लहान मुलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान व वेळेवर ...

लहान मुलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचार झाल्यास वाचण्याचा दर ८० टक्क्यांनी वाढू शकतो (Survival Rate Of Cancer In Children May Increase By 80% By Early Diagnosis And Treatment)

आपल्या देशामध्ये, कर्करोग हा प्रौढांमध्ये होणारा एक रोग आहे असे सर्वसामान्यपणे मानले जाते. फारच कमी लोकांना याची जाणीव आहे की, लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जगभरातच नाही, तर भारतात देखील वाढते आहे. येथे भारतात, दर वर्षी ५०००० पेक्षा जास्त मुले कर्करोगाने बाधित होतात आणि आता ५ ते १५ वयोगटातील मुलांच्या मृत्युसाठी देखील कर्करोग हे नववे सर्वात सामान्य कारण झाले आहे. त्यामुळे खूप लहान वयात कर्करोग होऊ शकतो हे जाणणे आणि मानणे म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे, अशी माहिती एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल नारायण हेल्थच्या पेडियाट्रिक हेमेटॉलॉजी ऑन्कॉलॉजी ऑन्ड बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रुचिरा मिश्रा यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणतात, याबाबत जागरूकता पसरविण्याच्या मुख्य उद्देशाने आमच्या हॉस्पिटलने नुकतेच एक अभियान सुरू केले आहे – “लहान वयात होणारे ८०% कर्करोग बरे होऊ शकतात.” गेल्या पाच वर्षांत आमचे हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आम्ही आमच्या ऑन्कॉलॉजी OPD मध्ये २७०० पेक्षा जास्त मुलांना तपासले आहे. आणि आमच्या हॉस्पिटलच्या डेटानुसार, या पाच वर्षात आमच्या हॉस्पिटलने उपचार दिलेल्या कर्करोग पीडित मुलांपैकी ८०% पेक्षा जास्त मुले आता कर्करोग मुक्त झाली आहेत. अनेक उदाहरणे आम्ही पाहिली आहेत आणि त्यातील सूर्या, ईशा, श्रेया आणि पियुष (सर्व नावे बदलली आहेत) यांची या संदर्भातली प्रकरणे विशेष लक्षणीय आहेत.

लहान मुलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांचे प्रकार:
लहान वयात होणारा सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे ल्युकेमिया, बोन मॅरो आणि रक्ताचा कर्करोग. लहान मुलांतील कर्करोगांपैकी सुमारे २८% याप्रकरचे कर्करोग असतात.
लहान मुलांमध्ये आढळून येणारे अन्य ४ सामान्य कर्करोगाचे प्रकार याप्रमाणे आहेत:
ब्रेन ट्यूमर : लहान मुलांत आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग म्हणजे ब्रेन ट्यूमर, जो २०%पेक्षा जास्त प्रकरणांत आढळतो.

लिम्फोमा : लिम्फोमा किंवा लिम्फ नोड्स / ग्रंथींमध्ये होणारा कर्करोग हा आणखी एक लहान मुलांत आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे.
न्यूरोब्लास्टोमा : हा सर्वात सामान्य असा कर्करोगाचा प्रकार आहे, जो ५ वर्षाखालील मुलांमध्ये पोटातील गाठीच्या रूपात दिसतो.
विल्म्स ट्यूमर: विल्म्स ट्यूमर किंवा नेफ्रोब्लास्टोमा मूत्रपिंडातून उद्‌भवतो आणि एरव्ही अगदी सामान्य दिसणाऱ्या मुलांमध्ये पोटातील गाठीच्या रूपात आढळून येतो.

लहान मुलांमधील कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे :
•          सतत आणि कारण न समजता वजन कमी होणे
•          डोकेदुखी आणि उलट्या
•          सांध्यांमध्ये वाढलेली सूज किंवा वेदना आणि लंगडणे
•          ओटीपोटात, मानेत किंवा इतरत्र गाठ असणे
•          डोळे पांढरे दिसणे किंवा दृष्टीविषयक समस्या
•          संसर्ग नसतानाही पुन्हा पुन्हा ताप येणे
•          खूप जास्त जखमा होणे
•          लक्षात येण्यासारखा निस्तेजपणा किंवा थकवा
जर तुमच्या मुलात किंवा तुमच्या माहितीतील इतर कोणत्याही मुलात उपचार केल्यानंतरही यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर काहीही हालचाल न करता वेळ वाया घालवू नका. नेहमी लक्षात ठेवा की, लवकर निदान आणि वेळेवर उपचार मिळाल्यास मूल संपूर्णपणे कर्करोग-मुक्त होऊ शकतं आणि त्या मुलाला त्याच्या मूळ क्षमतेनुसार जगण्याची संधी मिळते. त्यामुळे, जागरूकता पसरवा, कारण मनमोकळे हास्य आणि निरोगी भविष्यासाठी जागरूकता हे आपल्याकडचे मोठे हत्यार आहे.