहज समजते. त्या पत्रात लिहिले आहे की, ‘भाषेचा नीट जपून वापर कर, वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही…. या देशाचा तरुण. आरामात तुझा चित्रपट बनव नाहीतर जिवाला मुकशील.’

स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ट्विटरवर अनेकदा ती राजकिय आणि सामाजिक मुद्द्यांवर स्वत:चे मत मांडत असते. यावरुन तिला बरेचदा ट्रोल करतात. २०१७ मध्ये स्वराने वीर सावरकरांविरोधात एक ट्विट केले होते. त्यात तिने सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली. जेलमधून बाहेर काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने वीर नाहीत असे लिहिले. स्वराला आलेली धमकी ही कदाचित या ट्विटमुळेच आली असावी.