कंगना रणौतचे ट्विटर बंद झाले : पण यापूर्वी तिने...

कंगना रणौतचे ट्विटर बंद झाले : पण यापूर्वी तिने खूप लोकांशी पंगे घेतले आहेत. पाहूयात तिचे वादग्रस्त ट्विस्टस्‌ (Suspended From Twitter, Kangana Ranaut Has Created Controversies On Twitter Earlier Too, Know About Her Top Controversial Tweets)

कोणी काहीही म्हणो, परंतु जेव्हापासून पंगा क्विनचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे, लोकांनाही चुकल्याचुकल्यासारखं वाटत असणार. सामाजिक असो वा राजकीय प्रत्येक विषयावर कंगनाने नेहमीच उघडपणे आपले मत व्यक्त केलेले आहे. तिच्या काही ट्वीटमुळे चाहत्यांकडून तिचं कौतुक झालंय, तर काही ट्वीटमुळे तिला ट्रोलही व्हावं लागलं आहे. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनानं जे काही वादग्रस्त ट्वीट केलं होतं; त्यानंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं आहे.

तसं पाहिलं तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बहुतेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि ट्वीटवरून वादात राहिली आहे. ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन करण्याची तिची ही पहिली वेळ नाहीये. या आधीही कंगनाने काही असे ट्वीटस्‌ केले आहेत, पाहुया तिचे काही वादास्पद ट्विस्टस्‌

‘तांडव’ वेबसिरिजवर केलेले विवादित ट्वीट

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरिजवरून अनेक वाद सुरू असतानाच या वेबसिरीज संदर्भातही कंगनानं ट्विट केलं होतं. तिने आपल्या या ट्वीटमध्ये असं म्हटलेलं की, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यासाठी निर्मात्यांचा शिरच्छेद करण्याची वेळ आता आली आहे. तिच्या या ट्वीट विरोधात लगेचच कार्यवाही करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटलं

शेतकरी आंदोलनाच्या विरोधात कंगनाने ट्विटरवर चांगलंच तोंडसुख घेतलं आणि मग वादात सापडली. आंतरराष्ट्रीय गायक रिहानाने शेतकऱ्यांच्या आदोंलनाबाबत एक ट्वीट करंत असं  लिहिलं होतं की, याबाबत कोणीच काहीच कसं बोलत नाही आहे? तिच्या या ट्वीटला उत्तर देत कंगना असं म्हणाली होती, ”कोणी यांच्याबाबत काहीच बोलत नाहीयेत कारण हे शेतकरी नसून आतंकवादी आहेत. हे भारतास तोडू पाहत आहेत, म्हणजे चीन आपल्या देशावर कब्जा करू शकेल आणि त्यास चायनीज कॉलनी बनवू शकेल, जसे त्याने अमेरिकेस बनवले आहे. मुर्खांनो, तुम्ही गप्प बसा. आम्ही तुमच्यासारख्या मुर्खांप्रमाणे आपला देश विकत नाही आहोत.” कंगनाच्या या ट्वीटने देखील हंगामा केला होता.

दिलजीत दोसांजसोबत ट्विटर वॉर

शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीतमध्ये चांगलचं ट्विटर वॉर रंगलं होतं. कंगना रनौतनं शेतकरी चळवळीत आलेल्या एका शेतकरी आजीला ‘शाहीन बागची आजी’ असं संबोधलं होतं. एवढंच नाही तर अशा बायका १०० रुपयांसाठी कोठेही येऊ आणि जाऊ शकतात, असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या ट्वीटमुळे ती पुन्हा चर्चेत आली. गायक दिलजीत दोसांजने कंगनावर टीका करत तिला शेतकऱ्यांची माफी मागण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांमधील भांडण टोकाला गेलं, दोघांनीही आपल्या सीमा ओलांडल्या. कंगनाने तर दिलजीतला लोकल क्रांतिकारीही म्हटले.

तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांना दुय्यम दर्जाच्या अभिनेत्री असं संबोधलं

कंगना रणौतने अनेक अभिनेत्रींसोबतही पंगा घेतलेला आहे. कंगनाने एका मुलाखती दरम्यान नेपोटिझम, आऊटसायडर्स यावर चर्चा करत असताना बोलता बोलता अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांचाही उल्लेख केला. तो सहज केला असता तर ठीक आहे. पण तसं झालं नाही. तो करत असतानाच या दोन अभिनेत्री दुय्यम दर्जाच्या असून ‘गरजू आऊटसायडर्स’ असल्याची टिप्पणी तिने केली.

कंगना रणौतने तापसी पन्नू म्हटलं सस्ती आणि शी मॅन

बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रणौत यांच्यातील जुगलबंदी कोणापासून लपलेली नाही. अनेकदा या दोघी ट्विटर वर एकमेकांशी भिडलेल्या आहेत. कंगनाने अनेकदा तापसीला ‘सस्ती कॉपी’ असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर अलिकडेच कंगनाने सर्व मर्यादा ओलांडत तापसीला शी मॅन असंही म्हटलं आहे. तिच्या या पोस्टनंतर तापसीच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आपली नाराजी जाहिर केली होती. तसेच कंगनाच्या फॉलोवर्सनीही यावर आक्षेप घेतला होता.

आयुषमान खुराना म्हणाली चापलूस आउटसायडर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनानं सोशल मीडियावर लागोपाठ अनेक ट्वीट केल्या. सुशांतला इंडस्ट्रीमधील लोकांनीच मारलं आहे, असं तिचं म्हणणं होतं. दरम्यान अभिनेता आयुषमान खुरानाने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या बाजूने विधान केल्याने त्याला कंगनाच्या ट्वीटला सामोरं जावं लागलं. तिने आपल्या ट्वीटमध्ये आयुषमानला चापलूस आउटसायडर असे म्हटलं होतं. तसेच त्याच्यासारख्या व्यक्ती मुव्ही माफियांना मदत करतात, कारण त्या दोघांचे विचार एकमेकांशी मिळतात. त्यांना या इंडस्ट्रीमध्ये कोणीही धमकावत नाही, उलट सुशांत आणि कंगनासारख्या सत्य बोलणाऱ्यांना ते वेड्यात काढतात. तिचे हे बिनधास्त ट्वीट फारच चर्चेत होते.

शबाना आझमीसोबतही पंगा क्विनचा पंगा

पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती, त्यावेळेस कंगनाने ट्वीट करत तिलाही सोडलं नाही. तिने शबाना आझमी यांना देशद्रोही असं म्हटलं होतं. या लोकांमुळे शत्रूला हल्ले करायला बळ मिळतं, असंही ती म्हणाली. तिच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर शबाना आझमीने आपला पाक दौरा रद्द केला होता, असं सांगितलं जातं.