सुशांतच्या जयंतीनिमित्त बहिण श्वेताने शेअर केला...

सुशांतच्या जयंतीनिमित्त बहिण श्वेताने शेअर केला भावूक व्हिडिओ (Sushant Singh Rajput’s sister Shweta marks his birth anniversary with emotional video)

१४ जून २०२० मध्ये खूपच कमी वयामध्ये सुशांत सिंह राजपूतने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्याच्या मृत्यूने बॉलिवूड इंडस्ट्रीला तर धक्का बसलाच शिवाय त्याच्या चाहत्यांना देखील अनेक महिने शोक अनावर झाला होता. आजही त्याच्या कुटुंबियांइतकंच त्याचे चाहतेही त्याचे स्मरण करतात.

आज २१ जानेवारी रोजी सुशात सिंह राजपूतची जयंती आहे. आज जर सुशांत आपल्यात असता तर तो ३६ वर्षांचा झाला असता. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर सुशांतच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक होत आहेत.

दोन मिनिटं १८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सुशांतच्या ऑनस्क्रीन अवतारापासून ऑफ-स्क्रीन व्यक्तीमत्त्वापर्यंतच्या सर्व पैलूंना दर्शविले आहे. सुशांतचे जीवन, त्याच्या आवडी-निवडी, त्याचे छंद अशा सगळ्या आठवणींचा सुंदर कोलाज या व्हिडिओमध्ये आहे.

या व्हिडिओमध्ये सुशांतच्या ५० स्वप्नांची बकेट लिस्टही सामील आहे. सुशांतने मुलांसोबत, कुत्र्यासोबत घालवलेले क्षणही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये सुशांतच्या केदारनाथ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘जय हो शंकर…’ चं पार्श्वसंगीत ऐकायला मिळतं. हा व्हिडिओ पाहताना सुशांत किती उमदा कलाकार होता याची जाणीव होते तसेच खूप सारी स्वप्ने तो अर्धवट सोडून गेल्याचेही निदर्शनास येते.

श्वेता नेहमीच आपल्या दिवंगत भावाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पोस्ट शेअर करत असते. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच सुशांतच्या जयंतीच्या दिवशी ती त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना श्वेताने लिहिलंय – ” माय गॉड! किती सुंदर संकलन आहे… भावा तुला जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा! आम्ही तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. @sushantsinghrajput तुझा वारसा कायम राहील. # सुशांतदिवस.” श्वेता आणि एसएसआरच्या अनेक निष्ठावंत चाहत्यांनी हा दिवस ‘सुशांत दिवस’ म्हणून घोषित केला आहे.

मुंबईच्या बांद्रा परिसरातील आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये १४ जून २०२० रोजी सुशांत सिंहने आत्महत्या केली होती. त्याच्या अशाप्रकारे जाण्याचा धक्का आजही त्याचे निकटवर्तीय तसेच बॉलिवूडमधील कलाकार अन्‌ चाहतेही पचवू शकलेले नाहीत. आज जरी तो आपल्यात नसला तरी आठवणींमध्ये तो सदैव जिवंत राहणार आहे.